‘आंतरराष्ट्रीय कृषी बँकिंग को-ऑपरेशन आणि प्रशिक्षण केंद्रा’च्या निमंत्रण पत्रिकेतून अर्धे जम्मू-काश्मीर गायब !

पुणे – ‘आंतरराष्ट्रीय कृषी बँकिंग को-ऑपरेशन आणि प्रशिक्षण केंद्र’ (सीआयसीटीएबी) यांच्याकडून ‘सहकाराच्या माध्यमातून समृद्धी : डिजिटल इनोव्हेशन आणि मूल्यसाखळी’ ही आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली आहे. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर सदस्य देशांचे नकाशे प्रकाशित केले आहेत. त्यात भारत देशाच्या नकाशातील जम्मू-काश्मीरचा काही भाग दाखवण्यात आलेला नाही. (हा उघडउघड राष्ट्रद्रोहच आहे. असे करणार्‍यांवर राष्ट्रद्रोहाच्या आरोपाखाली कारवाई व्हायला हवी ! – संपादक) यावर सामाजिक माध्यमांतून टीका होत आहे.

‘सीआयसीटीएबी’च्या वतीने ही परिषद १३ ते १५ फेब्रुवारी या कालावधीमध्ये पुणे येथे होणार आहे. या परिषदेमध्ये विविध देशांतील प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या संस्थेच्या सदस्य देशांमध्ये नेपाळ, भारत, बांगलादेश, भूतान, मालदीव आणि श्रीलंका या देशांचा समावेश आहे; पण भारताच्या नकाशातून जम्मू-काश्मीरचा अर्धा भाग गायब करण्यात आला आहे. हा भाग पाकिस्तानात दाखवला गेला.

सीआयसीटीएबी म्हणजे काय ?

कृषी बँकिंगमध्ये काम करण्यासाठी जानेवारी १९८३ मध्ये सरकारने स्थापन केलेली एक स्वायत्त संस्था आहे. या संस्थेचे मुख्यालय पुणे विद्यापिठाजवळ असलेल्या वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था येथे आहे. ही संस्था कृषी बँकिंगच्या संदर्भातील प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करते.