पुणे शहरातील १९ खासगी पाणी शुद्धीकरण प्रकल्पांना टाळे ठोकले !

दूषित पाणीपुरवठा केल्याचे प्रकरण

पुणे – गुइलेन बॅरे सिंड्रोमची (‘जी.बी.एस्.’ची) लागण झालेल्या सिंहगड रस्ता परिसरातील दूषित पाणीपुरवठा करणार्‍या १९ ‘आर्.ओ. प्लांट’ (खासगी पाणी शुद्धीकरण यंत्रणा) प्रकल्पांना टाळे ठोकण्यात आले आहे. या ठिकाणी पाण्यात क्लोरिनचे प्रमाण ० टक्के आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. प्रशासनाने धायरी, नांदेडगाव, किरकटवाडी, तसेच परिसरातील ३० खासगी पाणी शुद्धीकरण प्रकल्पातील पाण्याच्या नमुन्यांची पडताळणी केली. त्यातील १९ प्रकल्पांत दूषित पाण्यात आढळणारे जिवाणू आढळून आले. (सामान्य नागरिकांच्या आरोग्याशी आणि जिवाशी खेळणारे प्रकल्प कायमस्वरूपीच बंद व्हायला हवेत ! – संपादक)  

पाणी प्रकल्प मालकांचा प्रतिप्रश्‍न

बंद केलेल्या काही प्रकल्प मालकांनी या प्रकरणी महापालिकेकडे विचारणा केली, ‘आमचे पाणी दूषित नाही. त्यात विषाणू नाहीत. मग प्रकल्प का बंद केले ?’ त्यावर महापालिकेकेच्या अधिकार्‍यांनी सांगितले, ‘‘विषाणू सापडले नसले, तरी पाण्यात क्लोरिनचे प्रमाण ० टक्के असून ते जड आहे. त्यामुळे ते पाणी पिण्यास अयोग्य आहे.’’ पाणी शुद्धीकरण प्रकल्पाच्या काही मालकांनी प्रतिप्रश्‍न केला की, आम्ही पुरवत असलेले पाणी हे महापालिकेचेच आहे. आम्ही ते टाकीत घेऊन नागरिकांना देतो. मग त्यात क्लोरिन का नाही ? तुम्ही पाण्यात क्लोरिन टाकत नाही का ? (महापालिकेने शुद्धीकरण केलेले पाणी चोरून त्याची विक्री करणार्‍या पाणी चोरांवर महापालिका कठोर कारवाई करणार का ? – संपादक)