अज्ञाताच्या तक्रारीनंतर महसूल विभागाची कारवाई !
दोडामार्ग – तालुक्यातील पडवे माजगाव येथून माती उत्खननाच्या नावाखाली खनिज उत्खनन मोठ्या प्रमाणात चालू आहे. उत्खनन केलेले हे खनिज तालुक्यातील मोरगाव या ठिकाणी जमा केले जात आहे. याविषयी अज्ञाताने महसूल विभागाकडे केलेल्या तक्रारीनंतर मोरगाव येथे खनिजसदृश मातीच्या तब्बल २३४.६७ ब्रास (१ ब्रास म्हणजे २.८३१ घनमीटर) साठ्यावर येथील महसूल प्रशासनाने कारवाई केली आहे.
पडवे, माजगाव येथे गेल्या ८ दिवसांपासून माती उत्खननाच्या नावाखाली खनिज उत्खनन करून लोहखनिजयुक्त मातीचा मोरगाव येथे साठा केला जात आहे. हा साठा करण्यासाठी एका त्रयस्थ व्यक्तीने भूमी लीजवर (काही दिवसांच्या करारावर) घेतली आहे. या ठिकाणी मातीची साठवणूक करण्यासाठी संबंधित व्यक्तीने महसूल विभागाकडून अकृषिक सनदही मिळवली. कळणे खनिज प्रकल्पातून माती वाहतूक करत असल्याचे भासवण्यासाठी लोहखनिज वाहतुकीचे ‘पास’ही संबंधित व्यक्तीकडे आहेत. या व्यवसायात गोवा येथीलही काही लोक गुंतलेले असून स्थानिकांच्या आधारे
काही राजकीय पुढार्यांना आणि अधिकार्यांना हाताशी धरून कोट्यवधींचा खनिज घोटाळा चालू आहे. गतवर्षी आणि गेल्या ८ दिवसांत रात्रीच्या वेळी कोट्यवधींच्या खनिजाची वाहतूक केली गेली; मात्र त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे एका अज्ञात तक्रारदाराने महसूल विभागाकडे तक्रार दिली. या अनुषंगाने कारवाई करण्यासाठी तलाठी लोले हे घटनास्थळी गेले. या वेळी त्यांच्यासमोर एक डंपर माती टाकत असल्याचे त्यांनी पाहिले. त्यानंतर त्यांनी पंचनामा करून मातीचे मोजमाप घेतले आणि पुढील कार्यवाही केली.
माती ४५ ते ५८ ग्रेड लोहखनिज असलेली !
कळणे खनिज प्रकल्पाच्या परिसरातील काही गावात पृष्ठभागावरील मातीत ४८ ते ५८ पर्यंतच्या दर्जाचे लोहखनिज आढळते. छोट्या टेकड्या, डोंगर उताराच्या जागा रात्रीच्या वेळी खोदून ही खनिजयुक्त माती काढून साठवली जाते. त्यानंतर कळणे खाण व्यवसायाचे खनिज वाहतूक पास वापरून हे खनिज म्हणून गोवा आणि कर्नाटक भागांत विकण्यात येते. यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल केली जात असून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवला जात आहे.