PM Modi In Mahakumbh : पंतप्रधान मोदी यांनी त्रिवेणी संगमावर केले पवित्र स्नान !

प्रयागराज कुंभपर्व २०२५

पंतप्रधान नरेंद्र मोदी त्रिवेणी संगमात स्नान करताना

प्रयागराज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रयागराज महाकुंभ येथे वैदिक मंत्रोच्चारात त्रिवेणी संगमात भक्तीभावाने स्नान केले. त्रिवेणी संगमावर स्नान करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधिवत् पूजा केली. संगमात प्रवेश करण्यापूर्वी पंतप्रधानांनी प्रथम श्रद्धेने पाण्याला स्पर्श करून आशीर्वाद घेतले आणि त्यानंतर सूर्याला अर्घ्य अन् तर्पणही केले.

वैदिक मंत्रोच्चारात त्यांनी त्रिवेणी संगमाच्या ठिकाणी अक्षता, नैवेद्य, फुले आणि फळे अर्पण करून पवित्र नद्यांची आरतीही केली.

त्रिवेणी संगमावर पूजा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.

जगभरातून महाकुंभ येथे जमलेल्या भाविकांना पंतप्रधानांनी ‘श्रेष्ठ भारत’ आणि ‘वसुधैव कुटुम्बकम् ।’चा (‘संपूर्ण पृथ्वी हेच कुटुंब आहे’ असा) संदेश दिला.

पंतप्रधानांच्या उपस्थितीतही भाविकांचे स्नान

पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा त्रिवेणी संगमावर पोचले, तेव्हा सर्वसामान्य भाविकही संगमात स्नान करत होते. लोकांना स्नान करण्यापासून थांबवण्यात आले नाही. संगमाच्या काठावर लाखो लोकांच्या उपस्थितीत ‘हर हर गंगे’च्या घोषणा देण्यात आल्या.