दैवी बालक आणि युवा यांचे आध्यात्मिक प्रगल्भता दर्शवणारे दृष्टीकोन !

‘गुरुदेवांच्याच अपार कृपेने दैवी सत्संग होत असतो. त्या सत्संगात गुरुदेवांची दिव्य वाणी कार्यरत झाल्याने काही साधक आध्यात्मिक स्तरावरील अनेक सूत्रे सांगतात. ती सूत्रे येथे दिली आहेत. 

कु. अपाला औंधकर

१. कु. मानसी तिरवीर 

१ अ. स्वतःकडे कर्तेपणा न घेता देवाला त्याचे नियोजन समजण्यासाठी आणि स्वतःकडून त्यानुसार कृती होण्यासाठी प्रार्थना करायला हवी ! : ‘आपण काहीच करू शकत नाही. देवानेच सर्वकाही नियोजित केलेले असते; मात्र आपण नियोजन करून म्हणतो की, ‘आपलेच योग्य आहे.’ आपण असा प्रयत्न करू शकतो की, ‘देवाला ‘तुझे नियोजन तूच मला समजावून सांग आणि माझ्याकडून तुला अपेक्षित अशीच कृती होऊ दे’, अशी प्रार्थना करावी.’ त्या वेळी आपण देवाचे नियोजन ओळखू शकू आणि त्याप्रमाणे कृती करू शकू.’

२. कु. वैदेही खडसे (आताच्या सौ. वैदेही पाटील)

२ अ. ‘मला काही प्रसंग स्वीकारता येत नव्हते. मला प्रतिक्रिया येत होत्या. त्या वेळी मी भावाच्या स्तरावर प्रयत्न केल्यावर मला त्वरित स्वीकारता आले. तेव्हा भावाच्या स्तरावर रहाण्याचे महत्त्व माझ्या लक्षात आले.’

३. कु. अवनी छत्रे

३ अ. सेवा भावाच्या स्तरावर केल्यास भावस्थिती अनुभवता येत असणे : ‘एकदा मला स्वयंपाकघरात डबे शोधून त्यांना झाकण लावण्याची सेवा होती. त्या वेळी ‘डब्यांची अचूक झाकणे शोधणे आणि डब्यांना झाकणे लावणे, म्हणजे जणू जीव-शिव यांचेच मीलन होणार आहे’, असा भाव ठेवून मी माझ्यातील गुरुदेवांना अनुभवण्याचा प्रयत्न केला. मी असा प्रयत्न केल्यावर डब्यांना झाकणे लावण्याची सेवा करतांना मला अखंड भावस्थिती अनुभवता आली.’

४. कु. मृण्मयी जोशी (आध्यात्मिक पातळी ५८ टक्के, वय १४ वर्षे)

४ अ. ‘गुरुदेवच सर्वस्व आहेत’, असे वाटणे : मी आजपर्यंत अनेक वेळा गुरुदेवांचा हात सोडला आहे; मात्र त्यांनी साधनेसाठी माझा हात कधीच सोडला नाही. पूर्वी मला माझे आई-बाबाच सर्वस्व वाटायचे; मात्र आता ‘गुरुदेवच सर्वस्व आहेत’, असे वाटून माझ्याकडून कोटीशः कृतज्ञता व्यक्त झाली.

५. कु. शर्वरी कानस्कर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १७ वर्षे)

५ अ. बाहेरच्या जगात प्रदूषित वातावरणात श्वास घ्यावा लागतो. देवाच्याच अनंत कृपेने आपल्याला रामनाथी आश्रमातील चैतन्यमयी वातावरणात श्वास घेण्याची संधी मिळते. त्याबद्दल परात्पर गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !

५ आ. गुरुदेवांच्या चरणांशी गेल्यावर ‘आपण मुंगी एवढेही नाही’, असा भाव ठेवल्यावर मला माझी असमर्थता लक्षात आली आणि माझ्याकडून शरणागतभाव वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाले.’

६. कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १७ वर्षे)

६ अ. आपली शिकण्याची स्थिती सतत जागृत रहाण्यासाठी आपण सतत देवाला शरण जायला हवे.

६ आ. निर्जीव वस्तूंकडून शिकणे : आपल्याला निर्जीव वस्तूंकडून पुष्कळ काही शिकण्यासारखे आहे. निर्जीव वस्तू, उदा. बालदी, डस्टर (फळा पुसायची वस्तू) इत्यादींना कधीच स्वेच्छा नसते. व्यक्ती एखाद्या वस्तूचा जसा वापर करील, तसे ती वस्तू त्या व्यक्तीचे आज्ञापालन करते; कारण निर्जीव वस्तूंना ‘मन’ नाही. व्यक्तीचे मन रिक्त असेल किंवा मनोलय झाला असेल, तर त्याला प्रतिक्रिया येणे शक्यच नाही. त्यानुसार आपण त्या निर्जीव वस्तूंकडूनही शिकू शकतो.

७. प्रार्थना आणि कृतज्ञता

हे नारायणस्वरूप गुरुदेवा, सर्वकाही आपलेच आहे. प्रत्येक दैवी बालकाच्या माध्यमातून बोलणारे आपणच आहात. ‘हे गुरुदेवा, आपणच आमच्याकडून आपल्याला अपेक्षित असे प्रयत्न करून घ्या’, हीच आपल्या श्रीचरणी भावपूर्ण प्रार्थना करते.’

– कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १७ वर्षे), फोंडा, गोवा. (११.११.२०२२)