भंगार गोदामांना आग
कुर्ला – येथे २ ते ३ भंगार गोदामांना आग लागली. अग्नीशामक दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी आल्या. बीकेसी भागात गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागली.
नवी मुंबई महापालिकेचे कर्मचारी संपावर जाणार
नवी मुंबई – महापालिकेचे ८ सहस्र कर्मचारी १० फेब्रुवारीपासून संपावर जाणार आहेत. ‘समान काम समान वेतन’ धोरण लागू करण्याच्या मागणीसाठी हा संप आहे. या आंदोलनामुळे स्वच्छता, पाणीपुरवठा आणि आरोग्य सेवा यांच्यावर परिणाम होणार आहे.
मुंबईत कुष्ठरोग निर्मूलन अभियान !
मुंबई – ‘राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमा’च्या मार्गदर्शक तत्वांनुसार २०३० पर्यंत कुष्ठरोग निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. लवकरात लवकर शोध घेऊन कुष्ठरोग रुग्णांना औषधोपचाराखाली आणण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विशेष अभियान राबवण्यात येणार आहे. या अंतर्गत ४९ लाख नागरिकांची पडताळणी करण्यात येणार आहे.
मुलाच्या हत्येप्रकरणी आईसह प्रियकराला जन्मठेप
वाई, १ फेब्रुवारी (वार्ता.) – अनैतिक संबंधात अडथळा ठरणार्या स्वतःच्या लहान मुलाला कालव्यामध्ये ढकलून त्याच्या हत्येला कारणीभूत ठरलेल्या आईला आणि तिच्या प्रियकराला जन्मठेप ठोठावण्यात आली. वाईचे अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश मेहेरे यांनी ही शिक्षा हटवली. अश्विनी प्रकाश चव्हाण आणि सचिन शिवराम कुंभार असे जन्मठेप झालेल्या दोघांची नावे आहेत.
सरपंच परिषदेच्या वतीने जिल्हाधिकार्यांना देणार निवेदन !
सातारा, १ फेब्रुवारी (वार्ता.) – मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि मिर्झापूर येथील सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या करणार्यांना शिक्षा व्हावी, या मागणीसाठी सरपंच परिषदेच्या वतीने सातारा जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ३ फेब्रुवारी या दिवशी निवेदन देण्यात येईल. सरपंच, उपसरपंच आणि सदस्य यांचे मानधन, भत्ता या प्रश्नांवरही निवेदन देण्यात येणार आहे.