SC Rejected Plea To Conduct Urs : पाडण्यात आलेल्या अतिक्रमित धार्मिक ठिकाणी कार्यक्रम आयोजित करता येणार नाही !

सर्वोच्च न्यायालयाने उरूसाला अनुमती नाकारली

(उरूस म्हणजे एखाद्या मुसलमान धर्मगुरूच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित उत्सव)

नवी देहली – गुजरातमधील सोमनाथ जिल्ह्यातील एका पाडण्यात आलेल्या दर्ग्यात ‘उरूस’ आयोजित करण्याची अनुमती मागण्यात आली होती. यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) करण्यात आली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आणि अनुमती नाकारली. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की, सरकारी भूमीवरील मंदिरांसह सर्व अनधिकृत बांधकामे काढून टाकण्यात आली आहेत. अशा ठिकाणी कोणत्याही धार्मिक विधींना अनुमती नाही. पूर्वी अतिक्रमण केलेल्या या भूमीवर हिंदु धार्मिक विधींसह कोणत्याही उपक्रमांना अनुमती दिली जात नाही.

गेल्या वर्षी २८ सप्टेंबर या दिवशी सोमनाथ मंदिराजवळील सार्वजनिक भूमीवरील अतिक्रमण हटवण्यासाठी मोहीम चालू करण्यात आली होती.

संपादकीय भूमिका

अतिक्रमित असणारा दर्गा पाडण्यात आल्यानंतरही तेथे उरूस साजरा करण्याची अनुमती मागणे, हे कायद्याचे उल्लंघन करण्याचे टोक गाठणेच म्हणावे लागले. यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाण्याचे धाडस होतेच कसे ? अशांना न्यायालयाने कठोर दंड करावा आणि वचक बसवावा, असेच जनतेला वाटते !