बादे, आसगाव येथे ‘रॉटव्हिलर’ कुत्र्याने युवकाचे लचके तोडले

मालकाच्या विरोधात गुन्हा नोंद

म्हापसा, ३० जानेवारी (वार्ता.) – बादे, आसगाव येथे हिंस्र जातीच्या ‘रॉटव्हिलर’ कुत्र्याने युवकावर आक्रमण करत त्याचे लचके तोडले. या आक्रमणात विनिल साळगावकर हा युवक घायाळ झाला असून त्याला उपचारार्थ शिवोली येथील आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले आहे. या घटनेनंतर हणजूण पोलिसांनी कुत्र्याचा मालक शाम गोवेकर याच्या  विरोधात गुन्हा नोंद केला आहे आणि या प्रकरणाचे अन्वेषण चालू केले आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक सूरज गावस यांनी दिली. ही घटना २९ जानेवारीला रात्री १०.३० वाजता घडली.

विनिल साळगावकर याच्या भावाने कुत्र्याच्या मालकाच्या विरोधात हणजूण पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. ‘मोकळा असलेला कुत्रा कह्यात ठेवण्यासाठी मालकाने कोणतीच उपाययोजना केली नव्हती, तसेच याच कुत्र्याने पूर्वी विनिल याच्या बहिणीवरही आक्रमण केले होते’, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

कुत्र्याच्या मालकाने सरकारी नियमांचे पालन केले नसल्याचा आरोप

यापूर्वी ऑगस्ट २०२४ मध्ये हणजूण परिसरात घडलेल्या एका घटनेत ‘रॉटव्हिलर’ कुत्र्याने एका मुलाचा चावा घेऊन त्याचा बळी घेतला होता. या घटनेनंतर सरकारने अशा जातीच्या कुत्र्यांच्या पालनावर बंदी लागू केली होती, तर पशूसंवर्धन खात्याकडून कुत्र्यांच्या पालनासंबंधी नियमही प्रसिद्ध करण्यात आले आहेत. बादे, आसगाव येथे २९ जानेवारी या दिवशी घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने कुत्र्याच्या संबंधित मालकाने सरकारच्या कोणत्याच नियमाचे पालन केले नव्हते, असे विनिल
साळगावकर याच्या भावाने पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी कुत्र्याला आवश्यक काळजी न घेता मोकाट सोडून मानवी जीवनाला धोका पोचवल्याच्या प्रकरणी भारतीय न्याय संहितेचे कलम २९१ अंतर्गत मालकाच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.