MLA T. Raja Singh : प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांची २ फेसबुक आणि ३ इन्स्टाग्राम खाती ‘मेटा’ने काढून टाकली !

धोरणांचे उल्लंघन केल्याने कारवाई

प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह

नवी देहली – फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सामाजिक माध्यमांचे आस्थापन ‘मेटा’ने भाग्यनगर (तेलंगाणा) येथील भाजपचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांच्याशी संबंधित २ फेसबुक खाती अन् ३ इन्स्टाग्राम खाती काढून टाकली आहेत. ‘इंडिया हेट लॅब’ (आय.एच्.एल्.) याच्या अहवालात अधिकृत बंदी असूनही टी. राजा सिंह आणि त्यांचे समर्थक सामाजिक माध्यमांतून मुसलमानांच्या विरोधात कथित द्वेषपूर्ण भाषण देत असल्याचे उघड झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. काढून टाकलेल्या फेसबुक ‘पेज’चे १० लाखांहून अधिक फॉलोअर्स (समर्थक) होते, तर इन्स्टाग्राम खात्यांचे एकूण १ लाख ५५ सहस्रांपेक्षा अधिक फॉलोअर्स होते.

हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील आक्रमण ! – टी. राजा सिंह

टी. राजा सिंह यांनी मेटाच्या कारवाईच्या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, फेसबुक आणि इन्स्टाग्राम यांनी माझे कुटुंब, मित्र, कार्यकर्ते अन् समर्थक यांची खाती बंद केली आहेत, हे अत्यंत दुर्दैवी आहे. हिंदूंना लक्ष्य करणारी ही ‘निवडक सेन्सॉरशिप’ आहे. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील आक्रमण आहे. यापूर्वी राहुल गांधी यांच्या तक्रारीवरून माझ्या अधिकृत खात्याला चुकीच्या पद्धतीने लक्ष्य करण्यात आले होते. आता माझे व्हिडिओ शेअर करणार्‍यांनाही गप्प केले जात आहे.

आमच्या धोरणाचे उल्लंघन केले ! – फेसबुक

फेसबुकच्या प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले आहे की, आम्ही टी. राजा सिंह यांना फेसबुकवर बंदी घातली आहे; कारण त्यांनी आमच्या धोरणाचे उल्लंघन केले आहे. हिंसाचार आणि द्वेष यांना प्रोत्साहन देणारे किंवा त्यात सहभागी असणारे यांना आमच्या मंचावर प्रतिबंध आहे. संभाव्य उल्लंघनकर्त्यांचे मूल्यांकन करण्याची प्रक्रिया व्यापक आहे आणि म्हणूनच आम्ही त्यांचे खाते काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

मुसलमानविरोधी वक्तव्याचा परिणाम

टी. राजा सिंह यांच्या कथित प्रक्षोभक आणि मुसलमानविरोधी वक्तव्याच्या इतिहासामुळे मेटाच्या ‘धोकादायक व्यक्ती आणि संघटना’ धोरणांतर्गत त्यांच्यावर बंदी घालण्यात आली. या बंदीमुळे सिंह यांच्यावर या मंचांवर कोणत्याही अधिकृत उपस्थितीपासून बंदी घालण्यात आली आणि त्यांचे प्रतिनिधित्व करणारी कोणतीही नवीन पृष्ठे, गट किंवा खाती देखील काढून टाकण्यात आली.

संपादकीय भूमिका

अशी धोरणे केवळ हिंदुत्वनिष्ठांनाच लागू होतात आणि त्यांच्यावरच कारवाई होते, तर जिहादी आतंकवादी, त्यांचे समर्थक, तसेच धर्मनिरपेक्षतावादी आणि साम्यवादी असलेले हिंदुविरोधी आदींवर तक्रार करूनही अशी कारवाई कधी होतांना दिसत नाही. हे पहाता भारत सरकारने यात हस्तक्षेप करणे आवश्यक झाले आहे !