Shivraj Singh Chouhan Air India : केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान याना एअर इंडियाच्या विमानातील तुटलेल्या सीटवर बसून करावा लागला प्रवास !

केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी एअर इंडियाला विचारला प्रश्न !

केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान

भोपाळ (मध्यप्रदेश) – भोपाळ ते देहली या प्रवासाच्या एअर इंडियाच्या विमानात खराब सीट मिळाल्यानंतर केंद्रीय कृषीमंत्री शिवराज चौहान यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

चौहान यांनी एक्सवर पोस्ट करत याविषयी लिहिले की, मी जाऊन सीटवर बसलो, सीट तुटलेली होती आणि आत खोलवर गेली होती. बसणे वेदनादायक होते. जेव्हा मी कर्मचार्‍यांना विचारले की, ‘जर सीट खराब असेल तर ती का दिली ?’ त्यांनी सांगितले की, ‘व्यवस्थापनाला आधीच कळवण्यात आले होते की, ही जागा चांगली नाही आणि तिचे तिकीट विकले जाऊ नये.’ अशी एकच जागा नाही, तर अनेक जागा आहेत. माझ्या सहप्रवाशांनी मला माझी सीट बदलून चांगल्या सीटवर बसण्याची विनंती केली; पण मी माझ्यासाठी दुसर्‍या मित्राला का त्रास देऊ, मी ठरवले की, मी याच सीटवर बसून माझा प्रवास पूर्ण करेन. भविष्यात कोणत्याही प्रवाशाला अशा प्रकारची अडचण येऊ नये, यासाठी एअर इंडिया व्यवस्थापन पावले उचलेल का ? कि प्रवाशांना त्यांच्या नियोजित स्थळी लवकर पोचण्याच्या असाहायतेचा लाभ घेत राहील ?

काँग्रेसकडून केंद्र सरकारवर टीका

युवा काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही. यांनी पोस्ट करत लिहिले की, शिवराज चौहान यांचे सरकार कुंभमेळ्याला जाणार्‍या लाखो भाविकांना गाड्यांमध्ये उभे रहाण्यासाठी जागा देऊ शकले नाही; परंतु त्यांना वेदना जाणवल्या नाहीत; परंतु मंत्र्यांना विमानात तुटलेली खुर्ची मिळाल्याचे दुःख जाणवले.

संपादकीय भूमिका

  • विमान वाहतूक आस्थापने लोकांची अशा प्रकारे फसवणूक करून लूट करत आहेत. येथे केंद्रीय मंत्र्यांना या प्रसंगाचा अनुभव आला आणि त्यांनी याला वाचा फोडली. त्यामुळे आता त्याची कदाचित् नोंद घेतली जाईल; मात्र सर्वसामान्य नागरिकाने काय केले असते ? अशा अनेक अडचणी नागरिकांना येत असतील; मात्र त्यांनी दाद कुणाकडे मागायची आणि त्यांना दाद देणार तरी कोण ?
  • महाकुंभाच्या वेळी झालेल्या गर्दीच्या वेळी भाविकांची तिकीट दरात भरमसाठ वाढ करून लूट करणार्‍या या विमान आस्थापनांवर केंद्र सरकारने कोणताही लगाम घातला नाही, हेही विसरता कामा नये !