शारीरिक सामर्थ्‍यासह मनःसामर्थ्‍य मिळवण्‍यासाठी व्‍यायाम करणे आवश्‍यक आहे !

आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण होणार्‍या शारीरिक समस्‍यांवर ‘व्‍यायाम’ हा प्रभावी उपाय आहे. प्राचीन ग्रंथांमधील व्‍यायामाचे तत्त्वज्ञान आजही तितकेच उपयुक्‍त असून आपण त्‍यातून प्रेरणा घेऊ शकतो. या लेखमालेतून आम्‍ही ‘व्‍यायामाचे महत्त्व, ‘अर्गोनॉमिक्‍स (Ergonomics)’चे तत्त्व आणि आजारानुसार योग्‍य व्‍यायाम’, यांविषयी माहिती देणार आहोत, तसेच व्‍यायामाविषयीच्‍या शंकांचे निरसनही करणार आहोत. व्‍यायामाच्‍या माध्‍यमातून निरोगी जीवनशैली अंगीकारण्‍याचा हा प्रवास प्रेरणादायी ठरेल. या लेखात आपण ‘मन आणि शरीर यांच्‍या आरोग्‍याचा परस्‍परसंबंध अन् व्‍यायामाची आवश्‍यकता’ पाहूया.

१. मनःसामर्थ्‍य आणि शारीरिक सामर्थ्‍य हे परस्‍परावलंबी आहेत !

‘नायमात्‍मा बलहीनेन लभ्‍यः ।’ (मुण्‍डकोपनिषद़्, मुण्‍डक ३, खण्‍ड २, वाक्‍य ४), म्‍हणजे ‘बलहीन (अजितेंद्रिय) मनुष्‍याला आत्‍मज्ञान होत नाही.’ उपनिषदातील या वाक्‍यात शारीरिक बलाचे आध्‍यात्मिकदृष्‍ट्या सर्वश्रेष्‍ठत्‍व दर्शवले आहे. शारीरिक सामर्थ्‍य आणि मनःसामर्थ्‍य हे दोन्‍ही परस्‍परांवर अवलंबून आहेत. शारीरिक सामर्थ्‍य चांगले असले, म्‍हणजे त्‍यावरूनही मनःसामर्थ्‍याची साधारण कल्‍पना करता येईल आणि ती बहुतांशी चुकणारही नाही. शारीरिक सामर्थ्‍य उत्तम कसलेले असल्‍यास तो मनुष्‍य मानसिक आणि बौद्धिक दृष्‍ट्या तरतरीत अन् जोमदार असतो. ‘ज्‍याप्रमाणे ‘शरीरसामर्थ्‍य असणे’, हे सामर्थ्‍याचे लक्षण आहे, त्‍याप्रमाणे शारीरिक जोमाचे लक्षण हे मानसिक तरतरी दाखवते’, हा सरळ सिद्धांत बहुतेकांना पटण्‍यासारखाच आहे. ‘संकटांना तोंड देणे अन् सुखांचा यथेच्‍छ उपभोग घेणे, तसेच आत्‍मोन्‍नती आणि राष्‍ट्रोन्‍नती’, यांसाठी ज्‍याप्रमाणे शरीरसामर्थ्‍य, म्‍हणजे ‘आरोग्‍य’ आवश्‍यक असते, त्‍याचप्रमाणे मनःसामर्थ्‍यही आवश्‍यक असते. आरोग्‍याविण सौख्‍य नसे जगी । आरोग्‍य मिळण्‍यास शरीरसामर्थ्‍यच लागते. शरीरसामर्थ्‍य कमावण्‍यासाठी ‘व्‍यायाम’ करावा लागतो.

२. मनःसंयमनाचे महत्त्व ! 

२ अ. मनःसंयमनानेच स्‍वार्थत्‍याग होऊन आत्‍मोन्‍नती होते ! : ज्‍याप्रमाणे देशसेवा करण्‍यास स्‍वार्थत्‍यागी मनुष्‍य पाहिजे, त्‍याचप्रमाणे व्‍यायाम करण्‍यास मनःसामर्थ्‍य असणारा मनुष्‍य लागतो. मनोनिग्रह असल्‍याविना आत्‍मोन्‍नती होत नाही. कोणत्‍याही व्‍यसनामध्‍ये मनुष्‍य एकदा गुंतला, म्‍हणजे त्‍याला आपली सुटका लवकर करून घेता येत नाही. दारूबाज मनुष्‍य दारू घेत असतांना ‘उद्यापासून बंद !’, याच एका वचनाने तो पाप करत असतो. व्‍यसनामध्‍ये गुंतलेल्‍या मनुष्‍याला व्‍यसन सोडवत नाही. मग ते व्‍यसन कोणत्‍याही तर्‍हेचे असो, त्‍या व्‍यसनापासून परावृत्त होण्‍यास मनोनिग्रहच पाहिजे. मनःसंयमन असल्‍याविना आत्‍मोन्‍नती होणे शक्‍य नाही. मनःसंयमनानेच स्‍वार्थ त्‍याग होत असतो. ‘त्‍याग’ हीच आत्‍मोन्‍नतीची गुरुकिल्ली आहे. आपल्‍याला मनोनिग्रहाची गुरुकिल्ली सापडली, म्‍हणजे आत्‍मोन्‍नतीचा मार्ग मिळाल्‍यासारखेच होय ! कोणत्‍याही गोष्‍टीसाठी मनोनिग्रह पाहिजे. मनःसंयमन असला, म्‍हणजे मनःसामर्थ्‍य असल्‍यासारखेच आहे.

२ आ. ‘मनोनिग्रह असणे’, हे मनःसामर्थ्‍याच्‍या सिद्धतेचे द्योतक असणे : आपल्‍या देशामध्‍ये मनोनिग्रहाचा पूर्ण अभाव असल्‍यामुळे देशोन्‍नती होण्‍यास कालावधी लागत आहे. देशाची उन्‍नती तरुण पिढीवर अवलंबून असते आणि भारतीय तरुण तर व्‍यसनात गुंतलेले असतात! तरुण पिढी शक्‍तीहीन झाल्‍यावर त्‍यांच्‍या हातून सामर्थ्‍याची कर्तव्‍ये कशी होणार ? व्‍यसनांमध्‍ये गुंतलेली तरुण पिढी त्‍यापासून मुक्‍त कशी होणार ? कारण त्‍यांच्‍यात मनोनिग्रहाचा अभाव आहे. ‘मनोनिग्रह असणे’, हे मनःसामर्थ्‍याच्‍या सिद्धतेचे द्योतक आहे. राष्‍ट्रातील तरुण शक्‍तीवान होण्‍यासाठी त्‍यांनी मनःसंयमन केले पाहिजे.

३. राष्‍ट्राच्‍या उद्धारासाठी तरुणांमध्‍ये धडाडी, धारिष्‍ट्य आणि तेज आवश्‍यक असणे अन् ते व्‍यायामाने साध्‍य होणे

राष्‍ट्राचा उद्धार होण्‍यास राष्‍ट्रातील प्रत्‍येक बालक आणि तरुण सतेज असला पाहिजे. प्रत्‍येक तरुणामध्‍ये कसदारपणा आणि कणखरपणा पाहिजे. नेभळट तरुण गुलामगिरीचे असह्य जाच सोसण्‍यामध्‍येच आनंद मानतो. तरुणांमध्‍ये कसदारपणा आणि कणखरपणा येण्‍यास त्‍यांनी व्‍यायाम करणे अत्‍यंत आवश्‍यक आहे. राष्‍ट्राचे ठरीव ध्‍येय गाठण्‍यास तरुणांमध्‍ये धडाडी, धारिष्‍ट्य आणि तेज आवश्‍यक असते अन् ते व्‍यायामाविना असणे शक्‍य नाही.

‘निरोगी असणे’, हे आरोग्‍याचे लक्षण आहे आणि ‘मनःसंयमन करणे’, हेही उन्‍नतीचे लक्षण आहे. मनःसंयमनातून मनःसामर्थ्‍य येते आणि मनःसामर्थ्‍यातून शारीरिक सामर्थ्‍य येत असते. यावरून हे सिद्ध होते की, मनःसामर्थ्‍य आणि शारीरिक सामर्थ्‍य हे परस्‍परावलंबी आहेत !’

– श्री. शंकर रामचंद्र अर्जुनवाडकर, बेळगाव

(साभार : मासिक ‘व्‍यायाम’)