पुणे विद्यापिठाकडून मंदिर व्यवस्थापनासाठीचा विशेष अभ्यासक्रम चालू करण्यात येणार आहे. विद्यापिठाच्या या निर्णयामुळे सनातन भारतीय संस्कृतीची जपणूक आणि संवर्धन होणार आहे. विद्यापिठाकडून मंदिर व्यवस्थापनाचे धडे दिले गेल्यास भविष्यात कुशल मंदिर व्यवस्थापक निर्माण होतील, हे निश्चित ! या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून मंदिरांच्या चल आणि अचल संपत्तीचे व्यवस्थापन करण्याचे धडे ही विद्यार्थ्यांना मिळतील. पूर्वीच्या राजे-महाराजांकडून मंदिरांचे दैनंदिन व्यवस्थापन चालण्यासाठी भूमी दान करण्यात आलेल्या आहेत. सहस्रो वर्षांपासून मंदिरांना मिळालेल्या या भूमींवर धर्मद्रोह्यांकडून अनधिकृतपणे अतिक्रमण केले गेले आहे. काही ठिकाणी तर आर्थिक भ्रष्टाचार, देवनिधीची लूट असेही प्रकार उघडकीस आले आहेत.

खरे तर मंदिरांच्या भूमीपासून मिळणारे वार्षिक उत्पन्न, तसेच मंदिरांमध्ये जमा होणारा देवनिधी हा धर्मकार्यासाठीच वापरला जावा हा मूळ उद्देश होता; मात्र काळाच्या ओघात हा उद्देश संपुष्टात आल्याचे जाणवते. कायद्याची प्रभावी कार्यवाही न झाल्यामुळे मंदिर व्यवस्थापनाला अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते. यामध्ये आर्थिक गैरव्यवहार, मंदिरांसारख्या धार्मिक क्षेत्रांमध्ये वाढता राजकीय हस्तक्षेप इत्यादींचा समावेश आहे. पुणे विद्यापिठाने चालू केलेल्या या अभ्यासक्रमामध्ये मंदिर व्यवस्थापनाच्या वरील अडचणींचा समावेश विद्यापिठाने केला पाहिजे. एक कुशल मंदिर व्यवस्थापक पुणे विद्यापिठातून पदवी आणि पदविका घेऊन बाहेर पडेल हे निश्चित ! सध्या मंदिर सरकारीकरणामुळे ‘चाकरी’ म्हणून मंदिरांचे व्यवस्थापन पहिले जाते. यासह विद्यापिठाचा मंदिर व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम निश्चित करतांना एक समिती गठीत करावी. या समितीमध्ये काही मंदिरांचे विश्वस्त, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे पदाधिकारी, संत-महंत यांचा समावेश करावा. असे केल्यास विद्यार्थ्यांचा केवळ तात्त्विक अभ्यास न होता, प्रायोगिक अंगांचाही अभ्यास पूर्ण होईल. मंदिर व्यवस्थापनाचे कार्य हे ‘देवाची भक्ती’ म्हणून केले गेले पाहिजे’, हा संस्कार विद्यार्थ्यांवर होणे आवश्यक आहे आणि हाच मंदिर व्यवस्थापनाचा मूळ गाभा आहे.
– श्री. राहुल देवीदास कोल्हापुरे, सातारा