सहजावस्थेत असलेले आणि साधकांना आधार देणारे सद्गुरु सत्यवान कदम !

‘गुरुपौर्णिमा २०२२ ते गुरुपौर्णिमा २०२४ या कालावधीत मला सद्गुरु सत्यवान कदम यांचा सत्संग लाभला. ईश्‍वराने सद्गुरु दादांच्या माध्यमातून शिकवलेली सूत्रे गुरुचरणी अर्पण करत आहे. 

सद़्‍गुरु सत्‍यवान कदम

१.  आश्रमात ‘एक सेवक आहे’, या भावाने सेवा करणे 

एकदा सद्गुरु सत्यवान कदम आश्रमाच्या मागच्या बाजूला पडलेले साहित्य व्यवस्थित ठेवत होते. ते ही सेवा अन्य साधकाला सांगू शकले असते; पण त्यांनी स्वतःच स्वच्छता करायला आरंभ केला. नंतर आम्ही तेथे जाऊन त्यांना सेवा थांबवण्यासाठी विनंती केली, तरीही ते आम्हाला साहाय्य करतच होते. सद्गुरु दादांचा ‘मी केवळ एक सेवक आहे’,असा भाव असतो.

२. शारीरिक त्रास होत असतांनाही वेदना सहन करून सहजतेने वागणे

२ अ. शारीरिक त्रासाची वाच्यता न करणे : सद्गुरु सत्यवानदादांना ‘फ्रोजन शोल्डर’चा त्रास (खांद्याच्या सांध्यामध्ये कडकपणा आणि वेदना असण्याची स्थिती) होता. सद्गुरु दादांना असह्य वेदना होत असत; मात्र त्यांनी कधीच तसे कुणालाही जाणवू दिले नाही. त्या कालावधीतही ते स्थिर आणि आनंदी होते. त्यांना वेदना होत असल्यामुळे कधी कधी रात्रभर झोप लागत नसे किंवा त्यांना रात्री झोपतांना डाव्या हाताखाली उशी ठेवून झोपावे लागे.

२ आ. वेळेचे पालन करणे : ते या कालावधीतही सकाळी ठरलेल्या वेळेतच उठत असत आणि वैद्यांनी सांगितलेले व्यायामप्रकार करत असत.

२ इ. सातत्य : ते ‘आजार लगेच बरा व्हावा’, अशी अपेक्षा न करता सातत्याने उपचार घेत असत.

२ ई. नामजपादी उपाय करणे : त्या वेळी त्यांचा हात आवश्यक त्या प्रमाणात वर होत नव्हता, तरीही ते त्या कालावधीत स्वतःवरील त्रासदायक शक्तीचे आवरण काढत होते. त्या वेळी त्यांनी हाताला होणार्‍या वेदनेचा विचार केला नाही.

२ उ. विचारून कृती करणे : सद्गुरु दादा स्वतःच्या मनाने कोणतेही औषध घेत नाहीत. ते आधुनिक वैद्यांना विचारूनच औषधोपचार घेतात आणि सांगितलेले पथ्य कटाक्षाने पाळतात.

३. साधकांना आधार देणे 

सद्गुरु दादा सर्व साधकांना घरातील सदस्यांप्रमाणेच वाटतात. सद्गुरु दादा साधकांच्या घरातील चांगल्या किंवा वाईट प्रसंगांत सहभागी होण्याचा प्रयत्न करतात. एखादा साधक रुग्णालयात भरती झाला असल्यास सद्गुरु दादा त्यांना भेटायला जातात आणि त्यांना शक्य होत नसल्यास ते उत्तरदायी साधकाला रुग्णालयात पाठवतात.

४. इतरांचा विचार करणे 

कोरोना महामारीच्या कालावधीत आश्रमात साधकसंख्या अल्प होती. तेव्हा सद्गुरु दादा स्वयंपाकघरातही साहाय्य करायचे. ते स्वतःच्या खोलीची स्वच्छता करत असत. सद्गुरु दादांनी आश्रम, साधक आणि साधकांची साधना, यांची काळजी घेतली.

५. व्यवस्थितपणा 

सद्गुरु दादांचे कपडे नेहमी स्वच्छ, टापटीप आणि इस्री केलेले असतात.

६. नीटनेटकेपणा 

सद्गुरु दादा झोपून उठल्यानंतर लगेच पांघरुणाची घडी घालतात आणि पलंगपोस नीटनेटका करून ठेवतात. ते त्यांच्या पटलावरील सर्व साहित्य काढून पटल पुसतात.

७. वेळेचे काटेकोरपणे पालन करणे 

ते प्रसाद आणि महाप्रसाद घेण्यासाठी वेळेवर येतात. ते कधी बाहेर जाणार असल्यास त्याविषयी ते संबंधित साधकांना आधीच सांगतात.

८. ते साधकांना अभ्यास करून आणि विचारून घेऊन कृती करायला शिकवतात.

९. मांजरासाठी कापराने उपाय केल्यावर मांजराला बरे करणे 

एकदा कुडाळ सेवाकेंद्रात असलेल्या मांजराचे डोळे पांढरे झाले आणि काही वेळाने ते मरणासन्न अवस्थेत गेले. त्या वेळी सद्गुरु दादांनी त्या मांजरासाठी कापराने आध्यात्मिक स्तरावरील उपाय केले आणि काही वेळातच मांजराला बरे वाटले.

१०. गुरुकार्याचा ध्यास 

८.१.२०२३ या दिवशी बांदा, जिल्हा सिंधुदुर्ग येथे ‘हिंदु राष्ट्र जागृती सभे’चे आयोजन करण्यात आले होते. सद्गुरु सत्यवान कदम यांनी या सभेच्या प्रसारासाठी बांदा, कुडाळ आणि आचरा अशा ३ ठिकाणी बैठकांचे आयोजन करून जिज्ञासूंना मार्गदर्शन केले. ते आवश्यक असल्यास जिज्ञासूंना वैयक्तिक संपर्कही करत असत. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये ४ – ५ मोठ्या सभांचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळीही सद्गुरु दादांचा प्रसारात सहभाग होता. त्यांच्या हिंदु राष्ट्र आंदोलने आणि विविध शिबिरे यांत सहभागी होणे, वैयक्तिक संपर्क करणे, यांसारख्या सेवा अव्याहतपणे चालू असतात.’

– एक साधक , पिंगुळी, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. (१६.८.२०२४) ॐ

सद्गुरु सत्यवान कदम यांच्यावर उपचार करतांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

१. वैद्या तृषाली पवार, पिंगुळी, कुडाळ, सिंधुदुर्ग.

१ अ. त्वचा लहान बाळाप्रमाणे होणे : ‘सद्गुरु सत्यवान कदम यांच्यावर वैद्यकीय उपचार करतांना मला जाणवले, ‘त्यांची त्वचा त्यांच्या वयाच्या व्यक्तींच्या तुलनेत सुकुमार आहे. लहान बाळाची जशी त्वचा असते, तशी सद्गुरु दादांची त्वचा झालेली आहे.’

२. वैद्या अपर्णा महांगडे, फोंडा, गोवा. 

अ. ‘सद्गुरु सत्यवान कदम यांची त्यांच्या खांद्याच्या दुखण्याच्या संदर्भात चिकित्सा करायच्या वेळी त्यांना हात वर उचलायला सांगितला. तेव्हा त्यांचा हात दुखत असतांनाही त्यांच्या चेहर्‍यावर वेदना न जाणवता आनंद जाणवत होता. त्या वेळी ‘त्यांनी व्याधी मनापासून स्वीकारली आहे’, असे मला वाटले.

आ. ते शारीरिक दुखण्याकडे साक्षीभावाने पहातात.

इ. मला एक क्षण वाटले, ‘देवच सद्गुरु दादांना दुखणे सहन करण्यासाठी शक्ती देत आहे आणि देवच त्यांचे दुखणे सहन करत आहे.’

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : १६.८.२०२४)