दिनांकानुसार २२ जानेवारी या दिवशी झालेल्या अयोध्या येथील श्री रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापनेच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने…
‘भगवान श्रीराम हा भगवान श्रीविष्णूच्या दशावतारांपैकी सातवा अवतार आहे. हिंदु समाजात भगवान श्रीरामाला आदर्शांचा मानबिंदू मानले जाते. सर्व हिंदूंच्या मनात श्रीरामाचे एक अबाधित स्थान आहे. आध्यात्मिकदृष्ट्या पाहिल्यास प्रत्येक अवतार समाजाला साधनेचे ज्ञान देऊन त्याचे प्रत्यक्ष आचरण करून घेत असल्यामुळे तो एक प्रकारे गुरुच असतो. श्रीरामाने हिंदु समाजाला दिलेली आध्यात्मिक शिकवण आणि त्याचे वैशिष्ट्य, तसेच ‘अनेक विद्वान ‘श्रीरामाला ‘हिंदूंचे सांस्कृतिक पुरुष’, असे का म्हणतात ?’, या संदर्भातील आध्यात्मिक दृष्टीकोन या लेखात स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.

१. श्रीरामाने दाखवलेल्या मार्गाने चालल्यास यश मिळून साधना होणे
साधना करणार्या अनेकांना साधना आणि अध्यात्म यांतील विविध सिद्धांत किंवा तत्त्वे ठाऊक असतात; पण ‘ते साध्य करण्यासाठी नेमके आणि त्या तत्त्वाला पूरक असे स्थुलातील आचरण कसे असायला हवे ?’, हे त्यांना समजत नाही किंवा समजण्यास दीर्घकाळ लागतो. प्रभु श्रीरामाने मानवासारखे आचरण करण्याच्या लीलेद्वारे ‘अध्यात्म आणि साधनेतील तत्त्वे प्रत्यक्ष जीवनात जगण्यासाठी कशी कृती करावी ?’, हे दाखवले आहे. त्रेतायुगातील, म्हणजे लाखो वर्षांपूर्वींचे श्रीरामाचे जीवनचरित्र वर्तमान कलियुगातील जिवांसाठीही प्रेरणादायी आहे. जे जीव श्रीरामाच्या जीवनचरित्रात लिहिलेल्या आदर्श कृतींचे पालन करतात, त्यांना जीवनात यश मिळतेच; पण त्या कृतींच्या पालनामुळे ते काही प्रमाणात आध्यात्मिक जीवन जगत असल्यामुळे त्या माध्यमातून त्यांची साधनाही होते. (वेळ दुपारी १२.५० ते १.०५)
२. श्रीराम आणि सीता यांचे जीवन म्हणजे प्रवृत्ती अन् निवृत्ती यांचा संगम !
हिंदु धर्मात प्रवृत्ती आणि निवृत्ती अशा दोन जीवनशैली प्रचलित आहेत. प्रवृत्ती आणि निवृत्ती या दोन भिन्न विचारसरणी असल्यामुळे प्रवृत्तीवादी जिवांना निवृत्तीवादींचे तत्त्व पटत नाही, तर निवृत्तीवादींना प्रवृत्तीवादींचे तत्त्व पटत नाही. प्रभु श्रीराम आणि माता सीता यांचे जीवन प्रवृत्ती अन् निवृत्ती यांचा सुरेख संगम आहे. प्रभु श्रीराम आणि माता सीता यांच्या जीवनातून पुढील सूत्रे शिकायला मिळतात.
२ अ. प्रवृत्ती जीवन जगतांना मनाने निवृत्त रहाणारे
श्रीराम ! : प्रवृत्ती जीवन जगत असतांना प्रभु श्रीराम मनाने निवृत्त (अपेक्षारहित) होते. त्यामुळे त्यांना वैराग्यशील (निवृत्त) असलेल्या हनुमानाचे समष्टी धर्मकार्यासाठी साहाय्य मिळाले. त्याचप्रमाणे श्रीरामाने सीतेचा त्याग केल्यानंतर माता सीतेने परत पित्याकडे, म्हणजे राजा जनकाकडे जाऊन प्रवृत्ती जीवन न जगता महर्षि वाल्मीकि यांच्या आश्रमात राहून निवृत्तीचे जीवन स्वीकारले. यामुळे सीतेची व्यष्टी आध्यात्मिक उन्नती होऊन ती देवीस्वरूप झाली.
२ आ. जीवनात प्रसंग उद्भवल्यास लोककल्याणासाठी निवृत्ती जीवन जगण्यास शिकवणे : सर्वसाधारणतः समाजाची ‘युवावस्थेत प्रवृत्ती जीवन जगून वृद्धावस्थेत निवृत्ती जीवन जगावे’, अशी मानसिकता असते; याउलट भगवान श्रीराम आणि माता सीता या दोघांनी ‘वनवास स्वीकारणे, लोककल्याणासाठी रामाने सीतेचा त्याग करणे’, अशा विविध घटनाक्रमांतून जीवनात प्रसंग आल्यास लोककल्याणासाठी युवावस्थेतही निवृत्ती स्वीकारावी’, हे स्वतःच्या आचरणातून शिकवले.
२ इ. प्रवृत्ती जीवन जगतांना निवृत्तीकडे जाणे अवघड आणि श्रेष्ठ असणे : जीवनात प्रथमपासूनच निवृत्ती स्वीकारणे सोपे असते; पण ‘प्रवृत्तीमार्गी जीवन जगतांना निवृत्तीकडे जाणे’, कठीण आहे. भगवान श्रीराम आणि माता सीता यांनी ते साध्य केले. भगवान श्रीराम आणि माता सीता यांचे हेच वैशिष्ट्य दाखवण्यासाठी जणू श्रीराम आणि सीता यांच्या विग्रहासमोर (मूर्तीसमोर) निवृत्तीचे प्रतीक हनुमान सतत शरणागत स्वरूपात असतो.
२ ई. जिथे प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन्हींना विरोध नाही, ते रामराज्य ! : भगवान श्रीराम, माता सीता आणि दास हनुमान यांचे एकत्रित चित्र किंवा विग्रह (मूर्ती) यातून जाणवते, ‘जिथे प्रवृत्ती आणि निवृत्ती यांच्यात परस्पर विरोध नाही, दोन्ही जीवनशैलींना एकामेकांविषयी आदर आहे’, अशी विलक्षण व्यवस्था, म्हणजे ‘रामराज्य’ ! (सनातन संस्थेमध्येही प्रवृत्ती आणि निवृत्ती यांना विरोध नाही. ज्या साधकांना लग्न करायची इच्छा आहे, ते करतात. ज्यांना तशी इच्छा नाही, ते निवृत्तीचे जीवन जगतात. त्यामुळे सनातन संस्थेचे आश्रम प्रवृत्ती आणि निवृत्ती यांचा संगम, म्हणजे रामराज्याच्या छोट्या प्रतिकृती आहेत.)

३. एकपत्नी व्रताच्या आचरणाद्वारे ‘अनेकातून एकात’ हा साधनेचा सिद्धांत शिकवून मनुष्य जीवनाचे अध्यात्मीकरण करायला शिकवणारे श्रीराम !
श्रीरामाच्या काळात बहुविवाह प्रचलित असतांनाही श्रीरामाने एकपत्नी व्रत अंगिकारले. या माध्यमातून ‘अनेकातून एकात जाणे’ या साधनेतील एका महत्त्वपूर्ण तत्त्वाची शिकवण समाजाला दिली. एकापेक्षा अधिक पत्नी केल्यामुळे मनुष्याच्या कामवासनेत वाढ होते आणि त्यामुळे तो मायेत अडकून त्याची अधोगती होते; याउलट एकपत्नी व्रताचे आचरण केल्यामुळे मनुष्य कामवासनेवर नियंत्रण ठेवण्यास शिकतो. त्यामुळे मनुष्याचा काही प्रमाणात मनोलय होत असल्यामुळे त्याला मायेतून अध्यात्माकडे जाणे सोपे होते. एकपत्नीव्रताच्या आचरणातून श्रीरामाने प्रत्यक्षात जीवनाचे अध्यात्मीकरण करण्याची शिकवण समाजाला दिली आहे. श्रीरामाच्या या कृतीला हिंदु समाजाने संस्कृतीचे अविभाज्य अंग बनवले. यामुळे भारताची युवा पिढी विवाहसंस्थेचे आचरण करून काही प्रमाणात सुख अनुभवत आहे; याउलट वर्तमानयुगात पाश्चात्त्य प्रगत देशातील युवा पिढी कामवासनेच्या आहारी गेली असून विवाहसंस्थेपासून दूर जात आहे. त्यामुळे अशा देशांमध्ये ‘भावी पिढ्यांचे काय होणार ?’, हा मोठा चिंतेचा विषय आहे. (वेळ दुपारी १.४६ ते १.५६)

४. शक्तीतत्त्वाशी एकरूपता शिकवणारे श्रीराम !
हिंदु धर्मात विविध ग्रंथांमध्ये विविध देवतांचे ध्यानमंत्र दिले गेले आहेत. अधिकांश देवतांच्या ध्यानमंत्रात त्यांच्या अर्धांगिनीचा (शक्तीचा) उल्लेख नसतो; याउलट महर्षि विश्वामित्र यांनी बुधकौशिक या नावाने लिहिलेल्या ‘श्रीरामरक्षा’ या स्तोत्राच्या ध्यानमंत्रात श्रीरामासहित माता सीतेचाही उल्लेख आहे. हे श्रीरामाचे एक आगळेवेगळे वैशिष्ट्य आहे.
श्रीराम शक्तीतत्त्वाशी, म्हणजे सीतेशी एकरूप आहे. ध्यानातही सीतामातेविना श्रीरामावर ध्यान केंद्रित होऊ शकत नाही. सीतेच्या उल्लेखाविना ध्यानमंत्र जागृत होऊ शकत नाहीत. सीतारूपी शक्तीशी श्रीराम इतके समरस आहेत की, ‘सीतेविना श्रीरामाच्या स्वरूपाचे वर्णनच होऊ शकत नाही.’ यांतून श्रीरामाने समाजाला शक्तीतत्त्वाशी एकरूपता साधण्याची आध्यात्मिक शिकवण दिली आहे. प्रत्यक्षातही त्रेतायुगात सीता कार्यरत असतांना रामायणातील मुख्य प्रसंग घडले आहेत. सीतेने (शक्तीने) भूमीत प्रवेश केल्यावर, म्हणजे देहत्याग केल्यानंतर श्रीरामाच्या आयुष्यात विशेष अशी कुठलीही घडामोड झाली नाही.
हिंदु धर्मात साधना करणार्या स्त्रीला शक्तीचे रूप गणले आहे. ‘अशा शक्तीरूपाला योग्य मान आणि सन्मान देऊन तिच्याशी एकरूपता (टीप) साध्य करणे, म्हणजे मनोलय करणे’, अशी शिकवण श्रीरामाच्या चरित्रातून मिळते; याउलट वर्तमान कलियुगातील अनेक पती साधना करणार्या अन् त्यांच्याहून अधिक आध्यात्मिक पातळी असलेल्या पत्नीच्या साधनेत विविध अडथळे निर्माण करतात.’ (वेळ २.०३ ते २.१७)
(टीप – ‘पुरुषांना अहं असतो. त्यामुळे पत्नी योग्य सांगत असली, तरी तो तिचे ऐकत नाहीत. अहंचा त्याग करून पत्नीचे ऐकणे, तिच्याशी एकरूप होणे म्हणजे ‘मनोलय.’ – निषाद)
– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.१.२०२४, दुपारी १२.५० ते दुपारी ३.३२)
(क्रमशः)
याच्या नंतरचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/876812.html
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |