दिनांकानुसार २२ जानेवारी या दिवशी झालेल्या अयोध्या येथील श्री रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापनेच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने…
२३.१.२०२५ या दिवशी आपण श्रीरामाने ‘सर्वसामान्य मनुष्याप्रमाणे जीवन जगतांना आध्यात्मिक सिद्धांत कसे आचरणात आणू शकतो’, हे स्वतःच्या आदर्श वागण्यातून कसे शिकवले, ते पाहिले. आता या लेखाचा अंतिम भाग येथे दिला आहे.
– श्री. निषाद देशमुख
याच्या आधीचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/876567.html
५. षड्रिपूंवर विजय मिळवलेले श्रीराम !

‘षड्रिपू हे मानवी जीवनाचे अविभाज्य अंग आहेत. अनेक प्रसंगांत श्रीराम सर्वसामान्य मनुष्याप्रमाणे वागला. श्रीरामाने मनुष्य रूपातील सर्व बंधनांचे पालन केले, उदा. पित्याच्या (राजा दशरथ यांच्या) मृत्यूनंतर श्रीराम शोकाकुल झाला, सीताहरण झाल्यानंतर रडला इत्यादी. अशा सर्व घटनांमध्ये मानवाप्रमाणे आचरण करत असतांना कुठल्याही प्रसंगात श्रीराम षड्रिपूंपैकी कुठल्याही रिपूच्या आहारी गेला नाही. याची काही उदाहरणे खाली दिली आहेत.
५ अ. काम : शूर्पणखा ‘श्रीराम आणि लक्ष्मण यांना मोहित करण्यासाठी सुंदर मायावी रूप घेऊन येते’ किंवा ‘श्रीराम खरोखरच भगवंत आहे का ?’, हे पहाण्यासाठी माता पार्वती सीतेचा वेश घेऊन येते. तेव्हा श्रीराम शूर्पणखा आणि माता पार्वती यांचे खरे रूप ओळखतो अन् त्यांच्या समवेत त्या त्या मर्यादेनेच वागतो. श्रीरामाच्या वागण्यात काम किंवा लोभ यांचा अंशच काय; पण लवलेशही नाही.
५ आ. क्रोध
१. इंद्रपुत्र जयंत श्रीराम आणि सीता यांची परीक्षा घेण्यासाठी कावळ्याच्या रूपात येऊन माता सीतेच्या पायावर आक्रमण करतो. तेव्हा क्रोधित होऊन श्रीराम जयंतवर रामबाण सोडतो. ‘त्रिभुवनात रामबाणापासून आपले कुणीच रक्षण करू शकत नाही’, हे लक्षात आल्यावर जयंत श्रीरामाला शरण येऊन त्याची क्षमा मागतो. श्रीराम जयंतला योग्य दंड देऊन क्षमा करतो.
२. श्रीरामाला वनवासाला पाठवणार्या माता कैकेयीप्रतीही श्रीरामाने एका शब्दानेही कधी क्रोध प्रगट केला नाही; याउलट तो त्यांना मातेचा सन्मान देतो. यामुळे श्रीरामाला ‘करुणाघन’ असे विशेषण आहे.
५ इ. मोह
१. श्रीराम १४ वर्षांचा वनवास आनंदाने स्वीकारतो. राज्य, राजपद, राजपदवी यांचा मान किंवा स्वादिष्ट जेवण, सेवक या कशाचाही श्रीरामाला मोह नाही.
२. श्रीरामाला भरत पुनःपुन्हा विनवणी करत असूनही १४ वर्षांचा वनवास झाल्याविना श्रीराम अयोध्येला जात नाही.
३. रावणाचा वध केल्यावर तो लंकेचे राज्य न स्वीकारता बिभीषणाला लंकेचे राज्य देतो.
५ ई. मद : ‘सीता स्वयंवरात परशुरामाचे शिवधनुष्य तोडल्यावर, रावणाचा वध केल्यावर किंवा जीवनातील अन्य कुठल्याही प्रसंगात श्रीरामाचे वागणे कधीच उन्मत्त किंवा गर्वाचे होते’, असा उल्लेख कुठे शोधूनही सापडत नाही.
५ उ. मत्सर : ‘श्रीराम’ लिहिलेल्या शिळा पाण्यावर तरंगतात; पण श्रीरामाने फेकलेली शिळा बुडते’, असा प्रसंग झाल्यानंतरही श्रीराम कधी मत्सरपूर्ण वागले आहेत’, असे चुकूनही आढळून येत नाही. त्यामुळेच श्रीराम सर्वांचा आदर्श आहे. (वेळ दुपारी १.२६ ते १.४३)
अलीकडच्या समाजाला कुणीच धर्माचरण आणि साधना शिकवत नाही. यामुळे वर्तमान समाज षड्रिपूंच्या आहारी गेला आहे. त्यामुळे श्रीरामाचा जन्म झालेल्या या देशात बलात्कार (काम), हत्या (क्रोध, मत्सर), आत्महत्या किंवा इतरांचा अपमान करणे (मद, मत्सर) अशा अपराधांत पुष्कळ वाढ झाली आहे. श्रीरामाच्या चरित्रातून शिकवण घेऊन राज्यकर्ता आणि समाजातील विद्वान यांनी षड्रिपूंच्या निर्मूलनाचे, म्हणजेच स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाचे शिक्षण समाजाला देणे काळानुसार आवश्यक आहे. (वेळ दुपारी २.१८ ते २.२१)
६. ‘जीवनात आदर्श कसे वागावे ?’, हे सर्वांना सहजतेने शिकवणारे गुरुस्वरूप श्रीराम !
गुरुकृपायोगानुसार विचार केल्यास श्रीराम हा उत्तम गुरु आहे. श्रीरामाने शिष्य बनून ऋषि वसिष्ठ यांच्याकडून ज्ञान घेतले. त्या ज्ञानावर आधारित ‘योगवासिष्ठ’ हा ग्रंथ लिहिला गेला आहे. गुरु बनून कर्मयोगी अन् ध्यानयोगी लक्ष्मणाची साधना घडवली, तर सगुण उपासक भरताकडून चरणपादुकांची म्हणजे निर्गुण तत्त्वाची उपासना करून घेतली. प्रकट भावात अडकलेल्या शबरीचा भाव व्यक्त करून घेऊन तिला अव्यक्त भावाकडे नेले, तर व्यष्टी साधनाप्रधान आणि भक्तीयोगी हनुमंताकडून समष्टी साधना करून घेतली. एवढेच नव्हे, तर मूलाधारचक्रात साधना अडकल्यामुळे अयोनीसंभव (मातेच्या उदरातून जन्म न होता भूमीतून) जन्म घेतलेल्या सीतेकडून व्यष्टी आणि समष्टी साधना करून घेतली.(वनवासातील सर्व कष्ट, रावणाकडे झालेली फरपट हे सर्व सहन करून समाजासमोर पतिव्रतेचा आदर्श निर्माण करणे) यामुळे भूमीप्रवेशाच्या माध्यमातून सीतेची कुंडलिनी साधना पूर्ण होऊन भूमीतून (मूलाधारातून) अयोनीसंभव जन्मलेली सीता पुन्हा भूमीत (मूलाधारात) समाविष्ट झाली, म्हणजेच तिला मोक्ष मिळाला. श्रीरामाने राजाच्या रूपात प्रजेकडून साधना करून घेतली. रामाच्या समवेत अयोध्यावासियांनीही जलसमाधी घेतली होती. ज्यांनी श्रीरामाच्या समवेत जलसमाधी घेतली, ते सर्व जण जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त झाले. यांतून श्रीरामाच्या जीवनात जे जे आले, त्या सर्वांचा श्रीरामाने आध्यात्मिक उद्धार आणि कल्याण केले. सर्व योगमार्गी आणि उपासक यांना साधना शिकवून स्वतः सहजावस्थेत राहिलेले गुरु म्हणजे ‘श्रीराम’ ! (वेळ दुपारी २.२१ ते २.३५)
७. आध्यात्मिक तत्त्वानुसार आचरण करणारे श्रीराम !
श्रीरामाचे सर्व आचरण मनुष्याप्रमाणे होते, तरी त्यात कुठेही भावनाशीलता नव्हती. श्रीरामाने त्याच्या जीवनातील प्रत्येक घटनेतून आध्यात्मिक आचरणाची शिकवण दिली आहे. त्याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
७ अ. परेच्छेने वागणे : ‘माता-पिता यांची इच्छा म्हणून वनवास स्वीकारणे, केवट याने नौका तटावर न नेता दीर्घकाळ नदीत फिरवणे, शबरीने उष्टी बोरे दिल्यावर ती खाणे, सीतेची इच्छा म्हणून हरिणाच्या मागे जाणे’, अशा अनेक प्रसंगांत श्रीराम स्वतःच्या मनानुसार न वागता परेच्छेने वागला आहे.
७ आ. कर्मफलन्यायानुसार वागणे : कावळ्याचे रूप धारण करून माता सीतेवर आक्रमण करणार्या आणि नंतर शरण येणार्या इंद्रपुत्र जयंताचा श्रीरामाने एक डोळा काढून त्याला दंडित केले. या प्रसंगात ‘मला अधिक कळते’ या अहंच्या आवरणामुळे अंध होऊन जयंतने सीतेवर आक्रमण केले होते. ‘जयंतला त्याच्या अहंची जाणीव व्हावी आणि त्याने केलेल्या पापाचा क्षय व्हावा’, यासाठी श्रीरामाने जयंतचा एक डोळा काढून त्याला दंडित केले. यातून ‘जो श्रीरामाला शरण येतो, त्याला श्रीराम कर्मफलन्यायानुसार फळ देऊन नंतर त्याच्यावर पूर्ण कृपा करतो’, हे लक्षात येते.
काही लोकांनी श्रीरामाच्या नावावर पसरवलेली षंढ अहिंसा कणभरही श्रीरामाच्या चरित्रात नाही. श्रीरामाने विविध असुर, राक्षस आणि दुर्जन यांना केलेल्या शिक्षा (दंड) ही त्याची अनुपम प्रीती आणि कृपा असून ते त्याच्या आध्यात्मिक आचरणाचे प्रतीक आहे.
७ इ. राष्ट्रभक्ती आणि कर्तव्य शिकवणारे श्रीराम ! : ‘जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरियसी’, म्हणजे ‘स्वर्गापेक्षाही जन्मभूमी महान आहे.’ बंधू लक्ष्मणाला ‘माता’ आणि ‘जन्मभूमी’ या स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहेत’, अशी शिकवण देऊन राष्ट्रभक्ती शिकवणारे श्रीराम जगाच्या इतिहासात कदाचित् पहिलेच असावेत. श्रीरामाच्या या तत्त्वामुळेच राष्ट्राला मातृस्वरूपात बघून बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी ‘वन्दे मातरम्’ या गीताची रचना केली. या गीतामुळेच अनेक क्रांतीकारक आणि सैनिक यांना इंग्रजांच्या विरोधात बंड करून भारत देशाला स्वतंत्र करण्याची प्रेरणा मिळाली.
विश्वातील अनेक देशांमध्ये आज वृद्धांना स्थान नाही. त्यांना त्यांचे अंतिम क्षण वृद्धाश्रमात कसेबसे काढावे लागतात; कारण त्यांच्या मुलांना ते जवळ नको असतात. वृद्ध आई-वडिलांची सेवा न करता त्यांचा छळ केल्यामुळे माता-पिता आणि पुत्र-पुत्री यांच्यातील देवाण-घेवाण वाढतात अन् त्यामुळे ते सर्वच जण जन्म-मृत्यूच्या चक्रांत अडकतात; याउलट आजही अनेक हिंदु तरुण आपले कर्तव्य म्हणून आई-वडिलांची काळजी घेतात. आई-वडिलांच्या इच्छेने, म्हणजेच परेच्छेने वागल्यामुळे हिंदु तरुणांची थोडीफार साधना होऊन त्यांना थोडेफार पुण्य मिळते. हिंदु तरुणांमध्ये जागृत असलेल्या या कर्तव्याच्या मानसिकतेमागे श्रीराम चरित्र दडलेलेे आहे. ते त्यांना कष्ट सहन करून परेच्छेने वागण्यासाठी प्रेरित करते. (वेळ दुपारी २.३५ ते ३.१३)
८. हिंदु धर्माची अद्वितीय संपत्ती म्हणजे ‘श्रीरामचरित्र !’

अन्य पंथ बहुपत्नी किंवा विवाहविच्छेद (घटस्फोट) यांना प्रोत्साहन देऊन जिवाला स्वैराचाराकडे नेतात. अन्य पंथीय स्वर्गाचा लोभ दाखवून त्यांच्या अनुयायांकडून अमानवीय किंवा मांसाहारासारखी पर्यावरणाला हानीकारक अशी कृत्ये करून घेतात. या सर्व विचारसरणींच्या पूर्णपणे विरोधात हिंदु संस्कृती आहे. आजही हिंदूंचे सांस्कृतिक आचरण मोठ्या प्रमाणावर श्रीरामचरित्रावर आधारित आहे. हिंदु समाजात जन्म घेतलेला आणि श्रीराम चरित्र ठाऊक नसलेला कदाचित् कुणीही नसेल. श्रीरामाने आध्यात्मिक तत्त्वांचे स्वतः आचरण केले आहे. त्यामुळे त्याच्या जीवनचरित्राच्या अध्ययनातून जीव ‘अध्यात्मानुसार प्रत्यक्ष आणि सात्त्विक आचरण कसे करावे ?’, हे शिकतो. श्रीराम चरित्र नसते, तर कदाचित् हिंदु संस्कृती एवढी समृद्ध झाली नसती. त्यामुळे ‘हिंदु धर्मातील अद्वितीय संपत्ती म्हणजे ‘श्रीरामचरित्र’ आणि हिंदूंचे सांस्कृतिक पुरुष, म्हणजे ‘श्रीराम’, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. (वेळ दुपारी ३.१३ ते ३.२२)
९. श्रीराममंदिराच्या पुनर्स्थापनेच्या निमित्त श्रीरामाची आध्यात्मिक शिकवण लक्षात घेऊन ‘हिंदु राष्ट्र’, म्हणजे ‘रामराज्य’ स्थापनेसाठी प्रत्यक्ष कृती करणे, हीच श्रीरामाची खरी भक्ती !
२२.१.२०२४ या दिवशी अयोध्येत श्रीराममंदिरात श्री रामललाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली गेली आहे. ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी निगडित शक्ती एकत्रित असतात’, हा अध्यात्माचा सिद्धांत आहे. त्यानुसार श्रीराममंदिरात श्री रामललाच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेमुळे पूर्ण विश्वालाच श्रीरामतत्त्वाचा लाभ होणार आहे.
सत्संगाच्या (माहिती जाणून घेण्याच्या) तुलनेत सत्सेवेच्या (प्रत्यक्ष कृती करण्याच्या) माध्यमातून अधिक प्रमाणात ईश्वरी तत्त्व ग्रहण होते; म्हणून सर्वत्रच्या हिंदूंनी श्रीरामाविषयी केवळ माहिती समजून घेण्यापेक्षा श्रीरामाची आध्यात्मिक शिकवण लक्षात घेऊन षड्रिपूंवर मात करून, भ्रष्टाचारमुक्त व्हावे आणि जीवनाचे अध्यात्मीकरण करून ‘हिंदु राष्ट्र’, म्हणजे ‘रामराज्य’ स्थापनेसाठी प्रत्यक्ष कृती करावी. यामुळे श्रीरामभक्तांना अधिक प्रमाणात श्रीरामतत्त्व ग्रहण होईल. संपूर्ण विश्वातील हिंदूंनी ‘हिंदु राष्ट्र’ म्हणजे ‘रामराज्य’ स्थापनेसाठी कृतीच्या स्तरावर प्रयत्न करणे हीच करुणानिधान, आनंदधाम भगवान श्रीरामाची केलेली खरी श्रेष्ठ भक्ती असणार आहे.
‘भगवान श्रीराम सर्वत्रच्या हिंदूंना ‘हिंदु राष्ट्र स्थापने’चे कार्य साधना म्हणून करण्याची सद्बुद्धी प्रदान करो आणि हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कृतीतून सर्वांची आध्यात्मिक उन्नती होवो’, अशी भगवान श्रीरामाच्या चरणी प्रार्थना !’ (वेळ दुपारी ३.२२ ते ३.३२)
(समाप्त)
– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), ढवळी, फोंडा, गोवा. (१७.१.२०२४, दुपारी १२.५० ते दुपारी ३.३२)
|