
अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डॉनल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतल्यानंतर आदेशांचा सपाटाच लावला आहे. ‘ट्रम्प यांनी शपथ घेण्यापूर्वीच १०० आदेश सिद्ध ठेवण्यात आले आहेत आणि शपथ घेतल्यावर ते तात्काळ त्यावर स्वाक्षरी करून लागू करणार आहेत’, असे सांगितले जात होते. प्रत्यक्षातही शपथविधीनंतर अवघ्या ६ घंट्यांतच ट्रम्प यांनी माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या काळातील ७८ आदेश पालटले आणि नवीन आदेश दिले. यातील एक आदेश, म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेतून अमेरिकेने बाहेर पडणे. ट्रम्प यांच्या मागील सरकारच्या काळातही त्यांनी हाच निर्णय घेतला होता; मात्र बायडेन सरकार आल्यावर त्यांनी अमेरिकेला पुन्हा या संघटनेत समाविष्ट करून घेतले. आता पुन्हा ट्रम्प यांनी अमेरिकेला यातून बाहेर काढले आहे. या उदाहरणातून एकाच देशातील दोन पक्षांचे दोन मतप्रवाह दिसून येत आहेत. यातून अमेरिकेला काय लाभ होत आहे आणि काय तोटा होत आहे ? याचा अभ्यास करावा लागणार आहे. याखेरीज ट्रम्प यांनी दिलेल्या अन्य काही आदेशांमध्ये संपूर्ण अमेरिकाच नाही, तर जगावर त्याचा परिणाम दिसून येत आहे. ट्रम्प यांच्या एकूणच व्यक्तीमत्त्वानुसार त्यांनी निर्णय घेतले आहेत. ट्रम्प अशा प्रकारचे निर्णय घेतील, हे त्यांनी यापूर्वीच सांगितले होते. पुढील ४ वर्षे ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रहाणार आहेत. या काळात ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ (अमेरिकेला पुन्हा महान बनवणे) या घोषणेनुसार ते काम करणार आहेत. या कार्यात त्यांना किती यश मिळणार, हे काळच सांगू शकतो; मात्र सध्याच्या स्थितीला त्यांना विविध आंतरराष्ट्रीय आणि सामाजिक आव्हानांचा सामना करावा लागेल, असेच चित्र आहे. त्यांचे धोरण एका बाजूने अमेरिकेतील काही गटांसाठी लाभदायक असू शकते, तर दुसर्या बाजूने त्यांना सामाजिक आणि जागतिक स्तरावर प्रतिक्रियांचा सामना करावा लागू शकतो. अमेरिका ही जागतिक महासत्ता असली, तरी तिला सध्या आर्थिक स्तरावर संकटाचा सामना करावा लागत आहे. जागतिक स्तरावर याची चर्चा मोठ्या प्रमाणात होत नसली, तरी चीनने अमेरिकेसमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे. ट्रम्प यांचे लक्ष याच दिशेने आहे; कारण ते उद्योगपती आहेत. गरीब कुटुंबात जन्माला आल्यानंतर त्यांच्या वडिलांच्या कर्तृत्वाने त्यांचे कुटुंब श्रीमंत झाले आणि मग ट्रम्प यांनी त्यांचा उद्योगाचा मोठा विस्तार केला अन् आज ते दुसर्यांदा राष्ट्राध्यक्षही झाले. ट्रम्प व्यावसायिक दृष्टीने अमेरिकेकडे पहात आहेत. याच अनुषंगाने त्यांनी ‘ग्रीनलँड’ अमेरिकेला जोडण्याचा प्रस्ताव ठेवला आहे आणि तो ते पूर्ण करूनच थांबणार आहेत, अशीच त्यांची इच्छाशक्ती दिसत आहे. ‘पनामा कालवा’ही ते नियंत्रणात घेणार आहेत आणि इतकेच नव्हे, तर कॅनडाला अमेरिकेत विलीन करण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. सध्याच्या स्थितीला या सर्व गोष्टींना विरोध होत आहे. त्यामुळे हे कितपत यशस्वी होणार ?, हे सांगता येणार नाही; मात्र ट्रम्प ज्या उद्देशाने काम करत आहेत, ते दिसून येत आहे.
अवैध स्थलांतरितांची समस्या !
ट्रम्प यांनी अमेरिकेतून अवैध स्थलांतरितांना बाहेर काढण्याचा आदेश दिल्यानंतर त्यांच्यावर अमेरिकेतून आणि जगातूनही प्रतिक्रिया उमटत आहेत. या निर्णयाचा अमेरिकेवर आणि इतर देशांवर मोठा प्रभाव होईल. यामुळे आर्थिक, सामाजिक, आंतरराष्ट्रीय आणि कायदेशीर स्तरांवर अनेक आव्हानांची निर्मिती होईल. या धोरणाच्या परिणामस्वरूप काही लोकांना लाभ होतील, तर इतरांना हानी होईल. अनेक अवैध स्थलांतरित अमेरिकेतील कृषी, बांधकाम, गृहसजावट आणि इतर अल्प वेतनाच्या क्षेत्रांमध्ये काम करतात. जर या स्थलांतरितांना देशातून बाहेर काढले गेले, तर या उद्योगांमध्ये कार्यबलाची मोठी कमतरता होऊ शकते. यामुळे त्या क्षेत्रांमध्ये महागाई वाढू शकते. अनेक स्थानिक व्यवसाय आणि उद्योग अवैध स्थलांतरित कामगारांवर अवलंबून असतात. जर त्यांना हटवले गेले, तर काही छोटे व्यवसाय बंद पडू शकतात किंवा त्यांना अतिरिक्त कामगार शोधायला आव्हान येऊ शकते, ज्यामुळे आर्थिक अस्थिरता निर्माण होऊ शकते. अवैध स्थलांतरित जरी कार्यरत असले, तरी काही प्रमाणात ते कर भरणे, उत्पादन वाढवणे आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला समर्थन देणे यांमध्ये योगदान करतात. या कामगारांची अनुपस्थिती अर्थव्यवस्थेवर दीर्घकालीन परिणाम करू शकते. या अवैध स्थलांतरितांमध्ये भारतियांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्या आदेशाचा भारत आणि भारतीय यांवरही परिणाम होत आहे. ट्रम्प यांचे म्हणणे आहे की, विदेशी लोकांमुळे आणि तेही अवैधरित्या आलेल्यांमुळे अमेरिकी नागरिकांना नोकर्या मिळत नाहीत. ही जागतिक समस्या आहे. भारतातही विविध राज्यांमध्ये असा वाद दिसून येतो. तीच स्थिती अमेरिकेत आहे. या समस्येमुळे ट्रम्प यांच्या घोषणेला किती लाभ आणि किती तोटा होणार, हे पहावे लागले.
भारत आणि अमेरिका यांचे सख्य !
ट्रम्प यांनी शपथविधीच्या एक दिवस आधीच जगात तिसरे महायुद्ध होऊ देणार नाही, अशी घोषणा केली. ट्रम्प यांच्या चेतावणीमुळेच हमास-इस्रायल युद्ध थांबले आणि ते युक्रेन-रशिया युद्धही थांबवणार आहेत, असे म्हटले आहे. ट्रम्प पक्के व्यावसायिक आहेत; मात्र ते राजकारणी नाहीत. स्पष्टवक्ते आणि प्रामाणिक असल्याने युद्धामुळे विकास होत नाही अन् पैशाची नासाडी होते, हे त्यांना ठाऊक असल्याने ते त्याकडे त्याच दृष्टीने पहात आहेत. त्यातही ते गांधीवादी नाहीत आणि अमेरिकेचे हित ते जाणत असल्याने कठोर होण्याच्या दृष्टीनेही ते वागत आहेत. मेक्सिकोतील घुसखोरांमुळे अमेरिकेला मोठी हानी होत आहे, हे त्यांना लक्षात येत असल्याने त्यांनी मागील कार्यकाळात मेक्सिकोच्या सीमेवर भिंत बांधण्यास चालू केले होते. आता ते प्रत्येक घुसखोराला देशाबाहेर हाकलणार आहेत. यासाठी सैन्याचे साहाय्य घेतले जाणार आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयातून भारतानेही शिकणे आवश्यक आहे. भारतात बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोर भरलेले असतांना त्यांना हाकलण्याच्या संदर्भात भारत अत्यंत निष्क्रीय आहे, असेच दिसते. कोट्यवधींपैकी केवळ ५-१० बांगलादेशींना पकडून आणि त्यातही एखाददुसर्याला हाकलून काही होणार नाही, हे लक्षात घ्यायला हवे. ट्रम्प यांचे पंतप्रधान मोदी यांच्याशी अत्यंत चांगले संबंध आहेत. मागील कार्यकाळात ते दिसून आलेच होते आणि आताही ते दिसून येत आहे. याचा लाभ भारताला आणि अमेरिकेलाही होणार आहे. यातून केवळ अमेरिकाच नाही, तर ‘मेक भारत ग्रेट अगेन’ (भारताला पुन्हा महान बनवणे), असे ध्येय आपणही ठेवू शकतो.
राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांच्याशी असलेल्या जवळीकतेचा भारताने अधिक लाभ करून घेणे आवश्यक ! |