‘आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण होणार्या शारीरिक समस्यांवर ‘व्यायाम’ हा प्रभावी उपाय आहे. प्राचीन ग्रंथांमधील व्यायामाचे तत्त्वज्ञान आजही तितकेच उपयुक्त असून आपण त्यातून प्रेरणा घेऊ शकतो. आतापर्यंत आम्ही या लेखमालेतून ‘व्यायामाचे महत्त्व, आजारानुसार योग्य व्यायाम’ इत्यादी माहिती दिली आहे, तसेच व्यायामाविषयीच्या शंकांचे निरसनही केले आहे. व्यायामाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैली अंगीकारण्याचा हा प्रवास आपणा सर्वांनाच प्रेरणादायी ठरेल. या लेखात आपण ‘मेंदूचे कार्य आणि सकारात्मक राहून व्यायाम केल्याने होणारे लाभ’ जाणून घेऊया.
१. मेंदूचे कार्य
१ अ. शरिरातील सर्व क्रिया नियंत्रित करणे : मेंदूच्या पुष्टीविना शरिरातील कोणतीच क्रिया घडत नाही अथवा थांबत नाही. ‘श्वासोच्छ्वास, अन्नपचन आणि हृदयाचे ठोके’, या सर्वच क्रिया त्या त्या अवयवात मेंदूच्या संमतीनेच होतात अन् त्यांवर मेंदूचेच नियंत्रण असते. ‘शारीरिक हालचाली नियंत्रितपणे पार पाडणे, शरिराचा समतोल राखणे, अगदी केर काढण्यापासून गाडी चालवण्यापर्यंत सर्व कामे करणे’, यांमध्ये मेंदूला १०० टक्के कार्यरत रहावेच लागते. जागृतावस्थेतच नव्हे, तर सुप्तावस्थेतही मेंदू कार्यरत असतो.
१ आ. मेंदूमध्ये विविध प्रकारच्या नसांचे जाळे असणे आणि विद्युत् प्रवाहाप्रमाणे सूक्ष्म आवेगांच्या माध्यमातून मेंदूचे कार्य चालणे : मेंदू हा संगणकाच्या ‘मदरबोर्ड’प्रमाणे शरिरातील कार्य करतो. संगणकीय भागांमध्ये जसे ‘वायरिंग’ असते, तसेच मेंदूमध्ये विविध प्रकारच्या नसांचे जाळे असते आणि विद्युत् प्रवाहाप्रमाणे सूक्ष्म आवेगांच्या माध्यमातून मेंदूचे कार्य चालते. कोणत्याही संगणकीय यंत्राप्रमाणे मेंदू ‘प्रोग्रॅम’ केलेला असतो. ‘आपल्या कृती, विचारप्रक्रिया, सवयी, परिस्थिती’ इत्यादी मेंदूचे ‘प्रोग्रॅमिंग’ करण्यास कारणीभूत असतात. कोणतेही नवीन कौशल्य शिकणे, म्हणजे या नसांच्या जाळ्याचे ‘प्रोग्रॅमिंग’च असते.

१ इ. कृतीपेक्षा मनातील विचारांचे प्राबल्य अधिक असल्याने त्याचा परिणाम मेंदूतील आवेगांवर होत असणे : विशेष म्हणजे पूर्ण शरिराचा कारभार केवळ आवेगाने (impulse ने) होत असतो. आवेग हेच आपल्या शरिराला चालू ठेवण्यासाठी पुरेसे असतात. या आवेगांप्रमाणेच आपल्या विचारांना महत्त्व असते. आपण कोणतीही कृती करत असलो, तरी आपली वृत्ती हळूहळू मनातील विचारांप्रमाणे होऊ लागते आणि तीच वृत्ती आपल्या कृतींवर प्रभाव टाकते. याचे कारण असे की, कृतीपेक्षा विचारांचे प्राबल्य अधिक असते आणि त्याचा परिणाम मेंदूतील आवेगांवर होतो, उदा. सतत निराश असलेल्या व्यक्तीला कालांतराने अनेक शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते.
२. सकारात्मक राहून व्यायाम केल्याने होणारे लाभ
जेव्हा आपण व्यायाम करतो, तेव्हा आपल्या मनाची स्थिती आणि एकाग्रता फार महत्त्वाची असते. व्यायामाच्या वेळी ‘इतर विचार, कामाचा तणाव, कार्यालयातील तंटे, घरातील भांडणे’ इत्यादींचा विचार केल्यास व्यायामाची फलनिष्पत्ती न्यून होऊन शरिराला होणारा लाभ उणावतो. याउलट व्यायामाच्या वेळी जाणवत असलेल्या आल्हाददायक अनुभवांकडे सकारात्मक राहून लक्ष दिल्यास व्यायाम अधिक गुणात्मक होतो, तसेच ‘शारीरिक क्षमता वाढणे, कामाची गती वाढणे, मनावरील तणाव न्यून होणे’, असे अनेक लाभ जाणवतात. सकारात्मकतेमुळे आपले शरिराविषयीचे गांभीर्य टिकून रहाते. आपण सकारात्मक आणि प्रयत्नशील राहिल्यास आपोआपच अडचणींतून मार्ग काढून आपली कर्तव्ये पार पाडणे सोपे जाते.’
– श्री. निमिष म्हात्रे, भौतिकोपचार तज्ञ (फिजिओथेरपिस्ट), फोंडा, गोवा. (१४.१.२०२५)
निरोगी जीवनासाठी ‘व्यायाम’ या सदरात प्रसिद्ध होणारे सर्व लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा –
https://sanatanprabhat.org/marathi/tag/exercise