प्रयागराजमधील महाकुंभमेळा हा सध्या केवळ भारतातच नव्हे, तर वैश्विक स्तरावर चर्चेचा विषय झाला आहे. इतके त्याचे मोठे आध्यात्मिक सामर्थ्य आहे ! प्रतिदिन कुंभच्या संदर्भात प्रसिद्ध होणारी वृत्ते, तसेच व्हिडिओ पहाता ‘गूगल’वर त्यासंदर्भातील माहिती मोठ्या प्रमाणात शोधली जात आहे. विदेशातूनही अनेक मंडळी या कुंभपर्वाला भेट देण्यासाठी येत आहेत. ते तेथे ८ ते १० दिवस रहात आहेत. त्यांच्या चेहर्यावर वेगळाच आनंद जाणवतो आणि त्यांना आत्मिक समाधान मिळाल्याचे त्यांच्या बोलण्यातून लक्षात येते. हेच तर हिंदु धर्माचे अद्वितीयत्व आहे. भारतातील एखाद्या महत्त्वाच्या सोहळ्याची प्रसिद्धी अशा प्रकारे विश्वभर होणे, ही भारतासाठी अभिमानास्पद आणि गौरवास्पद गोष्ट आहे. हा शोध घेणार्यांमध्ये ब्राझील, जर्मनी, जपान, इंग्लंड, अमेरिका यांसह इस्लामी देश असणारे कतार, संयुक्त अरब अमिरात आणि बहरीन यांचाही समावेश आहे. अगदी पाकिस्तानही यात मागे नाही. ‘विश्वगुरुपदावर आरुढ होऊ पहाणार्या भारताने कुंभच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नावलौकिक मिळवला आहे’, असे यातून म्हणता येईल. ‘महाकुंभ’चा विश्व स्तरावर घेण्यात येणारा शोध, म्हणजे हिंदु धर्माच्या पुनरुत्थानाच्या दिशेने टाकली जाणारी पावलेच होत.
हिंदुद्वेषी ‘बीबीसी न्यूज’ !
कुंभचा वाढता प्रसार आणि देशी-विदेशींचे तेथे आकृष्ट होणे, हे चांगले अन् प्रशंसनीय असले, तरी नाण्याची दुसरी बाजूही पहायला हवी. ‘बीबीसी’ म्हणजे ‘ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन’ हे नाव तर हिंदूंना ठाऊकच आहे. या ‘बीबीसी’ला तर हिंदुद्वेषाचा सदान्कदा पोटशूळच उठलेला असतो. हिंदुद्वेष तिच्या नसानसांत भिनलेला आहे. ‘बीबीसी न्यूज’ने महाकुंभमेळ्याची खिल्ली उडवली असून त्याविषयी लेखही प्रसिद्ध केला होता. पर्वस्नानात मोठ्या प्रमाणात नागा साधूंनी स्नान केले होते. त्याविषयीचे वृत्तांकन करतांना त्यांनी या पर्वाविषयी ‘स्नानाचा देखावा’, असा अपशब्द वापरला, तर नागा साधूंना ‘राखेने माखलेले नग्न तपस्वी’, असे संबोधून त्यांची अवहेलनाच केली. हिंदु धर्माचा मोठा सोहळा कुंभमेळ्याच्या रूपात भारतात होत असतांना त्याविषयी किंवा साधूंविषयी असा अयोग्य उच्चार केला जाणे, म्हणजे ‘बीबीसी’ने दाखवलेली स्वतःच्या असंवेदनशीलतेची परिसीमाच होय ! पर्व स्नान म्हणजे केवळ स्नानाचा देखावा नसून त्याद्वारे होणारी शुद्धीची एक प्रक्रिया आहे. या स्नानामुळे अनेक जण कृतकृत्य होतात. त्यांना पवित्र झाल्याचे समाधान लाभते. कुणालाही तो देखावा वाटत नाही, उलट त्याला सर्व भाविक ‘जलवर्षाव’, असे संबोधतात. या सर्व केवळ शाब्दिक संकल्पना नसून हिंदु धर्माच्या शिकवणीनुसार ते ‘अनुभवणे’ असते; मात्र त्याला वेगळे स्वरूप देण्याचा प्रयत्न ‘बीबीसी’ने केला.
‘बीबीसी’ वृत्तसंस्थेला नागा साधूंविषयी काय माहिती आहे ? नागा साधूंच्या अंगावर कपडे नाहीत, इतकेच पाहिले जाते; पण त्यांच्याकडे असलेल्या अनेक अद्भुत शक्तींविषयी कधी ‘बीबीसी’ने जाणून घेतले आहे का ? या अद्भुत शक्तींचा वापर हे साधू केवळ लोककल्याणासाठीच करतात, हे ‘बीबीसी’ला ठाऊक आहे का ? नाही ना ! स्वतः लोककल्याण साधत असल्याचा दिखाऊपणा करायचा आणि लोककल्याण करणार्या साधूंच्या स्नानाला मात्र देखावा संबोधायचे ? हा कुठला प्रकार आहे ? जरा कुठे काही हिंदूंच्या संदर्भात घटना घडली की, तिला वेगळा रंग देऊन सर्वत्र हिंदुद्वेष पसरवायचा. हे असे करणे केवळ अन् केवळ हिंदुद्वेषाची कावीळ झालेल्या ‘बीबीसी’लाच जमू शकते. अशा प्रकारे अयोग्य पद्धतीची वाक्यरचना करून हिंदूंची, तसेच विश्वातील लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्नच ‘बीबीसी’ने केला, असे म्हणता येईल. सर्वच स्तरांवरून याविषयी मोठ्या प्रमाणात विरोध होऊ लागल्यावर ‘बीबीसी’ने मथळ्यातून ‘नग्न’ हा शब्द काढला. याचा अर्थ काय होतो ? तर हिंदूंचे व्यापक संघटन झाल्यास द्वेषाची वळवळणारी कीड आपोआप शांत होते. विरोधाला सामोरे जाण्यापेक्षा एक शब्द काढण्याची क्लृप्ती ‘बीबीसी’ने योजली असली, तरी हिंदु धर्माचा, त्यातही हिंदूंची श्रद्धा जपणार्या कुंभमेळ्यातील स्नानाचा अनादर केल्याप्रकरणी ‘बीबीसी’ला हिंदूंनी रोखठोक सुनवायलाच हवे. हिंदु धर्म, संस्कृती, परंपरा, तसेच हिंदू यांच्या संदर्भात पुन्हा अशी द्वेषमूलक टीका करण्याचे ‘बीबीसी’चे धाडसच होऊ नये, यासाठी हिंदूंनी तिला इंगा दाखवायला हवा. प्रत्येक वेळी हिंदू किंवा हिंदु धर्म यांना जाणूनबुजून लक्ष्य करून ‘उचलली जीभ लावली टाळ्याला’, असा प्रकार करणार्या ‘बीबीसी’ला हिंदूंनी ‘जशास तसे’ प्रत्युत्तर देत धर्माचे अनुकरण करावे.
‘ॲपल’ या जगविख्यात आस्थापनाचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांची पत्नी लॉरेन पॉवेल यांनी महाकुंभपर्वात विधीपूर्वक दीक्षा घेतली. त्यांचे नामकरण ‘कमला’ असे करण्यात आले. दीक्षा घेतल्यानंतर ६१ वर्षीय कमला यांनी गळ्यात रुद्राक्षाची माळ धारण करून ती आजन्म धारण करण्याचा निर्धार केला. याविषयी ‘बीबीसी’वाले चकार शब्दही काढणार नाहीत, हेही लक्षात घ्यायला हवे !
युरोपप्रेमाचा पुळका !
हे ‘बीबीसी’वाले हिंदूंविषयी वाटेल ते बोलतात आणि अन्य धर्मीय किंवा अन्य देश यांच्या संदर्भातील प्रथेचे मात्र गुणगान गातात. अर्थात् हे न कळण्याइतके भारतीय किंवा हिंदू काही दूधखुळे नाहीत, हे ‘बीबीसी’ने लक्षात घ्यावे. युरोपमध्ये ‘न्यूडफेस्ट’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी तेथे कार्यक्रम साजरा करण्यासाठी ४०० लोक नग्न होऊन जमलेले होते. याचे वृत्त देतांना ‘बीबीसी’ने सोयीस्कररित्या ‘निसर्गप्रेमी महोत्सव’, असा शब्दप्रयोग करून स्वतःचे युरोपप्रेम दाखवून देण्याचा प्रयत्न केला.
याआधीही अनेकदा ‘बीबीसी’ने हिंदुद्वेषी गरळओक केली आहे. इतकेच काय, तर वर्ष २०२३ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत यथेच्छ तोंडसुख घेतले. तेव्हा मात्र ब्रिटनचे खासदार लॉर्ड रामी रेंजर यांनी ‘बीबीसी न्यूज’ वृत्तवाहिनीवर कठोर टीका करत तिच्या पक्षपातीपणे केलेल्या वार्तांकनाचीही निंदा केली. राष्ट्र आणि धर्म रक्षणाचे निरपेक्षपणे कार्य करणार्या अनेक संस्था अन् व्यक्ती यांच्या विरोधात संभ्रम निर्माण होईल, अशा पद्धतीची विधाने करण्यात ‘बीबीसी’चा हात कुणी धरूच शकणार नाही. आता हे किती काळ चालू द्यायचे ? भारतद्वेष नसानसांत भरलेल्या या वृत्तवाहिनीवर बंदी घालण्याची मागणी हिंदूंनी केंद्र सरकारकडे लावून धरायला हवी. कुंभमेळ्यासारख्या जगप्रसिद्ध आणि हिंदूंच्या धर्मभावना जपणार्या सोहळ्यावर टीका करण्याचे धाडस दाखवणार्या ‘बीबीसी’ची सर्व भारतद्रोही षड्यंत्रे उद्ध्वस्त करून तिचे तोंड कायमचे बंद करण्याची वेळ आली आहे, हे हिंदूंनी आता लक्षात घ्यावे !
द्वेषपूर्ण मानसिकतेमुळे प्रत्येक वेळी हिंदुद्रोही विधाने करून संभ्रम निर्माण करणार्या ‘बीबीसी न्यूज’वर कायमचीच बंदी घालायला हवी ! |