श्रीराम मंदिराच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने सांगलीत १८ जानेवारीपासून भव्य श्रीराम कथेचे आयोजन !

पत्रकार परिषदेत माहिती देतांना श्री. मनोहर सारडा (उजवीकडे), तसेच अन्य मान्यवर

सांगली, १५ जानेवारी (वार्ता.) – अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने सांगलीत समाधान महाराज शर्मा यांच्या सुरेल वाणीत १८ जानेवारीपासून भव्य श्रीराम कथा आणि नामसंकीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. कल्पद्रुम मैदान, नेमीनाथनगर, विश्रामबाग या ठिकाणी १८ ते २६ जानेवारी या कालावधीत समाधान महाराज शर्मा प्रतिदिन दुपारी २.३० ते सायंकाळी ६ या वेळेत भाविकांना संबोधित करतील. या सोहळ्यासाठी भव्य अशा अयोध्यानगरीची निर्मिती केली असून त्यासाठी भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मुख्य संयोजक श्री. मनोहर सारडा यांनी केले. या प्रसंगी माजी नगरसेवक श्री. लक्ष्मण नवलाई, सर्वश्री अनिल मानधना, अरविंद कुलकर्णी, मोहन जंगम, रमाकांतभाऊ घोडके, रावसाहेब पाटील यांसह अन्य उपस्थित होते.

श्रीराम कथेच्या निमित्ताने उभारलेली भव्य अयोध्यानगरी

१. या कथेच्या निमित्ताने १८ जानेवारी या दिवशी राममंदिर चौक येथून सकाळी ८.३० वाजता भव्य शोभायात्रा आयोजित केली आहे. या शोभायात्रेत सांगलीतील सर्व संघटना, संप्रदाय सहभागी होणार आहेत. या शोभायात्रेच्या माध्यमातून सांगलीत हिंदुत्व, राष्ट्रप्रेम यांचा जागर होणार आहे. तरी यात सांगलीकरांनी सहभागी व्हावे.

२. या कथेसाठी भव्य अशा ‘अयोध्यानगरी’ची निर्मिती केली असून किमान १५ सहस्र भाविक बसतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. १७ जानेवारीला प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण होईल. २० जानेवारीला श्रीराम जन्मोत्सव, २२ जानेवारीला श्रीराम विवाह सोहळा, २६ जानेवारीला श्रीराम राज्याभिषेक असे विशेष कार्यक्रम या कालावधीत होतील.

३. प्रतिदिन रात्री ७ ते ९.३० या वेळेत नामांकित कीर्तनकारांची कीर्तने होणार आहेत. या कथेच्या कालावधीत २४ जानेवारीला महारक्तदान शिबिर होणार असून २५ जानेवारीला नेत्र पडताळणी शिबिर होणार आहे.

४. या कथेच्या कालावधीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २२ जानेवारीला दुपारी ४ वाजता कथेच्या ठिकाणी येणार असून त्यांनी १ घंटा यासाठी दिला आहे.