कराड, २४ जानेवारी (वार्ता.) – हजारमाची येथील सदाशिवगड प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांच्या सेवेसाठी शासनाने नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे; मात्र ही रुग्णवाहिका उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आरोग्य केंद्राच्या आवारात उभी आहे.
सदाशिवगड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रामध्ये १८ गावांतील ६० सहस्र नागरिकांचा समावेश होतो. प्राथमिक आरोग्य केंद्राकडे पूर्वीची रुग्णवाहिका आहे; परंतु ती नादुरुस्त असते. स्थानिक लोकप्रतिनिधींनी सरकारकडे अत्याधुनिक आणि सुसज्ज रुग्णवाहिका देण्याची मागणी केली होती. भाजपचे विद्यमान आमदार मनोज घोरपडे यांनी याचा पाठपुरावा घेऊन ही रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली; मात्र ही रुग्णवाहिका सदाशिवगड आरोग्य केंद्राच्या आवारामध्ये धूळखात उभी असून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. ही रुग्णवाहिका लवकरात लवकर रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.
संपादकीय भूमिकारुग्णवाहिका उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असणे, हे प्रशासनाच्या असंवेदनशील कारभाराचे द्योतक नव्हे का ? |