पोलीस आयुक्तांची माहिती
पुराव्यांशी छेडछाड, व्यावसायिक पद्धतीने अन्वेषण
पुणे – कल्याणीनगर येथील ‘पोर्शे’कार अपघात प्रकरणामध्ये काही श्रीमंत व्यक्ती आणि आधुनिक वैद्यांनी पुराव्यांशी छेडछाड करून न्याययंत्रणेला चुकीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाच्या प्रारंभी पोलिसांवर टीका झाली असली, तरी त्यांच्या कार्यवाहीमुळे अपघातातील मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळण्याची निश्चिती निर्माण झाली आहे. व्यावसायिक पद्धतीने अन्वेषण करून १० आरोपींना अटक केली आहे. हे आरोपी ८ महिन्यांपासून कारागृहात आहेत. त्यांना जामीनही मिळालेला नाही, अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. ते वार्षिक पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.
१९ मे २०२४ या दिवशी चारचाकीच्या धडकेत संगणक अभियंता तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी अटक केली होती. अल्पवयीन चालक आणि २ मित्र यांनी मद्यप्राशन केले होते. अपघातानंतर त्यांना पडताळणीसाठी ‘ससून रुग्णालया’मध्ये नेले होते. तेथे आरोपींच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये पालट केले होते. पोलीस आयुक्तांनी वर्ष २०२४ मध्ये घडलेल्या काही महत्त्वपूर्ण गुन्ह्यांची माहिती दिली. माजी नगरसेवक आंदेकर खून प्रकरणातील २१ आरोपींची अटक, बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरण, सतीश वाघ खून प्रकरण आणि १ सहस्र ८३७ किलो ‘मॅफेड्रॉन’ जप्तीसह १४ जणांची अटक या प्रकरणांचा समावेश आहे. ही सर्व प्रकरणे संवेदनशील असून विशेष अधिवक्त्यांची नेमणूक करून ‘जलदगती न्यायालया’त (फास्ट ट्रॅक कोर्टात) हे खटले चालवण्याचे आश्वासन दिले आहे.