सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा दैवी वरदहस्त लाभलेला भाग्यवान दैवी जीव आहे. ते सद्गुरु पदावर विराजमान असल्यामुळे त्यांचे आध्यात्मिक सामर्थ्य अलौकिक आहेच; पण सूक्ष्मातील जाणण्याचे आणि त्यावर उपाय करण्याचे सामर्थ्यही अवर्णनीय आहे. जणू गुरुदेवांनी त्यांना ‘अनंत हस्ते कमलाकरांनी…’ सूक्ष्मातील सामर्थ्य बहाल केले आहे. कुणाही साधकाला कशाही प्रकारचा त्रास होत असेल, तर सद्गुरु काका त्याला लगेच नामजप आणि मुद्रा शोधून देतात अन् त्रासातून मुक्त करतात. केवळ शारीरिक किंवा आध्यात्मिक त्रासच नाही, तर कोणत्याही कार्यक्रमात येणारे अडथळे असो, संगणकीय प्रणालीत येणार्या अडचणी असोत किंवा यज्ञयागात होणारे त्रास असोत, प्रत्येक वेळी सद्गुरु काका त्यावर योग्य उपाययोजना काढून तो त्रास नष्टच करतात. असे अफाट आध्यात्मिक सामर्थ्य असलेले सद्गुरु काका म्हणजे साधकांसाठी संजीवनीच आहेत. आध्यात्मिक त्रास असलेल्या एका साधिकेने अनुभवलेली त्यांची पितृवत् प्रीती आणि ते साधकांना त्रासाशी लढण्यासाठी देत असलेली स्फूर्ती येथे दिली आहे.
‘माझा आध्यात्मिक त्रास वाढल्यामुळे ३.९.२०२० ते १०.९.२०२० या कालावधीत मला सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या रामनाथी आश्रमातील खोलीत बसून नामजप करण्याची संधी मिळाली. माझा त्रास न्यून होण्यासाठी त्यांनी अखंड प्रयत्न केले.
१. सद्गुरु गाडगीळकाकांची अनुभवलेली पितृवत् प्रीती !
१ अ. आध्यात्मिक त्रास होत असतांना आधार देणे : सद्गुरु काकांनी मला कशाचीच उणीव भासू दिली नाही. त्यांनी मला आधार दिला. ‘त्यांच्या केवळ हसून बोलण्यानेच माझा अर्धा त्रास न्यून होऊन मला प्राणशक्ती मिळते आणि त्यांच्या प्रत्येक कृतीतून माझ्यावर उपाय होत आहेत’, असे मला जाणवत होते. त्यांनी माझ्यावर पितृवत् प्रेम केले.
१ आ. आध्यात्मिक त्रास होत असतांना त्रासाशी संघर्ष करत नसल्याची जाणीव कधी प्रेमाने, तर कधी कठोरपणे करून देणे : मला त्रास होत असतांना सद्गुरु काका मला ‘संघर्ष कसा करायला हवा ?’, हे वडिलांप्रमाणे समजावून सांगतात, तर कधी ते आईच्या मायेने धीर देऊन माझ्यावर करुणेचा वर्षाव करतात, तर कधी सखा होऊन ‘त्रासातही आनंदी कसे रहायचे ?’, हे शिकवून मला बळ देतात. यातून ‘सद्गुरु काका हे गुरुमाऊलीचे प्रतिरूपच आहेत’, याची देव मला क्षणोक्षणी जाणीव करून देत होता. ‘मला लवकर बरे वाटावे’, ही तळमळ माझ्यापेक्षा सद्गुरु काकांनाच अधिक होती. ते मला नामजप करण्याची आणि परात्पर गुरु डॉक्टरांचे स्मरण करण्याची जाणीव कधी प्रेमाने, तर कधी मी ऐकत नसल्यास कठोरपणे करून देत होते; मात्र त्यांच्या बोलण्यातून ते माझ्यावर प्रीतीच करत आहेत’, असे मला जाणवत होते.
२. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी करून घेतलेल्या सूक्ष्मातील विविध प्रयोगांमुळे आध्यात्मिक त्रास पुष्कळ प्रमाणात उणावल्याचे जाणवणे आणि त्यातून शिकता येणे
‘या उपायांच्या कालावधीमध्ये सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी माझ्याकडून सूक्ष्मातील काही प्रयोग करून घेतले. त्या प्रयोगांच्या माध्यमातून मला माझा आध्यात्मिक त्रास न्यून झाल्याचे जाणवले. मी जे सूक्ष्म स्तरावरील अनुभवू शकत नव्हते, ते त्यांच्याच कृपेने मला अनुभवता आले.
या सूक्ष्मातील प्रयोगांमुळे ‘मला होत असलेल्या आध्यात्मिक त्रासाचा उपयोग मी शिकण्यासाठी करून घेऊ शकते’, हे माझ्या लक्षात आले. यातून ‘ईश्वरी ज्ञानाची व्यापकता किती आहे ?’, हेही माझ्या लक्षात आले. या प्रयोगांच्या माध्यमातून माझ्या मनात जिज्ञासा निर्माण झाली आणि त्यामुळे मला होणारा आध्यात्मिक त्रास त्रासदायक न वाटता मला त्यातून शिकण्याची संधी मिळाली. हे सर्व केवळ सद्गुरु काकांच्या कृपेनेच माझ्या लक्षात आले. सूक्ष्मातील विविध प्रयोग करतांना मला झालेले त्रास आणि जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे पुढे दिली आहेत.
२ अ. प्रयोग क्रमांक १ – ‘प.पू. दास महाराज यांनी दिलेल्या ध्यानस्थ मारुतीच्या चित्राकडील बाजू (सगुण) स्वतःच्या आज्ञाचक्राला स्पर्श करील’, अशी लावल्यावर जाणवलेली सूत्रे
२ अ १. मारुतीचे चित्र आज्ञाचक्राला लावताक्षणी ‘त्या चित्रातून शक्ती आणि चैतन्य यांचा प्रचंड झोत शरिरात जात आहे’, असे जाणवणे : मारुतीचे चित्र स्वतःच्या आज्ञाचक्राला लावण्यापूर्वी त्या चित्राकडे पाहिल्यावर माझ्या शरिरात चैतन्य जात असल्याची अनुभूती येऊन माझी भावजागृती झाली. ‘मारुतीचे चित्र स्वतःच्या आज्ञाचक्राला लावताक्षणी ‘त्या चित्रातून शक्ती आणि चैतन्य यांचा प्रचंड झोत माझ्या शरिरात जात आहे’, असे मला जाणवले. त्यामुळे माझ्या पोटात अधिकच दुखू लागले. चित्रातील शक्तीमुळे माझे डोके जड झाले. माझ्या मनातील विचारांचे प्रमाण अकस्मात् वाढले. तेव्हा ‘माझ्या डोक्यावर कुणीतरी मारत आहे’, असे मला जाणवत होते. त्यामुळे ‘कधी ते चित्र काढून टाकीन’, असे मला वाटत होते.
२ आ. प्रयोग क्रमांक २ – ‘प.पू. दास महाराज यांनी दिलेल्या ध्यानस्थ मारुतीच्या चित्राची मागील बाजू (निर्गुण) स्वतःच्या आज्ञाचक्राला स्पर्श करील’, अशी लावणे
२ आ १. ‘सर्व कुंडलिनी चक्रे जागृत झाली’, असे जाणवून दोन सेकंदांमध्ये ध्यान लागणे आणि ‘मी देहापासून वेगळी झाले आहे’, असे जाणवणे : प.पू. दास महाराज यांनी दिलेल्या ध्यानस्थ मारुतीचे चित्र स्वतःच्या आज्ञाचक्राला लावण्यापूर्वी मी त्या चित्राकडे पाहिले. तेव्हा ‘मन शांत होऊन माझे ध्यान लागत आहे’, असे मला वाटले. चित्राच्या मागील कोर्या बाजूचा माझ्या आज्ञाचक्राला स्पर्श झाल्याक्षणी माझ्या मूलाधार चक्रापासून ते सहस्रारपर्यंतच्या सर्वच कुंडलिनीचक्रांची जागृती झाली. दोन सेकंदांमध्ये माझे ध्यान लागून ‘मी देहापासून वेगळी झाली असून मी कितीही घंटे अशा ध्यानस्थ स्थितीत बसू शकते’, असे मला वाटले.
२ आ २. पोटातील वेदना वाढून आध्यात्मिक त्रासांत पुष्कळ वाढ होणे : त्यानंतर माझ्या पोटातील वेदना वाढून त्या छातीपर्यंत येऊ लागल्या. त्यामुळे माझे मन पुष्कळ अस्वस्थ होऊन माझी चिडचिड होऊ लागली. ‘आज्ञाचक्रावर लावलेले मारुतीचे चित्र काढून फेकून द्यावे’, असे मला वाटत होते. मला त्रास देणारी वाईट शक्ती सूक्ष्मातून जोरजोरात ओरडत होती. तिला ‘कुठेतरी पळून जाऊया’, असे वाटत होते. माझे दोन्ही हात-पाय, डोळे आणि कान यांतून वाफा निघत होत्या. मला माझे अस्तित्वच जाणवत नव्हते. मला श्वास घेण्यासही त्रास होत होता. ‘माझे संपूर्ण शरीर बांधले आहे’, असे मला वाटत होते. माझ्या त्रासांत पुष्कळ वाढ होऊन ‘आता माझा श्वास थांबून प्राणच बाहेर येईल’, असे मला वाटत होते.
२ इ. प्रयोग क्रमांक ३ – सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी त्यांचा डावा हात साधिकेच्या डोक्यावर ठेवणे
२ इ १. सर्व कुंडलिनीचक्रे जागृत होऊन सहस्रारातून संपूर्ण शरिरात निर्गुण चैतन्य पसरणे आणि ‘शरीर हलके होऊन वर वर जात आहे’, असे जाणवणे : सद्गुरु काकांनी त्यांचा डावा हात माझ्या डोक्यावर ठेवला. तेव्हा माझे मन शांत होऊन माझी सर्व कुंडलिनीचक्रे जागृत झाली. मला आतून पुष्कळ हलके आणि गार वाटू लागले. ‘माझे सहस्रार पूर्ण उघडले असून माझ्या पूर्ण शरिरात पोकळी निर्माण झाली आहे. माझ्या सहस्रारातून संपूर्ण शरिरात निर्गुण चैतन्य पसरत आहे. शरीर हलके होऊन ‘मी वर वर जात आहे’, असे मला जाणवत होते. माझ्या श्वासाची गती संथ झाली होती. बाह्य गोष्टींकडे लक्ष न जाता माझे पूर्ण लक्ष आत स्थिर झाले होते. एका क्षणी ‘माझे संपूर्ण शरीर विशाल झाले आहे’, असे मला वाटले. ‘सद्गुरु काकांच्या डाव्या हातातून पुढीलप्रमाणे स्पंदने प्रक्षेपित होत आहेत’, असे मला जाणवले.
२ इ २. सद्गुरु काकांच्या डाव्या हातातून प्रक्षेपित होणारी स्पंदने आणि त्यांचे प्रमाण
२ ई. प्रयोग क्रमांक ४ – सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी त्यांचा उजवा हात साधिकेच्या डोक्यावर ठेवणे
२ ई १. भाव, आनंद आणि शक्ती यांची वलये निर्माण झाल्याचे जाणवून ‘सद्गुरु काकांच्या हातातून शक्ती घेतच रहावे’, असे वाटणे : सद्गुरु काकांनी त्यांचा उजवा हात माझ्या डोक्यावर ठेवला. तेव्हा मला माझे आज्ञाचक्र आणि सहस्रार यांवर शक्तीची स्पंदने जाणवली अन् ‘ती शक्ती माझ्या संपूर्ण शरिरात पसरत असून सेवा अन् साधना करण्यासाठी सद्गुरु काकांच्या हातातून मला बळ मिळत आहे. माझ्यात शक्ती, भाव आणि आनंद यांची वलये निर्माण होत असून ‘सद्गुरु काकांच्या हातातून शक्ती घेतच रहावे’, असे मला वाटत होते. माझी भावजागृती होत होती. माझ्या मनात समष्टी भाव जागृत झाला. त्यानंतर मला ‘मी पुष्कळ सेवा केली पाहिजे’, असे वाटले.
२ ई २. सद्गुरु काकांच्या उजव्या हातातून प्रक्षेपित होणारी स्पंदने आणि त्यांचे प्रमाण
३. वरील प्रयोगांनंतर झालेली विचारप्रक्रिया
हे सर्व अनुभवण्याची माझी क्षमता किंवा पात्रता नाही. केवळ सद्गुरु काकांच्या कृपेने आणि त्यांनी करून घेतलेल्या सूक्ष्मातील प्रयोगांमुळे मला हे सर्व अनुभवता अन् शिकता आले. त्यांनीच माझ्या मनात उपायांविषयी जिज्ञासा आणि ओढ निर्माण केली. सद्गुरु काकांनी विविध त्रासांसाठी माझ्याकडून आध्यात्मिक उपाय करवून घेतले. त्यावरून ‘ते उपायांच्या संदर्भात मला ज्ञानच देत आहेत’, असे मला जाणवून माझ्या मनात पुढील विचार आला, ‘भगवान शिव सद्गुरु काकांच्या माध्यमातून मला संजीवनी विद्येचे ज्ञान देत आहे.’
४. कृतज्ञता
सद्गुरु काकांनी आजपर्यंत मला पुष्कळ समजून घेतले आहे. माझा त्रास न्यून होण्यासाठी त्यांनी पुष्कळ प्रयत्न केले आहेत. या जिवाचा उद्धार करण्यासाठी त्यांनी आतापर्यंत पुष्कळ कष्ट घेतले आहेत. सद्गुरु काका सर्वांवरच अखंड आणि निरपेक्ष प्रीती करतात. ‘माझ्या शरिरातील प्रत्येक पेशीने अनेक जन्म त्यांच्याप्रती अखंड कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे’, असे मला वाटते.
५. प्रार्थना
गुरुमाऊलीच्या चरणी मी प्रार्थना करते, ‘हे गुरुमाऊली, आपण माझ्याकडून योग्य रित्या आणि देवाला अपेक्षित अशा शीघ्र गतीने साधना करून घ्या. मला अखंड शिकण्याचा स्थितीत ठेवा. माझ्यातील कृतज्ञताभाव तुम्हीच वाढवा आणि माझ्यात भक्ती निर्माण होऊन लवकरात लवकर तुम्हाला अपेक्षित असे मला घडता येऊ दे !’
– एका साधिका, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.९.२०२०)
|