एकदा मला कर्नाटक येथील काही संतांची भेट घेण्याची संधी मिळाली होती. त्या वेळी मंगळुरू (कर्नाटक) येथील सेवाकेंद्रात मुक्कामाला असतांना मी ‘संतांच्या भेटीत काय झाले ?’, हे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील एका साधिकेला भ्रमणभाषद्वारे कळवले. नंतर ती सूत्रे परात्पर गुरु डॉ. आठवले यांना कळवण्यात आली. त्यांना माझी ही सेवा आवडल्याने ते त्या साधिकेला म्हणाले, ‘‘राम जेव्हा रामनाथीला येईल, तेव्हा त्याला ‘कोणता खाऊ हवा आहे ?’, हे विचार.’’ हा निरोप त्या साधिकेने मला दिल्यावर मी तिला म्हणालो, ‘‘मला साबुदाण्याची खिचडी आवडते. ती हवी आहे.’’ माझे हे उत्तर परात्पर गुरु डॉक्टरांना कळवण्यात आले. तेव्हा त्यांनी स्मित हास्य करत त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला.
हा प्रसंग झाल्यानंतर मी खोलीतून भोजनकक्षात महाप्रसाद घेण्यासाठी आलो. तेथील एक साधिका मला म्हणाली, ‘‘आज एका साधिकेचा उपवास आहे. तिच्यासाठी साबुदाण्याची खिचडी केली आहे. ती बरीच शिल्लक आहे. तुम्हाला हवी का ?’’ हे ऐकून मला आश्चर्य वाटले. मी त्या साधिकेला खिचडी हवी असल्याचे सांगितले.
या प्रसंगी मला पौराणिक कथा आठवल्या. त्यांत ‘देवाला कुणी काही वर मागितला की, देव तो वर त्याच क्षणी द्यायचा’, असे प्रसंग असायचे. त्याप्रमाणे ‘गुरुदेवांनी माझी इच्छा लगेच पूर्ण केली’, याबद्दल माझ्याकडून गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त झाली.’
– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |