‘१० ते १२ सप्टेंबर २०२२ या कालावधीत गोव्यातील मये येथे ‘हिंदु जनजागृती समिती’ने समष्टी साधना चांगली करता येण्याच्या दृष्टीने समितीच्या साधकांसाठी (साधना करणार्यांसाठी) ‘नेतृत्व विकास शिबिरा’चे आयोजन केले होते. या शिबिरामध्ये वाईट शक्तींच्या आक्रमणांमुळे आलेले अडथळे दूर करण्यासाठी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना वेळोवेळी नामजपादी उपाय विचारण्यात आले. येथे दिलेल्या लेखातून ‘वाईट शक्ती अध्यात्मप्रसाराच्या समष्टी सेवेमध्ये कशा अडथळे आणतात ? आणि नामजपादी उपायांमुळे या अडथळ्यांवर कशी मात करता येते ?’, हे शिकता येईल. साधना असेल, तरच असे नामजपादी उपाय करण्याची क्षमता स्वतःत निर्माण होते. त्यामुळे या लेखातून साधनेचे महत्त्वही लक्षात येईल.

१. शिबिरासाठी सभागृह मिळण्यामध्ये अडचण येणे आणि उपाय केल्यावर सभागृह मिळणे
शिबिराचा दिनांक ठरल्यावर त्याच्या १ मास (महिना) आधीपासूनच शिबिरासाठी सभागृह मिळण्याकरता प्रयत्न करण्यात आले. असे असूनही सभागृह मिळण्यात बर्याच अडचणी येत होत्या, उदा. सभागृह विनामूल्य न मिळणे, सभागृह विनामूल्य उपलब्ध असलेल्या ठिकाणी निवास व्यवस्था न मिळणे इत्यादी. ‘या अडचणींमागे अध्यात्मिक कारण असू शकते’, असा विचार करून सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना नामजपादी उपाय विचारण्यात आले. त्यांनी प्रतिदिन २ घंटे ‘महाशून्य’ हा जप, तसेच पुढीलप्रमाणे न्यास करायला सांगितला.

१ अ. न्यास : उजव्या हाताचा तळवा डोळे बंद ठेवून डोळ्यांसमोर १ ते २ सेंटिमीटर अंतरावर धरावा.
हे उपाय प्रत्येकी १ घंटा २ दिवस केल्यावर तिसर्या दिवशी मये, गोवा येथील ‘आदिनाथ संप्रदाय सभागृह’ हे विनामूल्य मिळाले. त्या सभागृहाला लागून असलेल्या खोल्यांमध्ये निवासाची व्यवस्थाही झाली.
२. शिबिरात सहभागी झालेल्या साधकांना अडचणी येणे
शिबिरात सेवा करण्यासाठी जे साधक सहभागी झाले होते, त्यांतील काही साधकांना अडचणी येत होत्या, उदा. शिबिरामध्ये सहभागी व्हायला घरातून विरोध होणे, घरातील सदस्य आजारी पडून त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागणे, स्वतः आजारी पडणे इत्यादी. यासाठी सद्गुरु (डॉ.) गाडगीळकाकांना नामजपादी उपाय विचारल्यावर त्यांनी प्रतिदिन १ घंटा ‘शून्य’ हा जप, तसेच पुढीलप्रमाणे न्यास करायला सांगितला.
२ अ. न्यास : उजव्या हाताचा तळवा डोळे बंद ठेवून डोळ्यांसमोर १ ते २ सेंटिमीटर अंतरावर धरावा.
३. शिबिरात अडचणी येऊ नयेत, यासाठी शिबिराच्या दोन दिवस अगोदर नामजपादी उपाय विचारण्यात येणे
सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी प्रतिदिन २ घंटे ‘महाशून्य’ हा जप, तसेच पुढीलप्रमाणे न्यास करायला सांगितला.
३ अ. न्यास : उजव्या हाताचा तळवा डोळे बंद ठेवून डोळ्यांसमोर १ ते २ सेंटिमीटर अंतरावर धरावा.
वरील सर्व नामजपादी उपाय ६१ टक्के किंवा त्याहून अधिक आध्यात्मिक पातळी असलेल्या साधकांनी केले.
४. प्रतिदिन नामजपादी उपाय करूनही शिबिरात आलेल्या अडचणी आणि त्यांवर केलेले उपाय
४ अ. १० सप्टेंबर या शिबिराच्या पहिल्या दिवशी सभागृहात त्रासदायक शक्तीचा दाब जाणवणे : यावर सभागृहात विभूती फुंकरणे आणि धुरी दाखवणे, हे उपाय केल्यावर तो त्रास न्यून झाला.
४ आ. शिबिराच्या दुसर्या दिवशी सकाळी आणि दुपारी अशी दोनदा ध्वनीयंत्रणा बंद पडणे अन् तेव्हा सद्गुरु गाडगीळकाकांनी उपाय केल्यावर ती चालू होणे : शिबिराच्या दुसर्या दिवशी सकाळी ८ वाजता संपूर्ण ध्वनीयंत्रणा बंद पडली. त्यामुळे यंत्रणेची दृष्ट काढली आणि त्या यंत्रणेवर आक्रमण करणारी त्रासदायक शक्ती खेचून घेण्यासाठी त्यावर लिंबू ठेवले, तसेच विभूती फुंकरली. तरीही ध्वनीयंत्रणा चालू होत नव्हती. नंतर सद्गुरु गाडगीळकाकांनी त्यासाठी नामजपादी उपाय केल्यावर ध्वनीयंत्रणा थोड्याफार प्रमाणात चालू झाली. त्याच दिवशी दुपारी १२.३० वाजता पुन्हा ध्वनीयंत्रणेचा आवाजाशी संबंधित जो ‘मिक्सर’ असतो, तो पूर्णपणे बंद पडला. तेव्हा पुन्हा सद्गुरु गाडगीळकाकांनी त्यासाठी नामजपादी उपाय केले, तसेच मिक्सरवर विभूती फुंकरण्यास सांगितली. या उपायांनंतर ध्वनीयंत्रणा पुन्हा पूर्ववत् चालू झाली.
४ इ. शिबिराच्या दुसर्या आणि तिसर्या दिवशी संपूर्ण गावातील वीज २ घंटे गेली होती.
५. शिबिरात सहभागी झालेल्या शिबिरार्थींना झालेले त्रास आणि त्यांना सांगितलेले उपाय
५ अ. शिबिराचा पहिला दिवस
५ अ १. सौ. लता किल्लेकर – डोके दुखणे, छातीत दुखणे आणि उलटी आल्यासारखे होणे : या त्रासांमुळे त्यांच्या मनाची अस्वस्थता वाढली. तेव्हा सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले पुढील उपाय केल्यावर त्यांचे ते त्रास न्यून झाले.
अ. न्यास : एका हाताचा तळवा आज्ञाचक्रापासून १ ते २ सें.मी. अंतरावर आणि दुसर्या हाताचा तळवा मणिपूरचक्रापासून १ ते २ सें.मी. अंतरावर धरावा.
आ. नामजप : महाशून्य
इ. कालावधी : २ घंटे
५ अ २. सौ. सोनाली सावंत – प्रचंड डोकेदुखी, सर्दी, मळमळणे आणि न सुचणे : यासाठी पुढील उपाय केल्यावर त्यांचे त्रास न्यून झाले.
अ. न्यास : एका हाताचा तळवा आज्ञाचक्रापासून १ ते २ सें.मी. अंतरावर आणि दुसर्या हाताचा तळवा विशुद्धचक्रापासून १ ते २ सें.मी. अंतरावर धरावा.
आ. नामजप : महाशून्य
इ. कालावधी : २ घंटे
५ अ ३. सौ. सोनम शिरोडकर यांना त्यांच्या मुलीला रुग्णालयात घेऊन जावे लागल्याने त्या शिबिरात उपस्थित राहू न शकणे : सौ. सोनम शिरोडकर यांच्या ३ मुली लहान आहेत. शिबिराच्या पहिल्या दिवशी त्यांतील एका मुलीला त्रास होऊ लागल्याने तिला रुग्णालयात घेऊन जावे लागले. तिकडेच सौ. शिरोडकर यांचा पूर्ण दिवस गेल्याने त्या पहिल्या दिवशी शिबिरामध्ये उपस्थित राहू शकल्या नाहीत.
५ अ ४. कु. अवनी छत्रे हिला झालेला ‘सायनस’चा पुष्कळ त्रास ‘प्रार्थना आणि नामजप यांनी बरा होणे : कु. अवनी छत्रे हिला रात्री ‘सायनस’चा पुष्कळ त्रास होऊ लागला. तिला रात्रभर झोप लागली नाही. त्यामुळे पहाटे ५ वाजता तिने विचारले, ‘‘मी घरी जाऊ का ?’’ तेव्हा तिला ‘प्रार्थना आणि नामजप कर अन् तरीही बरे वाटले नाही, तर जा’, असे सांगितले. त्यानंतर साधारण दीड घंट्याने तिला बरे वाटले. त्यामुळे ती शिबिराला थांबली.
५ आ. शिबिराचा तिसरा दिवस
५ आ १. सौ. सोनम शिरोडकर यांच्या लहान मुलीला ताप आला. त्यामुळे त्यांना तिला रुग्णालयामध्ये न्यावे लागले; पण काही वेळाने त्या पुन्हा शिबिरात सहभागी होऊ शकल्या.
५ आ २. श्री. उत्तम दवणे यांना त्यांची ३ वर्षांची मुलगी आणि वडील यांना रुग्णालयात न्यावे लागणे अन् तरीही त्यांनी या अडचणींवर मात करून शिबिराला उपस्थित रहाणे : श्री. उत्तम दवणे यांच्या ३ वर्षांच्या मुलीला ताप आल्यामुळे तिला रुग्णालयात न्यावे लागले. तसेच त्यांच्या वडिलांनाही त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात भरती करावे लागले; पण ते या अडचणींवरही मात करून शिबिरात सहभागी झाले.
केवळ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच हे शिबिर होऊ शकले आणि त्यामध्ये आमची साधना झाली. याबद्दल आम्ही सर्व साधक त्यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करतो !’
– श्री. गोविंद चोडणकर, हिंदु जनजागृती समितीचे उत्तर गोवा समन्वयक (२०.९.२०२२)
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |