श्री. केदार नाईक यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती आणि त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे !

१. सर्वज्ञ अशा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकाच्या मनातील इच्छा पूर्ण करणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१ अ. ‘एका खोलीतील चित्रीकरणासाठी वापरत असलेल्या विद्युत्तारांचा गुंता पाहून तो नीटनेटका करून ठेवावा’, असे वाटणे : एक संत आणि साधक यांच्या सत्संगाचे चित्रीकरण एका खोलीत करण्यात येत होते. तेथे ४ ते ५ वेळा चित्रीकरण झाले होते. त्यामुळे चित्रीकरणासाठी वापरल्या जाणार्‍या विद्युत तारांची (केबल्सची) तेथे पुष्कळ गुंतागुंत होऊन त्या विस्कळीतपणे पडल्या होत्या. एकदा आम्ही चित्रीकरण विभागातील साधक चित्रीकरणाची पूर्वसिद्धता करत होतो. त्या वेळी अकस्मात माझ्या मनात विचार आला, ‘आपण हा तारांचा (केबल्सचा) गुंता सोडवूया आणि नीटनेटके ठेवूया.’ मी तो विचार सहसाधकांना बोलून दाखवला आणि त्यांना म्हणालो, ‘प्रतिदिन येथे देव येऊन बसतो; परंतु तरीही आपण हे नीट ठेवत नाही. आज आपण हे आवरूया. कदाचित् देव आताच येईल.’

१ आ. तारांची गुंडाळी नीट करून खोलीत आवराआवर केल्यानंतर दहा मिनिटांतच प्रत्यक्ष परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी खोलीत येऊन खोलीतील सर्व सिद्धता बारकाईने पहाणे आणि सर्वज्ञ असूनही जिज्ञासेने सर्वकाही जाणून घेणे : मी हे बोलून सहसाधकासमवेत तेथे आवराआवर करू लागलो. आश्चर्य म्हणजे १० मिनिटांतच साक्षात देव, म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले प्रत्यक्ष त्या खोलीत आले. तेथे आल्यानंतर परात्पर गुरु डॉक्टरांनी चित्रीकरणाची सिद्धता बघितली. ‘आसंद्यांची रचना योग्य आहे ना ? सत्संगाला बसलेले साधक आणि संत हे कोणत्या छायाचित्रकामध्ये (कॅमेरामध्ये) एकत्र दिसतात ? छायाचित्रकाचा अँगल (कोन) बरोबर आहे ना ?’ इत्यादी गोष्टी त्यांनी पाहिल्या. तेथे ध्वनीमुद्रणासाठी मोठा ‘ऑडिओ मिक्सर’ (ध्वनीनियंत्रणाचे यंत्र) जोडला होता. ‘त्याचे कार्य कसे चालते ? एकूण किती ध्वनीक्षेपक (माईक) वापरण्यात येतात? प्रत्येक ध्वनीक्षेपक, त्याची विद्युत्तार, त्याचा ‘रिसिव्हर’ इत्यादींना विशिष्ट रंगाचे स्टिकर्स (पट्ट्या) का लावले आहेत ? एकूण किती जोडण्या (‘कनेक्शन’) कराव्या लागतात ? त्यासाठी किती तारा (केबल्स) जोडाव्या लागतात ?’ इत्यादी अनेक प्रश्न त्यांनी पुष्कळ जिज्ञासेने विचारले. त्यानंतर नुकतीच आम्ही ज्या विद्युत्तारांची व्यवस्थित गुंडाळी करून ती पटलाच्या एका कोपर्‍यात व्यवस्थित ठेवली होती, त्या कोपर्‍यात जाऊन त्यांनी ‘येथे काय ठेवले आहे ?’, असे विचारले. सर्वज्ञ असूनही परात्पर गुरुदेवांनी एका निरागस बालकाप्रमाणे सगळी सिद्धता बघितली.

श्री. केदार नाईक

१ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले सर्वज्ञ असल्याने त्यांना खोलीतील चित्रीकरणाची सिद्धता पहाण्यासाठी प्रत्यक्षात येण्याची आवश्यकता नसणे; परंतु केवळ साधकाच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी ते आल्याचे लक्षात येणे : परात्पर गुरु डॉक्टर खोलीबाहेर जातांना मी त्यांना म्हणालो, ‘परात्पर गुरुदेव, आज ही सिद्धता करतांना माझ्या मनात विचार आला, ‘आज येथील सिद्धता बघायला देव येणार आहे आणि ती इच्छा तुम्ही पूर्ण केली.’ त्यावर परात्पर गुरु डॉक्टर त्यांच्या खोलीकडे हात करून म्हणाले, ‘देवाला तेथे बसून सगळे कळते. प्रत्यक्ष इथे यायची काय आवश्यकता आहे ?’ यावर मला वाटले, ‘देवाला सगळी स्थिती माहिती होती; पण केवळ माझ्यासारख्या एका छोट्याशा साधकाच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी तो येथे आला, तसेच ‘माझ्या मनात आलेला विचार देवाचा विचार आहे, हे ओळखून मी त्याप्रमाणे कृती करतो का ?’, हे पहाण्याची ती जणू एकप्रकारे परीक्षाच होती.

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘साधक आश्रमातील साहित्य काळजीपूर्वक हाताळत आहे का ?’ याचे निरीक्षण करणे

एकदा महर्षींच्या आज्ञेने आश्रम परिसरात असणार्‍या श्री सिद्धिविनायकाच्या मूर्तीला शेंदरी रंग देण्याची सेवा चालू होती. त्या कालावधीत मी त्या मूर्तीची छायाचित्रे काढण्याची सेवा करत होतो. काढलेली छायाचित्रे परात्पर गुरु डॉक्टरांना दाखवण्यासाठी मी भ्रमणसंगणक (लॅपटॉप) घेऊन त्यांच्याकडे गेलो. मी तो बॅगेमध्ये घालून नेला होता. छायाचित्रे दाखवून झाल्यानंतर परात्पर गुरु डॉक्टरांनी विचारले, ‘‘एकच जिना चढून यायचे होते, तर भ्रमणसंगणकासाठी एवढी बॅग कशाला आणलीस ?’’ त्यावर मी सांगितले, ‘हा भ्रमणसंगणक महाग आहे आणि येथे ही कार्यपद्धत घालून दिलेली आहे.’ काही वेळाने मी त्यांना पुढील टप्प्यांची छायाचित्रे दाखवायला गेल्यानंतर ते भ्रमणसंगणकाच्या बॅगेकडे बघून केवळ हसले. त्यानंतर पुन्हा मी छायाचित्रे दाखवायला गेल्यानंतर मी ‘भ्रमणसंगणक बॅगेतून बाहेर कसा काढतो आणि पुन्हा आत कसा ठेवतो ?’, याचे परात्पर गुरु डॉक्टरांनी निरीक्षण केले आणि शेवटी जातांना म्हणाले, ‘‘आता तू साहित्याची काळजी घ्यायला शिकलास.’’ तेव्हा ‘साहित्य कसे वापरायचे याची आणि प्रत्येक वेळी मी योग्य ती काळजी घेत आहे ना, याची त्यांनी माझी परीक्षाच घेतली’, असे मला जाणवले.

– श्री. केदार नाईक, ढवळी, फोंडा, गोवा.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक