रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला भेट दिल्यानंतर श्री. आत्माराम कानू कोयंडे यांना जाणवलेली सूत्रे
‘रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करणारे श्री. प्रशांत कोयंडे यांची ‘वैष्णवी शांती’ विधी (५० वर्षे पूर्ण झाल्यानंतर करायचा विधी) ३.१.२०२५ या दिवशी करण्यात आली. त्या निमित्त त्यांचे मोठे चुलत बंधू श्री. आत्माराम कानू कोयंडे (वय ६४ वर्षे) आश्रमात ४ दिवस निवासासाठी आले होते. या कालावधीत त्यांना आश्रमातील नियोजन, व्यवस्था, वातावरण आणि साधक आदींविषयी जाणवलेली सूत्रे पुढे देत आहोत. श्री आत्माराम कोयंडे ‘लार्सन अँड टुब्रो’ या आस्थापनातून निवृत्त झाले आहेत. गेल्या २६ वर्षांपासून ते सद्गुरु वामनराव पै यांच्या ‘जीवन विद्या मिशन’ या संस्थेच्या माध्यमांतून साधना करत आहेत. या अंतर्गत साधनेचा प्रसार करण्याची, म्हणजेच ठिकठिकाणी प्रवचन करणे, सत्संग घेणे आदी सेवा ते करत आहेत.

१. दर्शन परमार्थ सोपानमार्गाचे !
या जगात सर्वव्यापी काळाची व्यवस्था, व्यवस्थारूपी निसर्गाचे नियम एकूणच परमेश्वरी व्यवस्थेने, भूतमात्रांना मिळालेले जीवन, त्यामध्येही प्रचंड बुद्धीमत्ता लाभलेले आणि विचाराचे स्वातंत्र्य मिळालेले ५ कर्मेंद्रिय, ५ ज्ञानेंद्रिये, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार ही ४ अतेंद्रिंये लाभलेले अलौकिक असे मानवी जीवन ही परमेश्वरी योजना हेतूपुरस्सर झालेली दिसते. ८४ लक्ष योनींपैकी आज विज्ञानाला केवळ ४० लक्ष योनींचे ज्ञान झाले, असे म्हटले जाते. यामध्ये एकमेव मानव जन्मच हाच जन्म परमेश्वर निर्मिती व्यवस्थेची अंतिम कलाकृती आहे.

हा मानवच विचार करू शकतो की, ‘माझा जन्म कशासाठी झाला ?, यामध्ये परमेश्वरी हेतू काय ?’ त्याला लाभलेल्या स्वाभाविक प्रगल्भतेने तो लौकिक जीवन जगत असतांना या अंतिम सत्याचा शोध घेऊ शकतो. भौतिक उत्कर्ष साधत उन्नत अवस्थेची वाटचाल करू शकतो. अज्ञानी लोक याचा अर्थ लावतांना नक्कीच स्वतःच्या सोयीचा अर्थ लावतात आणि त्यानुसार जीवन जगतांना दिसतात. काही जण ‘हे असेच चालणार’, असे समजून प्रवाहपतित जीवन जगतांना दिसतात. परमेश्वराने आपल्याला दिलेले बुद्धीचे वरदान आणि विचारांचे स्वातंत्र्य यांद्वारे अलौकिक असे मौल्यवान शरीर ज्या योगे ‘नराचा नारायण व्हायचे कि वानर व्हायचे ?’, हे त्यांना स्वतःला तर समजत नाहीच; परंतु ज्याला या मानवी जीवनाचा परमेश्वरी हेतू समजला, उमगला आहे किंबहुना साधनेने, तपस्येने संतपदाला सिद्ध होऊन स्वयं देव झालेल्या अशा महात्म्यांकडे, विभूतींकडे जाण्याचेही ते टाळतात. आपण स्वीकारलेले लौकिक किंवा व्यवहारी, मौजमजेला त्यामुळे सुरूंग लागेल, असे त्यांना वाटते. आपली परंपरा, संस्कृती, आपल्या अस्सल मातीतील संतांचे मार्गदर्शन, त्यांचे चरित्र, साहित्य आयुष्याची संध्याकाळ झाली, तरी पहात नाहीत; म्हणून जे मार्गदर्शन त्याला तरुणपणी मिळायला हवे, ते म्हातारपणी मिळूनही उपयोगाचे नसते. समर्थ म्हणतात,
बहुत जन्माचा सेवट । नरदेह सापडे अवचट ।।
येथे वर्तावें चोखट । निती न्यायें ।। – समर्थ रामदास स्वामी
अर्थ : आत्म्याला अनेक जन्म घेतल्यानंतर मानवजन्म प्राप्त होतो. हा जन्म मिळणे दुर्लभ आहे. मनुष्यदेह मिळणे सहजसोपे नाही; ते मोठ्या प्रयत्नांनंतर मिळते. या मनुष्यजन्मात आपले वर्तन शुद्ध, चोख आणि योग्य असावे. आपण नेहमी नैतिकता, सत्य आणि न्याय यांच्या मार्गाने वागावे.
नाना सुकृतांचे फळ। तो हा नरदेह केवळ।
त्याहिमध्ये भाग्य सफळ । तरीच सन्मार्ग लागे ॥ – समर्थ रामदास स्वामी
अर्थ : अनेक जन्मांच्या पुण्याईचे फळ म्हणूनच केवळ नरदेहाची प्राप्ती होते. त्यातही फार मोठे भाग्य उदयास आले, तरच मनुष्य सन्मार्गास लागतो.
नरदेहाचे उचित । कांहीं करावें आत्महित ।
येथानुशक्त्या चित्तवित्त । सर्वोत्तमीं लावावें ॥ – समर्थ रामदास स्वामी
अर्थ : नरदेहाचा यथोचित उपयोग करून आत्महित साधावे. आपापल्या कुवतीस अनुसरून आपले चित्त आणि वित्त त्या सर्वोत्तमाचे, म्हणजेच भगवंताच्या चरणी समर्पित करावे.
येथे संत, महात्मे, सद्गुरु म्हणतात,
आम्ही वैकुंठवासी । आलों याचि कारणासी ।
बोलिले जे ॠषी । साच भावें वर्ताया ।। १ ।।
झाडूं संतांचे मारग । आडरानें भरलें जग ।
उच्छिष्टाचा भाग । शेष उरलें तें सेवूं ।। – संत तुकाराम
अर्थ : आम्ही वैकुंठाचे वासी आहोत; परंतु आम्ही या भूतलावर ऋषिमुनींनी जे वचन सांगितलेले आहे, भक्ती आचरण कसे करावे त्याचे प्रत्यक्ष आचारण करून दाखवण्यासाठी आलो आहोत. संतांचे मार्ग आम्ही झाडून अज्ञानरूपी जे जंगल आहे, ते स्वच्छ करू.
किती वेळ जन्मा यावे किती वेळ फजित । – संत तुकाराम
अर्थ : किती वेळा जन्माला यावे आणि किती वेळा या संसार दुःखाने स्वतःजी फजिती करून घ्यावी ?
अशी आपली फजिती होऊ नये. असे वाटत असेल, तर आजही अशा संस्था, असे संत अस्तित्वात आहेत. आज आपले जीवन सर्वांगीण यथार्थ कृतार्थ ( Material as well as Spiritual Devlop – भौतिक, तसेच आध्यात्मिक विकास) होण्यासाठी आपल्या मनात थोडीतरी जिज्ञासा उत्पन्न व्हावी, असे वाटत असेल, तर प.पू. सद्गुरु डॉ. आठवले यांच्या सनातन आश्रमाला निश्चित भेट द्यायला हवी; अन्यथा आपले जीवन वाया गेले, असे म्हणावे लागले, तर ती अतिशयोक्ती होणार नाही.
२. सनातन आश्रमाला भेट देणे हे दैवी नियोजन !
मला आश्रम पहाण्याची इच्छा होतीच, या अगोदर प्रशांतसमवेत देवद, पनवेल येथील आश्रम पाहिला होता. ३१ डिसेंबर २०२४ ते ४ जानेवारी २०२५ या ५ दिवसांत मला सद्गुरूंच्या कृपेने सनातनच्या गोवा येथील रामनाथी आश्रमात रहाण्याचा योग आला. हा योगायोगच म्हणावा लागेल. २० ते २७ डिसेंबर २०२४ या काळात आमच्या सद्गुरूंच्या (सद्गुरु वामनराव पै यांच्या) कार्याची सेवा मिळाली होती. ही सेवा वेळापत्रकानुसार थोडी धावपळीची झाली. १०० कि.मी.च्या परिघात प्रवास करावा लागला. यात शारीरिकदृष्ट्या निवांतपणा मिळाला नाही. त्यामुळे ‘घरी परतल्यानंतर निवांतपणा मिळेल’, अशी मनात इच्छा होती. देवाने ती ऐकली आणि माझा लहान भाऊ श्री. प्रशांत कोयंडे याचा दूरभाष आला अन् त्याने मला त्याच्या ‘वैष्णवी शांती’ विधीसाठी आश्रमात येण्याचे आमंत्रण दिले. ‘घरातील कुणीतरी या विधीला उपस्थित रहावे’, अशी त्याची इच्छा होती. मला आश्रम पहाण्याची अनेक वर्षांची इच्छा होती. त्याच्या आमंत्रणानंतर माझ्या मनात किंतु आला की, पुन्हा इतका लांबचा प्रवास (देवगड ते गोवा अनुमाने १८० किलोमीटर) कसा करायचा ? आधीच पायाला चक्र लावल्याप्रमाणे ८ दिवस प्रवास केला होता. ‘साधकाची इच्छा पुरवल्याविना देव कसा राहील ?’, याचा प्रत्यय आला. रामनाथी आश्रमातून एक साधक एका साधकाच्या आईला सोडण्यासाठी देवगडला येणार होते आणि ते पुन्हा रामनाथी आश्रमात जाणार होते. याची माहिती मिळाली अन् परमपूज्यांनीच माझी सोय केली, असे मला जाणवले. देवगड ते गोवा असा प्रवास अत्यंत आध्यात्मिक स्तरावर चर्चा करत केला. दैवी कार्याला वाहून घेतलेल्या, प्रचंड आत्मविश्वास अन् सद्गुरूंप्रती भाव असलेल्या त्या साधकासह मी रामनाथी आश्रमात कसा पोचलो, ते कळलेच नाही. तेथे पोचल्याबरोबर सत् साधकांचा सहवास, आश्रमातील दैवी वातावरणाचे सान्निध्य यांमुळे शरिराचा थकवा आणि मनाचा क्षीण कुठच्या कुठे पळाला. शांत आणि निवांत झालो.
(क्रमश:)
– सद्गुरु चरणरज श्री.आत्माराम कानू कोयंडे, देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. (७.१.२०२५)
___________________________________________
लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/876142.html