स्वामी विवेकानंद यांच्या स्वदेश आणि स्वधर्म यांविषयीच्या हृद्य आठवणी

भारतातील बंगाल प्रांतात स्वामी विवेकानंद यांच्या रूपात एक तेजस्वी संन्याशी जन्माला आला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांनाच नरेंद्र गुरूंच्या शोधात फिरत होता. दक्षिणेश्वरला वास्तव्य करणारे रामकृष्ण परमहंस मात्र नरेंद्राची प्रतीक्षा करत होते. ज्याने ‘आपल्या गुरूंना कधीही पाहिले नाही, आपले गुरु कोण हेही ज्याला नीट माहिती नाही’, असा नरेंद्र गुरूंच्या शोधात फिरत होता; पण रामकृष्ण परमहंस यांनी आपल्या ज्ञानचक्षुंनी आपल्या शिष्याला पाहिले होते. लौकिक अर्थाने कोणत्याही प्रकारचे शिक्षण न घेतलेले रामकृष्ण परमहंस मात्र साक्षात्कारी असल्यामुळे गुरूंचे गुरु होते. अशा गुरूंचा आंग्ल विद्याविभूषित शिष्य नरेंद्र आध्यात्मिक विद्या आत्मसात् करण्यासाठी व्याकुळ झाला होता. आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘स्वामी विवेकानंद यांच्या स्वदेशाभिमानावरून दांभिकतेने विचारणा करणार्‍या व्यक्तीला त्यांनी दिलेले परखड उत्तर, ‘ब्राह्मो समाजा’चे प्रतापचंद्र मुजुमदार यांनी स्वामी विवेकानंद यांच्याविषयी पसरवलेला अपसमज आणि त्याचा झालेला परिणाम अन् अमेरिकेतील विदुषींनी (विद्वानांनी) स्वामी विवेकानंद यांची अपकीर्ती खोडून काढण्याविषयी केलेले लिखाण’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे दिला आहे.

लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/873549.html

५. स्वामी विवेकानंद यांनी सर्वधर्म परिषदेत सांगितलेली हिंदु धर्माची वैशिष्ट्ये आणि महानता

सर्वधर्म परिषदेत हिंदु धर्माचे वैशिष्ट्य सांगतांना स्वामी विवेकानंद यांची मुद्रा अभिमानाने फुलली होती. ‘जगात जे जे चांगले आहे, जे जे उत्तम आहे, त्या त्या सर्व गोष्टींचा स्वीकार करण्याची मानसिक आणि बौद्धिक विशालता हेच हिंदु धर्माचे वैशिष्ट्य आहे. ईश्वराप्राप्तीचे जगात अनेकविध मार्ग आहेत. या अनेक विविध मार्गांपैकी कोणत्याही मार्गाने ईश्वरप्राप्ती करता येते, अशी दृढ श्रद्धा हिंदु धर्माने निर्माण केली आहे. ‘केवळ माझाच धर्म श्रेष्ठ आहे. माझ्या देवावाचून इतरांच्या देवाची भक्ती करणे, हे पाप आहे. या भूतलावर केवळ माझाच धर्म आणि माझाच देव टिकला पाहिजे’, अशी राक्षसी महत्त्वाकांक्षा देणारा हिंदु धर्म नाही.

श्री. दुर्गेश परुळकर

‘पुष्पदंत’ या शिवभक्ताने ‘शिवमहिम्नस्तोत्र’ रचले. या स्तोत्रातील पुढील श्लोकात हिंदु धर्माची महानता, वैशिष्ट्ये मोजक्या आणि प्रभावी शब्दांत सांगण्यात आली आहेत.

रुचीनां वैचित्र्यादृजुकुटिल नानापथजुषाम् ।
नृणामेको गम्यस्त्वमसि पयसामर्णव इव ।।
– शिवमहिम्नस्तोत्र, श्लोक ७

अर्थ : आकाशातून वेगवेगळ्या ठिकाणी पडणारे पाणी ज्याप्रमाणे अखेर समुद्राला जाऊन मिळते, त्याप्रमाणे लोकांकडून निरनिराळ्या मनोभावांनी अनुसरले जाणारे पूजनाचे मार्ग सरळ असोत अथवा वक्र अखेर एकाच परमात्म्याला जाऊन मिळतात.

आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरम् ।
सर्वदेवनमस्कारः केशवं प्रति गच्छति ।।

अर्थ : जसे आकाशातून पडलेले पाणी समुद्राला मिळते, तसा सर्व देवांना केलेला नमस्कार विष्णूला मिळतो.

ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् ।
मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः ।।
– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ४, श्लोक ११

अर्थ : हे पार्था (अर्थात् पृथापुत्र अर्जुना), जे भक्त मला जसे भजतात, मीही त्यांना तसेच भजतो; कारण सर्वच मानव सर्व प्रकारे माझ्याच मार्गाचे अनुसरण करतात. हे असे दाखले हिंदु धर्माचे वैशिष्ट्य स्पष्ट करण्यास पुरेसे आहेत.

६. ‘ख्रिस्ती धर्म श्रेष्ठ आहे’, यावरून प्रश्न करणार्‍याला स्वामी विवेकानंद यांनी कठोर शब्दांत दिलेले उत्तर

स्वामी विवेकानंद यांनी अशा प्रकारे हिंदु धर्माची विशालता आणि वैचारिक उंची स्पष्ट केल्यानंतर एकाने त्यांना प्रश्न केला, ‘जर हिंदु धर्म एवढा चांगला आहे, तर मूठभर इंग्रजांनी तुमच्या देशावर सत्ता कशी प्रस्थापित केली ? ख्रिस्ती धर्म हा श्रेष्ठ आहे; कारण जगाच्या अधिकाधिक भागावर ख्रिस्ती धर्मियांची सत्ता आहे.’ हिंदु धर्म आणि संस्कृती यांचा आणि हिंदु राष्ट्राचा अभिमान असलेल्या स्वामी विवेकानंद यांनी प्रश्नकर्त्याला कठोर शब्दांत सुनावले,

‘एक गोष्ट लक्षात घ्या. राजकीय प्रभुत्व आणि धार्मिक श्रेष्ठत्व या दोन गोष्टींमध्ये महद्अंतर आहे. आम्ही पूर्वेकडील देशातून आलेले प्रतिनिधी येथे गेले काही दिवस रहात आहोत. आम्हाला असे सांगितले जाते आणि तेही एका श्रेष्ठत्वाच्या भूमिकेवरून की, आम्ही ख्रिस्ती धर्माचा स्वीकार करावा; कारण या धर्माची राष्ट्रे आज समृद्धीच्या शिखरावर आहेत. जगाकडे एक दृष्टीक्षेप टाकला की, सहज आढळून येते इंग्लंड हे राष्ट्र जगातील ख्रिस्ती राष्ट्रांत सर्वांत समृद्ध आहे. २५ कोटी आशियामधील जनतेच्या मानेवर त्यांच्या आधी सत्तेचे जोखड आहे. गत काळातील इतिहासात डोकावून पाहिले, तर असे आढळून येते की, युरोपच्या उत्कर्षाला स्पेनमुळे आरंभ झाला. स्पेनच्या समृद्धीस त्याने मेक्सिकोवर आक्रमण केले आणि तिथून आरंभ झाला. ज्यांना आपले बांधव मानावे, त्यांचे गळे कापून ख्रिस्ती धर्म आपला उत्कर्ष करून घेत आहे. अशा प्रकारची किंमत देऊन हिंदु कोणत्याही समृद्धीचा स्वीकार करणार नाही. जगातील संपूर्ण मानवीय समाजाला सुविद्य आणि सुसंस्कृत करण्याची उद्घोषणा ‘कृण्वन्तो विश्वमार्यम्’ (ऋग्वेद, मण्डल ९, सूक्त ६३, ऋचा ५ – संपूर्ण जगाला आर्य (सुसंस्कृत) करू) अशा शब्दांत वेदांनी केली आहे. हिंदु धर्म गळ्यात गळे घालून सद्भावनेने मैत्रभाव, बंधुभाव जागृत करून उत्कर्ष साधू इच्छितो. तुमच्याप्रमाणे गळे कापून उत्कर्ष साधण्याची क्रूरता हिंदु धर्मात नाही.’

७. स्वामी विवेकानंद यांनी हिंदुस्थानातील तरुणांना दिलेला संदेश

एका तरुणाने स्वामी विवेकानंद यांना अत्यंत आत्मीयतेने स्वतःची अडचण सांगितली. तो म्हणाला, ‘स्वामीजी मी विविध प्रकारे मन शांत करण्याचा प्रयत्न केला; पण मला शांती प्राप्त झाली नाही. एकाग्रतेने पूजा करू लागलो, ध्यानधारणा करण्याचा प्रयत्न केला, तरीही मन शांत झाले नाही. मी मनःशांती कशा प्रकारे संपादन करावी ? हा प्रश्न माझ्यासमोर आहे. कृपया आपण मला मार्गदर्शन करावे.’

साधकासाठी परोपकार, सेवा, दया यांचे महत्त्व

स्वामीजी त्या तरुणाला अत्यंत प्रेमाने म्हणाले, ‘तुझ्या आजूबाजूला कितीतरी लोक अत्यंत कष्टाने जीवन जगत आहेत, त्यांची तू सेवा कर. जे विविध प्रकारच्या आजारांनी त्रस्त झाले आहेत, त्यांच्या औषध-पाण्याची व्यवस्था कर. स्वतः त्यांची काळजी घेऊन सेवा कर. ज्यांना खायला अन्न-पाणी मिळत नाही, त्यांच्या अन्नपाण्याची व्यवस्था कर. अशा प्रकारे तू लोकसेवा करण्यास शिकलास की, आजूबाजूला असलेल्या अडाणी आणि अशिक्षित लोकांना शिकवण्याचा प्रयत्न कर. अशा प्रकारे आपल्या बांधवांची सेवा करत रहा. ती सेवा जनार्दनाच्या चरणी अर्पण कर. असे केले, तर तुला सहज शांती प्राप्त होईल.’

यावरून स्वामीजींना असे सांगायचे आहे की, साधकासाठी परोपकार, सेवा, दया या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. एका मार्गाचे खंडन केल्यास दुसरा मार्गही चिडकारला जातो. एका मार्गाचा स्वीकार केल्यास दुसर्‍याचाही स्वीकार केल्यावरून अन्य पर्याय रहात नाही.

दीनदुबळ्यांची सेवा, म्हणजे मोहमायेच्या पाशात अडकणे, असे जर वाटत असेल, तर हा दृष्टीकोन संकुचित आहे. आपण ईश्वराचे पुत्र आहोत. आपण दीनदुबळे नाही. असत्याकडून सत्याकडे, अज्ञानरूपी अंधाराकडून ज्ञानरूपी प्रकाशाकडे आणि मृत्यूकडून अमृताकडे प्रवास करणारे ज्योतिर्मय राज्याचे आपण नागरिक आहोत. अमृतपुत्र आहोत. या विचारापासून विचलित होऊ नका’, असा संदेश स्वामी विवेकानंद यांनी हिंदुस्थानातील तरुणांना दिला आहे. त्याचे स्मरण करत स्वामी विवेकानंद यांना कोटी कोटी प्रणाम करूया !

(समाप्त)

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (६.१.२०२५)