एखादे उत्पादन बनवतांना अन्य काही घटकांसह वनस्पती वापरली जाते, तेव्हा त्याला ‘हर्बल’ असे लेबल बर्याचदा लावले जाते, त्याहीपेक्षा सध्या चलनातील शब्द आहे ‘आयुर्वेद’ ! बर्याचदा एखादी वनस्पती घेऊन त्याचे घरगुती वापर लोकांपर्यंत कुठल्या तरी ऐकीव माहितीवर स्वतःचे उत्पादन खपावे म्हणून किंवा ‘व्ह्यूज’ मिळावे (लोकांनी प्रत्यक्ष बघणे) म्हणून पोचवले जातात. द्रव्य, आहार पदार्थ किंवा वनस्पती ही त्यांचे आयुर्वेदाचे गुण, रुग्णाची प्रकृती, व्याधी यांवर अवलंबून आणि आयुर्वेदाचा विचार करून आयुर्वेद वैद्याकडून दिली जाते, तेव्हा ते आयुर्वेद असते. थोडक्यात ‘हर्बल’ आणि आयुर्वेद यांमध्ये मूळ तफावत हा त्यामागच्या विचारांचा आहे.
अशा वेळी सजग रुग्ण म्हणून तुमचा दृष्टीकोन कसा पाहिजे ?
१. कुठल्याही ऐकीव माहितीवरून नियमाने पोटात घ्यायचे उत्पादन तरी मागवायची घाई करू नका. यात बर्याचदा ‘चेन मार्केटिंग’ (वितरकांची वितरण साखळी) असल्याने लाभाच्या विचाराने ही उत्पादने खपवली जात असतात.
२. फेसबुक, यू ट्यूब, व्हॉट्सॲप यांवर फिरणार्या आरोग्याच्या संदर्भातील लेखांच्या / ‘रीलस्’ (छोट्या ध्वनीचित्रफिती) या लेखकाचे शिक्षण, अनुभव आणि विश्वासार्हता बघून मग त्यावर विश्वास ठेवा.

३. वैद्य निवडतांना तुमच्या विश्वासाच्या माणसाला अनुभव आलेला पाहून निवडा. लोकांपर्यंत खरी माहिती पोचावी; म्हणून पूर्ण अभ्यास करून ही माहिती देणारे लोक अल्प आहेत, हे खेदाने म्हणावे लागेल.
४. अशा प्रकारच्या उत्पादनाचे विज्ञापन कुणी करत असतील, तर त्यांना प्रश्न विचारा. उत्पादनामध्ये असलेल्या गोष्टी काय आहेत, हे माहिती हवे. त्यांच्या बोलण्याच्या अधीन जाऊन वा भुलून महाग उत्पादने वापरत राहू नका.
५. घरातील ज्येष्ठ, श्रेष्ठ अनुभवी व्यक्ती सांगत असतात, ते विश्वसनीय वैद्यांकडून पडताळून घ्या. ‘कुमारी आसव’, ‘कुटजारिष्ट’ आणि ‘विडंगारिष्ट’ या लहान मुलांमध्ये घराघरांत सर्रास वापरल्या जाणार्या औषधांच्या कार्याचे क्षेत्र थोडे वेगळे आहे, जे त्याचा अभ्यास केलेली वैद्य व्यक्ती नीट सांगू शकते.
६. ‘हर्बल’, म्हणजेच आयुर्वेद आणि सगळे ‘हर्बल प्रॉडक्ट’, म्हणजेच ‘साईड इफेक्ट’ (दुष्परिणाम) नसणारा आयुर्वेदच आहे’, हा विचार मात्र डोक्यातून पूर्णपणे काढा. आयुर्वेदाला अनेक पैलू आहेत. कुठल्या तरी पद्धतीत वनस्पती वापरली की झाले काम, असे नाही. त्याने स्वतःच्याच आरोग्याची हानी आहे.
चुकीच्या पद्धतीत माहिती प्रसारित होत असतांना त्यावर विसंबून, त्यातील अभ्यास नसलेल्या व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून लोकांचे आणि पर्यायाने समाजाच्या आरोग्याची हानी होऊ नये, हे महत्त्वाचे !
– वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये, यशप्रभा आयुर्वेद, पुणे. (१६.१.२०२५)