स्वामी विवेकानंद यांच्या स्वदेश आणि स्वधर्म यांविषयीच्या हृद्य आठवणी

१२ जानेवारी या दिवशी स्वामी विवेकानंद यांची १६२ वी जयंती झाली, त्या निमित्ताने…

स्वामी विवेकानंद

भारतातील बंगाल प्रांतात स्वामी विवेकानंद यांच्या रूपात एक तेजस्वी संन्याशी जन्माला आला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांनाच नरेंद्र गुरूंच्या शोधात फिरत होता. दक्षिणेश्वरला वास्तव्य करणारे रामकृष्ण परमहंस मात्र नरेंद्राची प्रतीक्षा करत होते. अशा गुरूंचा आंग्ल विद्याविभूषित शिष्य नरेंद्र आध्यात्मिक विद्या आत्मसात् करण्यासाठी व्याकुळ झाला होता. आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘स्वामी विवेकानंद यांच्या स्वदेशाभिमानावरून दांभिकतेने विचारणा करणार्‍या व्यक्तीला त्यांनी दिलेले परखड उत्तर अन् ‘ब्राह्मो समाजा’चे प्रतापचंद्र मुजुमदार यांनी स्वामी विवेकानंद यांच्याविषयी पसरवलेला अपसमज आणि त्याचा झालेला परिणाम’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.

श्री. दुर्गेश परुळकर

३. स्वामी विवेकानंद यांच्या विरुद्ध मिशनरी लोकांनी चालू केलेल्या अपप्रचाराविषयी सर हिरॅम मॅक्झिम यांचे भाष्य

विख्यात ‘मॅक्झिम गन’चे जनक सर हिरॅम मॅक्झिम आणि स्वामी विवेकानंद यांचे सलोख्याचे संबंध होते. स्वामी विवेकानंद यांच्या समाधीनंतर वर्ष १९१० च्या संधीला मॅक्झिम यांनी ‘इन हंग चांगज सेराप्स बूक’ या नावाचा ग्रंथ प्रकाशित केला. यात त्यांनी स्वामी विवेकानंद यांच्या विरुद्ध अमेरिकेतील मिशनरी लोकांनी जो अपप्रचार केला त्याविषयी लिहिले, ‘अमेरिकेतील प्रोटेस्टंट पंथाच्या मंडळींना असे वाटले होते की, सर्वधर्म परिषदेत आपल्या पंथाचे श्रेष्ठत्व प्रस्थापित होणार आहे; पण त्यांना असे आढळून आले की, स्वामी विवेकानंद यांच्या रूपाने आपली गाठ वनराज केसरीशीच पडली आहे. आशियातील हीनदीन, गोरगरीब पतितांचा उद्धार करावा; म्हणून तेथे काही भोळ्या भाबड्या संन्यासिनी आणि अर्धवट शिकलेले प्रचारक वर्षानुवर्षे पाठवले जात होते. त्यासाठी प्रतिवर्षी लाखो डॉलर्सची रक्कम व्यय केली जात होती; पण ख्रिस्ती धर्माचे वारेही न पोचलेल्या या तथाकथित अज्ञानी देशातून असा एक पुरुष येथे येऊन पोचला होता की, धर्म, तत्त्वज्ञान याविषयीचे त्याचे ज्ञान अमेरिकेतील सार्‍या लोकांच्या आणि मिशनर्‍यांच्या ज्ञानाहून अधिक होते. लोक विचार करू लागले की, या पुरुषाशी तुलना करता आपण प्रचारासाठी पाठवतो, त्या मिशनर्‍यांना धर्माची काहीही माहिती नसते. अशा लोकांना त्या देशात पाठवून आपण आपला पैसा व्यर्थ का व्यय करायचा ?’

४. अमेरिकेतील विदुषींनी (विद्वानांनी) स्वामी विवेकानंद यांची अपकीर्ती खोडून काढण्याविषयी केलेले लिखाण

अ. स्वामी विवेकानंद यांची अपकीर्ती करणारी एक वार्ता श्रीमती बॅग्ले यांच्या कानावर गेली. त्यांनी तात्काळ त्या विरोधात स्वामी विवेकानंद यांची अपकीर्ती कशी तथ्यहीन आहे, ते स्पष्ट करतांना एका पत्रात लिहिले, ‘स्वामी विवेकानंद हे माझ्या घरी अनेक दिवस राहिले आहेत. त्यांच्याविषयी आमच्या सर्वांच्या मनात निरतिशय आदराची भावना आहे. ‘He is a strong noble human being; one who walks with God. He is simple and trustful as a child.’ (आशय : स्वामी विवेकानंद ही एक सामर्थ्य संपन्न, उदात्त हृदयाची आणि जणू परमेश्वराचा हात धरून मार्गक्रमण करणारी श्रेष्ठ विभूती आहे. त्यांचे सारे बोलणे, वागणे एखाद्या लहान मुलासारखे निर्मळ निरागस आहे. कुणाच्याही मनात विश्वासाचा भाव निर्माण करणारे.)

आ. श्रीमती एस्.के. ब्लॉगेट नावाच्या एक विदुषी सर्वधर्म परिषदेला उपस्थित होत्या. त्यांनी स्वामी विवेकानंद यांचे पहिल्या दिवशीचे भाषण ऐकले होते. स्वामी विवेकानंद दुसर्‍यांदा जेव्हा अमेरिकेला गेले, तेव्हा ते लॉस एंजलिस येथे श्रीमती ब्लॉगेट यांच्या घरीच काही दिवस राहिले होते. काही वर्षांनी ब्लॉगेट यांच्याकडे श्रीमती मॅक्लिअड गेल्या, तेव्हा ब्लॉगेट यांच्या घरात असलेल्या स्वामी विवेकानंद यांच्या पूर्णाकृती छायाचित्राकडे बोट करून मॅक्लिअड म्हणाल्या, ‘If ever there was a God on earth, that is the man’ (आशय : माणसाच्या रूपात भगवान कधी या भूतलावर अवतरला असेल, तर तो या महापुरुषाच्या रूपाने होय.)

(क्रमशः)

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (६.१.२०२५)

____________________________________________________

लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा –https://sanatanprabhat.org/marathi/873809.html