बलात्काराच्या घटनांमध्ये मुंबई प्रथम !
नागपूर – राज्यातील प्रमुख ५ शहरांत वर्ष २०२४ मध्ये बलात्काराच्या २ सहस्र ३२९ घटना घडल्या आहेत. यामध्ये पहिल्या क्रमांकावर मुंबई कायम असून पुणे दुसर्या क्रमांकांवर लागतो. ठाणे आणि नागपूर यांचा अनुक्रमे तिसरा आणि चौथा क्रमांक लागतो. ही माहिती पोलिसांच्या संकेतस्थळावरील वार्षिक आकडेवारीतून समोर आली.
संपादकीय भूमिका : राज्याची आर्थिक राजधानी बलात्कारांत पुढे असणे लाजिरवाणे !
२ युवतींचा अपघाती मृत्यू !
नवी मुंबई – सकाळी ६.४५ वाजता रात्रपाळी करून घरी परतणार्या संस्कृती खोकले (वय २२ वर्षे) आणि अंजली पांडे (वय १९ वर्षे) यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. त्या विरुद्ध दिशेने दुचाकीवरून येत होत्या. समोरून भरधाव वेगाने येणार्या चारचाकीने त्यांना धडक दिली. यात दुचाकीचालक संस्कृती जागीच ठार झाली, तर अंजलीला रुग्णालयात भरती करण्यात आले; पण उपचार चालू असतांना तिचा मृत्यू झाला.
पतंगाचा मांजा गळ्यात अडकून दुचाकीस्वार घायाळ !
वसई – पतंगाचा मांजा गळ्यात अडकून दुचाकीस्वार विक्रम डांगे गंभीर घायाळ झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. गळा चिरला गेल्याने त्यांना ९ टाके पडले. दुचाकीचा वेग अल्प असल्याने अनर्थ टळला. विक्रम डांगे हे मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते आहेत.
नागपूर येथे १८ लाख रुपये किमतीचा अवैध नायलॉन मांजा नष्ट !
मांजावरून बुलडोझर फिरवला
नागपूर – येथे १८ लाख रुपये किमतीचा अवैध नायलॉन मांजा पोलिसांनी त्यावर बुलडोझर फिरवून नष्ट केला आहे. अवैध नायलॉन मांजा विक्री करणार्यांवर पोलिसांनी कारवाईही केली आहे. (नायलॉन मांजावर बंदी असतांना तो विक्रीसाठी येतोच कसा ? विक्री करणार्यांवर पोलिसांनी काय कारवाई केली, हे जनतेसमोर यायला हवे ! – संपादक)
तरुणाकडून सुरक्षा बलाच्या सैनिकाच्या हाताचा चावा !
वसई – अपंगांच्या डब्यात चढलेल्या नशेत असलेल्या तरुणाने त्याला खाली उतरण्यास सांगणार्या सुरक्षा बलाच्या सैनिकाच्या हाता-पायाचा चावा घेतला. त्याला डब्यातून बाहेर काढण्यात सुरक्षा बलाच्या सैनिकांना पुष्कळ प्रयत्न करावे लागले. वसई रोड रेल्वेस्थानकात ही घटना घडली.
७१४ पैकी ३९ सायबर गुन्हे उघड !
ठाणे – ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात वर्षभरात विविध पोलीस ठाण्यांत ७१४ सायबर संदर्भातील गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे; पण यात केवळ ३९ गुन्हे उघड करण्यात आले असून उर्वरित गुन्ह्यांचे अन्वेषण चालू आहे. (सायबर गुन्ह्यांची वाढती संख्या पहाता पोलीस यावर नियंत्रण मिळवण्यासाठी कधी उपाययोजना काढणार ? – संपादक)
संपादकीय भूमिका : इतक्या अल्प प्रमाणात गुन्हे उघड होणे हे ठाणे पोलिसांचे अपयश नव्हे का ?