विशाळगडावरील अतिक्रमण दूर करण्यासाठी भाजपच्या खासदारांनी लक्ष घालावे !

हिंदुत्वनिष्ठांची खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे मागणी

खासदार श्री. धनंजय महाडिक (मध्यभागी) यांच्या समवेत हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी

कोल्हापूर, ७ जानेवारी (वार्ता.) – विशाळगडावर अद्यापही ५० पेक्षा अधिक अतिक्रमणे शिल्लक असून ती निघण्यासाठी भाजपचे खासदार श्री. धनंजय महाडिक यांनी लक्ष घालावे, तसेच तेथे होणार्‍या ऊरूसाला अनुमती देऊ नये, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधींनी भाजपचे खासदार श्री. धनंजय महाडिक यांना भेटून केली. या प्रसंगी अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या स्थापनेस १ वर्ष पूर्ण होत असल्याविषयी लवकरच एक कार्यक्रम घेण्यात येणार असून त्यासाठी खासदारांना निमंत्रित करण्यात आले.

या प्रसंगी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे सहसंयोजक श्री. अभिजित पाटील, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, हिंदु एकता आंदोलनाचे शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, शिवसेनेचे श्री. अर्जुन आंबी, हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. राजू तोरस्कर, महाराजा प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. निरंजन शिंदे यांसह अन्य उपस्थित होते.