Prayagraj Kumbh Parva 2025 : ज्योतिर्मठाच्या वतीने महाकुंभमेळ्यामध्ये ‘गो-प्रतिष्ठा महायज्ञा’चे आयोजन !

प्रयागराज कुंभपर्व २०२५

प्रयागराज, ६ जानेवारी (वार्ता.) – हिमालयमधील बद्रिकाश्रम ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद सरस्वती यांच्या वतीने महाकुंभमेळ्यामध्ये ‘गो-प्रतिष्ठा महायज्ञा’चे आयोजन करण्यात आले आहे. १५ जानेवारी ते १४ फेब्रुवारी या कालावधीत हा महायज्ञ होणार आहे. या महायज्ञामध्ये ३२४ यज्ञकुंड सिद्ध करण्यात येत आहेत. महायज्ञासाठी देशभरातून २ सहस्र १०० ब्रह्मवृंद येणार आहेत.

‘गो-प्रतिष्ठा महायज्ञा’साठी उभारण्यात आलेली यज्ञशाळा

याविषयी अधिक माहिती देतांना शंकराचार्य अविमुक्तेश्‍वरानंद सरस्वती यांचे शिष्य मुकुंदानंद ब्रह्मचारी यांची ‘सनातन प्रभात’चे मुख्य वार्ताहर प्रीतम नाचणकर यांनी भेट घेतली.

त्या वेळी ते म्हणाले की,

१. गोमातेला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी शासनाने प्रथम प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी प्रथम गोहत्या बंद होणे आवश्यक आहे.

२. गोमातेच संरक्षण व्हावे, यासाठीच ‘गो-प्रतिष्ठा महायज्ञा’चे आयोजन करण्यात आले आहे. या यज्ञाद्वारे देवतांना आहुती देण्यात येणार आहे. यामुळे गो संरक्षणासाठी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतील.

यज्ञासाठी उभारण्यात आलेली यज्ञकुंडे

३. सध्या संकरित गोवंशांची पैदास केली जात आहे. हे अशास्त्रीय आहे. तथाकथित दुग्धक्रांतीच्या वेळी संकरित गोवंशांची पैदास करण्यात आली. यामुळे दूध वाढले; मात्र हे दूध विषासमान आहे. ज्याप्रमाणे वेदनाशामक गोळीने तात्पुरते वेदनांचे शमन होते; मात्र त्याचे शरिरावर दुष्परिणाम होतात. त्याचप्रमाणे हे आहे. जर्सीसारख्या संकरित वंशांचे दूधही विषासमान आहे. याविषयीचे अनेक शोधनिबंध इंटरनेटवरही पहायला मिळतात.

४. भारतीय गोवंश हाच सर्वार्थाने लाभदायक आहे. प्राचीन भारतामध्ये प्रत्येक हिंदूच्या घरात गोमाता होती. हिंदू गोग्रास देत होते. स्वत: प्रभु श्रीराम आणि श्रीकृष्ण गोदान करत होते.

५. गोमाता केवळ दूध देत नाही, तर आपले सर्वार्थाने पालन करते. गोसवंर्धन व्हावे आणि गोमातेला राष्ट्रमाता म्हणून दर्जा प्राप्त व्हावा, यासाठी बद्रिकाश्रमाद्वारे जागृती केली जात आहे.

जगद्गुरु शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्‍वरानंदजी यांचे ९ जानेवारीला कुंभक्षेत्री होणार आगमन !

जगद्गुरु शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्‍वरानंदजी

जगद्गुरु शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्‍वरानंदजी ९ जानेवारी या दिवशी कुंभक्षेत्रात प्रवेश करणार आहेत. ते माघ अमावास्येपर्यंत कुंभमेळ्यामध्ये सनातन धर्मप्रचाराच्या अंतर्गत गोमाता संरक्षण, तसेच मंदिरांची सुरक्षितता यांविषयी मार्गदर्शन करणार आहेत. यासाठी महाकुंभमेळ्यामध्ये ‘परमधर्मसंसदे’चे आयोजन करण्यात आले आहे. या धर्मसंसदेमध्ये जगभरातून १००८ मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.