दोषमुक्‍तीसाठी प्रा. आनंद तेलतुंबडे यांची मुंबई उच्‍च न्‍यायालयात याचिका प्रविष्‍ट !

शहरी नक्षलवादाचे प्रकरण

प्रा. आनंद तेलतुंबडे

मुंबई – शहरी नक्षलवादाशी संबंधित प्रकरणातून दोषमुक्‍त करण्‍याच्‍या मागणीसाठी प्रा. आनंद तेलतुंबडे यांनी उच्‍च न्‍यायालयात धाव घेतली आहे. मुंबई उच्‍च न्‍यायालयाने दिलेला जामीन सर्वोच्‍च न्‍यायालयानेही कायम ठेवल्‍यानंतर तेलतुंबडे यांनी दोषमुक्‍तीच्‍या मागणीसाठी उच्‍च न्‍यायालयात याचिका प्रविष्‍ट केली आहे. न्‍यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्‍या अध्‍यक्षतेखालील खंडपिठापुढे प्रा. तेलतुंबडे यांची याचिका सुनावणीसाठी आली होती; परंतु ‘या याचिकेवर सुनावणी घेऊ शकत नाही. अन्‍य खंडपिठापुढे याचिका सादर करा’, असे न्‍यायमूर्ती कोतवाल यांनी स्‍पष्‍ट केले.

याच प्रकरणाशी संबंधित काही आरोपींच्‍या जामीन याचिकेवर एकलपीठ म्‍हणून आपण सुनावणी घेतली आहे. त्‍यामुळे ‘या याचिकेवर अन्‍य खंडपिठापुढे सुनावणी व्‍हावी’, असे न्‍यायमूर्ती कोतवाल यांनी उपरोक्‍त सूचना करतांना नमूद केले.

राष्‍ट्रीय अन्‍वेषण यंत्रणा कायद्यांतर्गत स्‍थापन विशेष न्‍यायालयाने मे २०२४ मध्‍ये तेलतुंबडे यांची दोषमुक्‍तीची मागणी फेटाळली होती. या निर्णयाला प्रा. तेलतुंबडे यांनी उच्‍च न्‍यायालयात आव्‍हान दिले आहे.