चिकित्सक आणि आरोग्यतज्ञ यांचे म्हणणे आहे की, योग्य प्रकारे उपवास करणे आरोग्यासाठी अत्याधिक लाभदायक आहे. उपवासाचा मूळ उद्देश शरिरातील विषारी तत्त्वांचे निरसन करून शरीर स्वस्थ बनवणे, हा आहे. ‘आहारं पचति शिखी दोषान् आहारवर्जितः ।’,
म्हणजे ‘पोटातील अग्नी हा आहार पचवण्याचे कार्य करतो, तर उपवास आहारातील दोष पचवतो.’ उपवासामुळे पचन शक्ती वाढते. उपवास काळात शरिरामध्ये नवीन मल उत्पन्न होत नाही आणि जीवन शक्तीला जुना साचलेला मळ बाहेर काढण्यासाठी संधी मिळते. मल-मूत्र विसर्जन सम्यक होऊ लागते. त्यामुळे शरिरामध्ये हलकेपणा येतो. आयुर्वेदाच्या दृष्टीतून शारीरिक आणि मानसिक विकार अन् रोग यांमध्ये उपवास करणे हितकारक मानले गेले आहे.
१. शारीरिक विकार
अजीर्ण, उलटी, मंदाग्नी, जडपणा, लठ्ठपणा, बद्धकोष्ठता, तोंड येणे इत्यादी व्याधींमध्ये लहान किंवा मोठ्या रूपात रोगानुसार उपवास करणे लाभदायक असते. त्यामुळे पचन व्यवस्थेला विश्रांती मिळते.
२. मानसिक विकार
मनावरही उपवासाचा पुष्कळ प्रभाव पडतो. त्यामुळे चित्तवृत्ती शांत होते. उपवासामुळे सात्त्विक भाव वाढतो. रज-तमाचा नाश होऊ लागतो, तसेच मनोबल आणि आत्मबल यांमध्ये वाढ होऊ लागते.
३. उपवासाचे प्रकार सामान्यतः उपवास पुढील प्रकारे केले जातात.
अ. निराहार : निराहार व्रतामध्ये भोजन किंवा व्रतासंबंधी अन्न ग्रहण मुळीच केले जात नाही. निराहार व्रत हे निर्जल आणि सजल उपवास अशा २ प्रकारचे असते. निर्जल व्रतामध्ये पाणीही प्यायले जात नाही. सजल व्रतामध्ये कोमट पाणी किंवा कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून घेऊ शकतो. त्यामुळे पोटात वायू (गॅस) होत नाही.
आ. फलाहार आणि दुग्धाहार : यामध्ये फळे आणि केवळ फळांचा रसच घेतला जातो. उपवासासाठी डाळींब, द्राक्षे, सफरचंद, पपई योग्य मानले जाते. याच्यासह कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून घेऊ शकतो. लिंबामुळे पचन व्यवस्था चांगली होण्यास साहाय्य होते. उपवासामध्ये दिवसातून ३ ते ५ वेळा साय काढलेले दूध घेणे, हा उत्तम आहार मानला जातो.
इ. रूढीप्रमाणे उपवास : २४ घंट्यांत एकदा साधे आणि हलके भोजन करावे. या एक वेळच्या भोजनाच्या व्यतिरिक्त कोणतेही पदार्थ घेऊ नये. केवळ साधे पाणी किंवा कोमट पाण्यात लिंबाचा रस घेऊ शकतो.
४. घ्यावयाची काळजी
उपवासामुळे पचन व्यवस्था शिथिल होते; म्हणून जेवढे दिवस उपवास करणार, तेवढे दिवस मुगाचे पाणी घ्यावे. नंतर मूग डाळ, त्यानंतर मुगाची खिचडी, भात इत्यादी आणि शेवटी सर्वसाधारण भोजन करायला हवे. अशा प्रकारे भोजन केल्यामुळे पचन व्यवस्थेवर एकदम भार पडत नाही. उपवासाच्या नावावर बटाटा, अळू, केळी, सामोसे, भजी, शिंगाड्याचा हलवा, खीर इत्यादी पदार्थ आणि पचायला जड भोजन पोटभर खाल्ल्यामुळे शरिरात रोग बळावू शकतो. आत्मिक आणि शारीरिक लाभ मुळीच होत नाही.
उपवासाचे एवढे अधिक महत्त्व असल्यामुळे त्याला धार्मिक महत्त्व दिले गेले आहे. तसे पहाता जेव्हा परमात्म्याचे ध्यान करायचे असेल, तर निराहार राहिल्यामुळे शरिरात मल-मूत्र आणि अत्यधिक तहान यांसारखे वेग लागणे अन् अन्य उपद्रव उत्पन्न होत नाहीत, ज्यामुळे ईश्वर भक्तीमध्ये तल्लीनता वाढते.’
– पंडित वेदप्रकाश शास्त्री
(साभार : मासिक ‘गीता स्वाध्याय’, वर्ष १२)