तात्याराव (स्वातंत्र्यवीर सावरकर), कशाला या देशात जन्म घेतला ?

‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’च्या माहितीपत्रिकेवर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र न घेतल्याचे प्रकरण !

सावरकर, तुम्ही का या देशात जन्माला आला ? तुमच्या कार्याची इथे कुणालाही किंमत नाही, जाण नाही. सावरकर, तुम्ही पुरस्कार केला तो हिंदुत्वाचा ! आणि आता देशात कधी नव्हे, इतक्या जोराने हिंदुत्वाचे वारे वाहू लागल्यामुळे तर कायम ‘धर्मनिरपेक्षते’चे गोडवे गाणारे तुमचा अपमान करण्याची एकही संधी सोडणार नाहीत. अनुमाने १० सहस्र पानांची साहित्य निर्मिती आणि अनुमाने १२ सहस्र ओळींची काव्य निर्मिती करूनही तुमच्या साहित्यातील योगदानाकडे दुर्लक्ष करत तुम्हाला साहित्य संमेलनात स्थान नाकारले जाते, ते तुम्ही जहाल गटाचे होतात असल्या बेगडी कारणाने ! जहाल कोट्यातून एका व्यक्तीला, म्हणजे लोकमान्य टिळक यांना स्थान दिले ना ? मग आणखी सावरकर कशाला ?

स्वातंत्र्यवीर सावरकर

१. सावरकर यांनी मराठी भाषाशुद्धी चळवळ करूनही त्यांना साहित्य संमेलनात का स्थान द्यावे ?

सावरकर तुम्ही इतके कसे हो दुर्दैवी ? तुम्हाला जिवंतपणी अवहेलना सोसावी लागलीच; पण मरणानंतरही तुमचे भोग संपू नयेत ? पण खरे दुर्दैवी आम्ही आहोत की, आम्ही तुमच्या विचारांवर देश चालवू शकलो नाही. तुम्ही म्हणत होता, ‘जातीच नकोत, अस्पृश्यता नको’; पण या मंडळींनी तुम्हालाच ब्राह्मण म्हणून अस्पृश्य ठरवत वाळीत टाकले आहे. तुम्ही मराठीवरील परकीय भाषांचे आक्रमण थोपवण्यासाठी भाषाशुद्धी आंदोलन चालवले. त्या वेळीही प्रारंभीला तुमची हेटाळणीच झाली; पण कालांतराने मत परिवर्तन होऊन माधव ज्युलियन यांच्यासारखे कवी भाषाशुद्धीचा पुरस्कार करू लागले. हुतात्मा, महापौर, दिग्दर्शक, छायाचित्रण, बाह्यचित्रण असे असंख्य शब्द भलेही तुम्ही मराठी भाषेला दिले असले, तरी त्यासाठी त्यांनी तुम्हाला साहित्य संमेलनात का स्थान द्यावे ?

सौ. मंजिरी मराठे

२. सर्व काही केवळ स्वार्थासाठीच !

तुमची ब्राह्मणी भाषाच त्यांनी प्रमाण का मानावी ? ‘मराठीत इंग्रजी शब्द घुसडून मराठी भाषा विद्रूप करू; पण तुमची ब्राह्मणी भाषा वापरणार नाही’, हा त्यांचा बाणा. ही साम्यवादी विचारसरणी. देशाचे भवितव्य, अस्तित्व, देशाचे वैभव यांच्याशी त्यांना काही देण-घेण नाही. ते हिंदू असले, तरीही स्वतःची पोळी भाजण्यासाठी त्यांना हिंदुत्व नको. त्यामुळे ‘हिंदुत्वाचे प्रणेते’ सावरकरही नकोच आहेत. (हिंदूंचे अस्तित्वच संपले की, साम्यवादी असो कि उजवे, सगळेच संपणार आहेत, हे यांना कळत नसेल का ?) ब्रिटीश  त्यांचे आदर्श आहेत. त्यांनी दिलेला ‘फोडा आणि राज्य करा’, हा मंत्र ते मनापासून पाळत आहेत. त्यामुळे जातीपातीत समाजाचे विभाजन करणे, हे त्यांचे आद्यकर्तव्य आहे आणि त्याचे आद्यकेंद्र बारामतीत आहे.

३. सावरकर यांच्यामुळे हिंदुस्थानची साहित्य संपदा टिकली; म्हणून त्यांना साहित्य संमेलनात स्थान द्यायचे का ?

सावरकर, तुम्ही ‘लेखण्या मोडून बंदुका हाती घ्यायला सांगितल्या’; कारण ती त्या काळाची आवश्यकता होती. सैनिकीकरणाच्या पुरस्कारासाठी तुम्ही तुमची लेखणी आणि वाणी तलवारीसारखी चालवली. ब्रिटिशांचे ‘रिक्रूटवीर’ (भरतीवीर) म्हणून हिणवले जाऊनही, सावरकर तुम्ही केलेल्या हिंदूंच्या सैनिकीकरणामुळे फाळणीनंतर हिंदुस्थानचे अस्तित्व आणि भारतीय साहित्य टिकू अन् बहरू शकले; पण म्हणून का तुम्हाला त्यांनी साहित्य संमेलनात स्थान द्यायचे ?

४. एक दिवस निश्चितच सावरकर यांच्या विचारांवर आधारित समर्थ हिंदु राष्ट्र निर्मिती होईल !

भलेही तुम्ही प्रज्ञावंत लेखक, महाकवी, नाटककार आणि वक्ता दशसहस्रेषु आहात, असेल तुमचे साहित्य क्षेत्रातील योगदान, तरी त्यांना (निधर्मीवाद्यांना, जातीचे राजकारण करणार्‍यांना) तुम्ही साहित्य संमेलनातच काय कुठेच नको आहात; कारण तुम्ही हिंदुत्वनिष्ठ आहात. बहुसंख्य (?) हिंदूंच्या या देशात हिंदुत्वनिष्ठ असणे, हे पाप आहे. तुमचे विचार अधिकाधिक लोकापर्यंत पोचू लागले, तर ‘गजवा ए हिंद’चे (काफीरांना ठार करण्यासाठीचे युद्ध) स्वप्न चक्काचूर होऊन इथे हिंदु राष्ट्र होईल’, या भीतीनेच ते तुम्हाला विरोध करतात. त्यामुळेच साहित्य संमेलनातच काय, इतर कुठेही तुम्हाला मान मिळणार नाही, हे आता आम्हाला कळून चुकले आहे.

अर्थात् तुम्हाला कसलीच अपेक्षा नसली, तरी या देशात तुमचा सन्मान होण्याऐवजी अपमानच होतो, याची आम्हाला खंत आहे; पण एक दिवस निश्चितच असा येईल, ‘हा देश पूर्णपणे तुमच्या विचारांवर चालेल आणि समर्थ हिंदु राष्ट्र निर्माण होईल.’

– सौ. मंजिरी मराठे, कोषाध्यक्षा, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठान, मुंबई. (३०.१२.२०२४)


हे ही वाचा → स्वातंत्र्यवीर सावरकरांविना साहित्य संमेलन, म्हणजे सुरांवाचून संगीत !