स्वातंत्र्यवीर सावरकरांविना साहित्य संमेलन, म्हणजे सुरांवाचून संगीत !

आगामी वर्षात होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ या ३ दिवसांत देहली येथे होणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव या साहित्य संमेलनातून पूर्णपणे गायब केले गेले आहे. कोणत्याही महाद्वाराला वा व्यासपिठाला सावरकर यांचे नाव देण्यात आलेले नाही. संयोजकांनी ‘जहाल गटाचे म्हणून लोकमान्य टिळक यांचे आणि मवाळ गटाचे म्हणून नामदार गोखले’ यांचे नाव दिले आहे; म्हणून सावरकर यांचे नाव दिले नाही’, असा अजब पवित्रा घेतला आहे !

या पार्श्वभूमीवर आधारित असलेला लेख…

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमंत्रणपत्रिकेचे छायाचित्र

१. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग प्रखर बुद्धीच्या, म्हणजेच सरस्वतीमातेला साक्षी ठेवून स्वीकारणे

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्वतःला ‘छत्रपती शिवरायांचा निष्ठावंत मावळा’, असे समजून सशस्त्र क्रांतीचा मार्ग निवडला. त्यांच्याप्रमाणेच शपथबद्ध होऊन भारतमातेला परदास्याच्या शृंखलेतून मुक्त करण्यासाठी स्वतःचे संपूर्ण आयुष्य समर्पित केले. सावरकर केवळ क्रांतीकारक नव्हते, तर ते महाकवी आणि नाटककारही होते. भारतमातेची सेवा करता करता त्यांनी सरस्वतीमातेलाही प्रसन्न करून घेतले होते. किंबहुना ‘ही सरस्वतीमाता सावरकर यांना भारतमातेच्या मुक्ततेसाठी सशस्त्र लढा देण्याची प्रेरणा देत होती’, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. भारतमातेवर उत्कट प्रेम करणारे सावरकर हे भावनाप्रधान होऊन क्रांतीकार्यात सहभागी झाले नव्हते. त्यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग प्रखर बुद्धीच्या साक्षीने निवडला होता. हा विचार सरस्वतीमातेला साक्षी ठेवून प्रकट केलेला आढळतो तो या पुढील काव्यपंक्तीतून……

की घेतले व्रत हे न अम्ही अंधतेने ।
लब्धप्रकाश इतिहास-निसर्ग माने ।
जे दिव्य दाहक म्हणूनि असावयाचे ।
बुद्ध्याचि वाण धरिले करि हे सतीचे ।।

हे मातृभूमी तुजला मन वाहियेले ।
वक्तृत्व वाग्विभवही तुज अर्पियेले ।
तूतेचि अर्पिली नवी कविता रसाला ।
लेखाप्रती विषय तूचि अनन्य झाला ।।

२. अनेक क्रांतीकारकांना सिद्ध करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर

सावरकर स्वतःप्रमाणेच दुसर्‍याला घडवत होते. त्यांनी केलेला हा यशस्वी प्रयत्न जगातील सार्‍याच लोकांना अचंबित करणारा होता. भारतमातेच्या सुटकेसाठी व्रतस्थ असलेल्या या आपल्या पुत्राच्या मस्तकावर सरस्वतीमातेने वरदहस्त ठेवला होता; म्हणूनच सरस्वतीमातेच्या या प्रांगणात द्रष्टेपणा धारण करून सावरकर महाकवी, वक्ता, लेखक, समाजसुधारक अशा विविध भूमिकांमध्ये मुक्तपणे संचार करत राहिले. त्यांच्या तेजस्वी वाणीने मदनलाल धिंग्रा यांना अंतर्बाह्य पालटून राष्ट्रकार्यात सहभागी करून घेतले. एवढेच नव्हे, तर ब्रिटिशांच्या राजधानीत ‘शत्रूला कंठस्नान घालणारा पहिला क्रांतीवीर’ म्हणून इतिहासात मदनलाल धिंग्रा यांना अजरामर केले. अशा प्रकारे लाला हरदयाळ, व्ही.व्ही.एस्. अय्यर, सेनापती बापट असे एक ना अनेक क्रांतीकारक सावरकर यांच्या सहवासात भारतमातेच्या मुक्ततेसाठी तळहातावर शीर घेऊन लढण्यास सिद्ध झाले.

चिमण्यांचेही ससाणे करण्याची क्षमता असणारा सरस्वतीमातेचा पुत्र अशी सावरकर यांची आपल्याला ओळख करून देता येईल. त्यांच्या हातातील लेखणी अत्यंत तेजस्वी होती. त्या लेखणीने सशस्त्र क्रांतीकारकांची मांदियाळी निर्माण केली. स्वातंत्र्य मंदिराची कोनशिला बसवणारा पहिला शिलेदार होता मदनलाल धिंग्रा, तर नेताजी सुभाषचंद्र बोस होते त्या मंदिराचा कळस !

श्री. दुर्गेश परुळकर

३. स्वातंत्र्यशाहिरावाचून साहित्य संमेलन, म्हणजे पिकलेल्या शेतातील कणसांना दाणेच नसणे !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्वतःच्या लेखणीने, वाणीने आणि विचारांनी आपल्या बांधवांची राष्ट्रीय अस्मिता जागवली. त्यांच्यात चैतन्य निर्माण केले. नम्रता निश्चित चांगली आहे. तो गुण आहे; पण परकीय आक्रमकांसमोर झुकणे, हा षंढपणा आहे. हा आपल्या पूर्वजांचा केलेला अपमान आहे. लेखणीसमवेत शस्त्र हाती धरून अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी मनगटात बळ देणारे सावरकर हे खर्‍या अर्थाने स्वातंत्र्यशाहीर होते. या शाहिरावाचून साहित्य संमेलन, म्हणजे शेत पिकले आहे, सुंदर कणसे वार्‍यावर डुलत आहेत; पण त्या कणसांमध्ये दाणेच नाहीत.

संकटकाळामध्ये ज्याला आपल्या पूर्वजांचे स्मरण रहात नाही आणि जो आपल्या वीरवृत्तीला सोडून जातो तो कितीही श्रेष्ठ कवी, वक्ता, लेखक, पंडित असला, तरीही त्याचे कवित्व, वक्तृत्व, लिखाण अन् त्याचे पांडित्य कवडी मोलाचे ठरते.


हे ही वाचा → तात्याराव (स्वातंत्र्यवीर सावरकर), कशाला या देशात जन्म घेतला ?


४. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची विलक्षण प्रतिभा

आपल्या मातेसमान वहिनीला पत्रातून सावरकर कळवतात… ‘आपण भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र लढा देण्याचे महान कार्य हाती घेतले आहे. त्या कार्याला अनुरूप असे श्रेष्ठ वर्तन आपल्याला संकटकाळात ठेवावे लागणार आहे. आपले वर्तन असे असले पाहिजे की, ते आपल्या संतांना, आपल्या पूर्वजांना अभिमानास्पद वाटेल.’ अंदमानात भयंकर यातना सहन करतांनाही त्यांच्या डोळ्यांतील आसवांना त्यांच्या ओठावरचे गाणे कधीही पुसून टाकता आले नाही; म्हणूनच त्या काळकोठडीतही विविध प्रकारची संकटे, यातना सहन करतांनाही त्यांच्या लेखणीतून ४ महाकाव्ये साकारली आहेत. याचा आपल्याला विसर पडता कामा नये. सावरकर यांची प्रतिभा सर्वसामान्य कवींच्या प्रतिभेप्रमाणे ‘डोळ्यांमधले आसू पुसती ओठांवरले गाणे’, एवढी लेचीपेची नाही.

भाषाप्रभु पु.भा. भावे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी काढलेले उद्गार !

स्वातंत्र्यवीर सावरकर, म्हणजे पारतंत्र्याच्या तिमिरात अखंड जळत रहाणारा तेजस्वी दीप होता. म्हणूनच भाषाप्रभु पु.भा. भावे सावरकरांवर लिहिलेल्या मृत्यूलेखात म्हणतात… ‘तो दिवा जळत होता. नुसता जळत होता, तेही आमच्यासाठी पुष्कळ होते. त्या दिव्याकडे बोट दाखवून आम्हाला म्हणता येत होते, त्याला म्हणतात दिवा ! त्याला म्हणतात पेटत रहाणे, पेटवणे ! त्याला म्हणतात लढणे ! अनंत अंधाराशी अखंड लढणे ! नुसत्या आपल्या अस्तित्वानेही दिव्याने केलेला तो झगडा, केलेले ते मार्गदर्शन, दिलेले तेजोदान ! त्याला म्हणतात दिवा ! त्याला म्हणतात सावरकर ! तेजाचा त्यांचा वंश ! त्यागाचा त्यांचा वंश ! तिमिरनाश ही त्यांची स्वाभाविक क्रिया ! अग्नीची त्यांची जात कुळी, असुर संहार हा त्यांचा कुळधर्म ! देशप्रेम हा त्यांचा कुळाचार ! धर्मप्रेम हा त्यांचा जातीस्वभाव ! त्याला म्हणतात दिवा ! देशाचा दिवा ! धर्माचा दिवा ! वंशाचा दिवा ! पांडित्याचा दिवा ! कर्तव्याचा दिवा ! शौर्याचा दिवा ! सेवेचा दिवा ! सुधारणेचा दिवा ! काव्याचा दिवा ! साहित्याचा दिवा ! कलेचा दिवा ! त्याला म्हणतात दिवा ! जळणारा दिवा, जाळणारा दिवा, उजळणारा दिवा ! सर्वांगानी चेतणारा, परोपरीचा प्रकाश देणारा दिवा ! त्या दिव्याचे नाव हिंदुहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर !’ अशा दिव्यावाचून होणारे साहित्य संमेलन अंधारातील साहित्य संमेलन ठरेल.

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर

५. सावरकर यांनी रवींद्रनाथ ठाकूर यांच्यासाठी लिहिलेल्या काव्यातून सरस्वतीमातेच्या उपासनेसह क्रांतीकार्य करण्याविषयी सांगणे

रवींद्रनाथ ठाकूर यांना श्रेष्ठ वाङ्मयासाठी ‘नोबेल’ पारितोषिक घोषित करण्यात आले, ही वार्ता अंदमानात कोलू फिरवणार्‍या सावरकरांपर्यंत पोचली. ही आनंदवार्ता कानावर पडताच त्यांनी रवींद्रनाथांचे अभिनंदन करणारी कविता रचली. या कवितेच्या पहिल्या कडव्यात सावरकर लिहितात…‘भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी जे युद्ध पेटले होते त्या युद्धाच्या अग्नीरथात बसून सावरकर प्रवास करत आहेत. त्या वेळी त्यांच्या समवेत अनेक साहित्यिकही त्या अग्नीरथातून प्रवास करत आहेत. सगळ्यांच्या मुखातून रणघोषांची गर्जना होत आहे; पण युद्धाचा हा अग्नीरथ चालवण्यासाठी त्यात इंधन घालणे हे महत्त्वाचे काम आहे. ते इंधन घालण्यास कुणीही पुढे सरसावत नाही. असे पाहून स्वातंत्र्यदेवीने आपल्याला आज्ञा केली की, तू या समररूपी अग्नीरथात कोळशाचे इंधन घाल. तिच्या आज्ञेप्रमाणे मी ते कार्य करण्यास पुढे सरसावलो.’

सरस्वतीमातेची सेवा

सावरकर यांनी या कडव्यातून स्वतःच्या कार्यावर प्रकाश झोत टाकला आहे. कितीही कष्ट सहन करावे लागले, तरी सरस्वतीमातेची सेवा करता करता आपल्याला भारतमातेलाही परदास्याच्या शृंखलेतून मुक्त करायचे आहे. तसाच प्रसंग आला, तर सरस्वतीमातेची उपासना बाजूला सारून हे कार्य करावे लागले, तरी त्यासाठी आपण सिद्ध असले पाहिजे.

६. साहित्यिकांना ‘लेखण्या मोडा आणि बंदुका घ्या’, असा संदेश देणारे स्वातंत्र्यवीर सावरकर !

छत्रपती शिवरायांनी सुद्धा सरस्वतीची उपासना न करता दुर्गामातेची उपासना करून हातात शस्त्र धारण केले. परकियांच्या जोखडातून आपल्या मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी लेखणीऐवजी तलवार परजली होती. छत्रपती शिवरायांचा हाच आदर्श सावरकर यांनी डोळ्यांसमोर ठेवला आणि साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारल्यावर ‘लेखण्या मोडा आणि बंदुका घ्या’, असा संदेश आपल्या बांधवांना दिला. ‘आपल्या उत्तमोत्तम कवितांच्या प्रेमात पडून परकीय आक्रमक आपल्याला स्वातंत्र्य बहाल करणार नाहीत’, हे सावरकर ओळखून होते; म्हणून त्यांनी देश स्वातंत्र्यासाठी लेखणीपेक्षा शस्त्रच उपयुक्त ठरते. या वास्तवतेचे दर्शन घडवले.

७. साहित्य संमेलनात सावरकर यांचा सन्मान न होणे, म्हणजे थोर भारतीय परंपरेचा अपमानच !

आजही आपला संपूर्ण देश चारही बाजूंनी घेरला गेला आहे. ‘आपले स्वातंत्र्य, सार्वभौमत्व अबाधित राखणार्‍या सावरकरांसारखे तेजस्वी विचार कृतीत आणणे आणि भारतमातेचे रक्षण करणे यांसाठी सर्वांनी सज्ज असले पाहिजे’, असा संदेश देणे महत्त्वाचे आहे. आपली साहित्यिक, सांस्कृतिक, राजकीय, ऐतिहासिक परंपरा टिकून रहावी, असे वाटत असेल, तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ज्याप्रमाणे त्यांच्या साहित्याचे उद्यान फुलवले आणि ती अमर परंपरा पूजली, याचे स्मरण आपल्याला झाले पाहिजे. त्याच्याकडे पाठ फिरवून सावरकर यांचा योग्य तो सन्मान या साहित्य संमेलनात केला गेला नाही, तर तो केवळ त्यांचाच अपमान होईल, असे नाही, तर आपल्या थोर भारतीय परंपरेचा अपमानही त्यात सामावलेला असेल; म्हणून या आयोजित केल्या जाणार्‍या साहित्य संमेलनात सावरकर यांना कोणतेही स्थान दिले जात नसेल, तर ते ‘साहित्य संमेलन म्हणजे सुरांवाचून असलेले संगीत ठरेल.’

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (२१.१२.२०२४)

संपादकीय भूमिका

क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष यांचा यथोचित सन्मान होण्यासाठी भारतात ‘हिंदु राष्ट्र’ असणे अपरिहार्य !