मामूदझौ (मेयोट) – सर्वांत शक्तीशाली चक्रीवादळ ‘चिडो’ हे फ्रान्सच्या मेयोट बेटावर धडकले असून आतापर्यंत या चक्रीवादळात सहस्रो लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. एका वरिष्ठ स्थानिक फ्रेंच अधिकार्याच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आले आहे.
गेल्या शतकभरातील सर्वांत भीषण चक्रीवादळ ‘चिडो’ २०० किमी प्रतिघंट्यापेक्षा अधिक वेगाच्या सोसाट्याच्या वार्यासह मेयोट बेटावर आदळले. यामध्ये जीवितहानीसह घरे, सरकारी इमारती आणि रुग्णालये यांची मोठी हानी झाली आहे, असे मामूदझौचे महापौर अंबदिलवाहेदौ सौमैला यांनी सांगितले. ‘चिडो’ चक्रीवादळ कोमोरोस बेटांवरही धडकले आहे. त्यानंतर हे चक्रीवादळ मोझांबिकमध्ये धडकले. तिथे तीन जणांचा मृत्यू झाला आहे.