केंद्र सरकारने लोकसभेत दिली माहिती
नवी देहली – वर्ष २०२३ मध्ये परदेशात ८६ भारतियांवर आक्रमणे करण्यात आली. यात काही जणांची हत्या करण्यात आली. यांपैकी सर्वाधिक घटना अमेरिकेत घडल्या, अशी माहिती परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह यांनी लोकसभेत दिली. खासदार संदीप पाठक यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती देण्यात आली.
राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार वर्ष २०२१ मध्ये परदेशात आक्रमण झालेल्या भारतियांची संख्या २९ होती. यानंतर वर्ष २०२२ मध्ये ही संख्या ५७ वर पोचली. वर्ष २०२३ मध्ये अमेरिकेत १२ भारतियांवर आक्रमण किंवा त्यांची हत्या झाली, तर कॅनडा, ब्रिटन आणि सौदी अरेबिया येथे ही संख्या प्रत्येकी १० होती.
राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह म्हणाले की, परदेशातील भारतियांची सुरक्षा हे केंद्र सरकारच्या अग्रक्रमांपैकी एक आहे. आम्ही यावर बारकाईने लक्ष ठेवतो. तसेच अशा घटनांची यजमान देशाच्या संबंधित अधिकार्यांकडून तात्काळ नोंद घेतली जाते. ही सूत्रे संबंधित देशांच्या सरकारी अधिकार्यांसमवेतच्या बैठकींमध्येही उपस्थित केले जातात. प्रकरणांचा योग्य अन्वेषण केले जाते आणि गुन्हेगारांना शिक्षा होते’, असा दावा त्यांनी उत्तरात केला.
२ लाख १६ सहस्र २१९ भारतियांनी नागरिकत्व सोडले !
अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात सरकारने संसदेला सांगितले की वर्ष २०२३ मध्ये २ लाख १६ सहस्र २१९ भारतियांनी नागरिकत्व सोडून अन्य देशांचे नागरिकत्व घेतले. सरकारच्या आकडेवारीनुसार वर्ष २०२२ मध्ये ही संख्या २ लाख २५ सहस्र ६२० इतकी होती.
संपादकीय भूमिकादेशात आणि विदेशांत किती हिंदूंवर ते ‘हिंदू’ आहेत; म्हणून आक्रमणे झाली, त्यांची हत्या झाली किंवा हिंदु महिलांवर बलात्कार झाले, इस्लामी देशांत किती हिंदूंवर अत्याचार झाले, किती हिंदूंना धर्मांतर करावे लागले, त्यांच्या मंदिरांवर आक्रमणे झाली ?, यांची माहितीही सरकारने गोळा करून हिंदूंना सांगितली पाहिजे ! |