मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सुनावले खडे बोल !
मुंबई : मुंबई शहरात सगळीकडेच अवैध फेरीवाल्यांचा उपद्रव वाढला आहे. फेरीवाल्यांचा हा उपद्रव न्यून करण्यासाठी पावले उचलावीत, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकार यांना दिला होता; मात्र त्यानंतरही कारवाई न झाल्यामुळे ‘जर कायद्याद्वारे तुम्हाला फेरीवाल्यांना हटवता येत नसेल, तर लोकांना कायदा हातात घेऊ द्या आणि त्यांना काय करायचे, ते करू द्या’, असे खडे बोल मुंबई उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा राज्य सरकारला सुनावले आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीसमोरील रस्त्यावर अवैध फेरीवाले हटवण्याचा आदेश देण्यात आल्यानंतर मुंबई महानगरपालिकेने फेरीवाल्यांना हटवलेही होते; पण फेरीवाले पुन्हा परतणार नाहीत, याची काळजी घेण्यात मुंबई पोलीस अपयशी ठरल्यामुळे खंडपिठाचे न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खटा यांनी खेद व्यक्त केला. उच्च न्यायालयासमोर एक पोलीस चौकी आहे. तिथेच अवैध फेरीवाले आहेत, याकडेही बोट दाखवून खंडपिठाने खेद व्यक्त केला.