अहिल्यानगरच्या ह.भ.प. सुश्री रेणुका निसळ यांचे आजपासून ग्वाल्हेर येथे संगीत दत्त कथा निरूपण !

ह.भ.प. सुश्री रेणुका निसळ

अहिल्यानगर, ७ डिसेंबर (वार्ता) : दत्त जयंतीनिमित्त ८ डिसेंबरपासून ग्वाल्हेर येथील ‘लाला का बाजार’ परिसरातील अन्वेकर दत्त मंदिर येथे नगरची कन्या ह.भ.प. सुश्री रेणुका निसळ यांचे ब्रह्मा विष्णु महेश कथा आणि रामकथेचे संगीत निरूपण आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती ‘प्राचीन संस्कृती संवर्धन मंडळा’चे संस्थापक अध्यक्ष श्री. बापू ठाणगे यांनी दिली. या कथेच्या आरंभी ढोल, सनई, नगारा आणि बँड यांच्या वादनात बग्गीमध्ये युवा कथाकार यांना बसवून कलश मिरवणूक काढण्यात येणार आहे. ही कलश यात्रा दत्त मंदिरात पोचल्यावर कथाकार आणि मान्यवर यांच्या उपस्थितीत कलश स्थापना सोहळा होईल. प्रतिदिन दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत कथा निरूपण करण्यात येईल. १४ डिसेंबर या दिवशी दत्त जन्मकथा निरूपण होणार आहे.

ह.भ.प. सुश्री रेणुका निसळ यांचा परिचय !

ह.भ.प. सुश्री रेणुका निसळ

ह.भ.प. सुश्री रेणुका या अहिल्यानगर येथील विख्यात पुरोहित वे.मु. सिद्धेश्वर निसळ यांच्या ज्येष्ठ कन्या आहेत. बालपणापासूनच त्यांच्यावर पौरोहित्य आणि धार्मिक संस्कार झाले आहेत. बालवयापासूनच त्यांनी कथा निरूपण, श्लोक पठण, भगवद्गीत यांसह विविध धर्मग्रंथ पठण पाठांतर आदी उपक्रमांमध्ये सहभागी होऊन मान्यवरांची वाहवा मिळवली आहे. अयोध्या येथील स्पर्धेत भगवद्गीतेचे ७०० श्लोक मुखोद्गत केल्याबद्दल तिचा विशेष सत्कार करण्यात आला. श्री क्षेत्र काशी येथे आयोजित स्पर्धेत तिने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे, तसेच श्री क्षेत्र अयोध्या येथील अखिल भारतीय स्पर्धेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला आणि संपूर्ण भारत देशातून पहिला येण्याचा मानही प्राप्त केला. बालपणापासूनच त्या गोसेवक आहेत. त्या पाककलेतही निपुण आहेत आणि त्यांनी उपाहारगृह, तसेच ‘ब्युटी पार्लर’मध्ये न जाण्याचा संकल्पही केला आहे. त्या धर्मकार्यात सदैव सहभागी असतात.