Canadian Survey Of India : कॅनडातील केवळ २६ टक्के लोक भारताविषयी सकारात्मक !

जस्टिन ट्रुडो यांच्या नेतृत्वात भारतासमवेतचे संबंध सुधारणार नसल्याचे ३९ टक्के लोकांचे मत !

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो

ओटावा (कॅनडा) – ‘अँगस रीड इन्स्टिट्यूट’ आणि कॅनडातील ‘एशिया पॅसिफिक फाउंडेशन’ यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार भारत आणि कॅनडा यांच्यातील चालू असलेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर कॅनडातील केवळ २६ टक्के लोकांचा भारताविषयी सकारात्मक दृष्टीकोन आहे, असे समोर आले आहे. वर्ष २०२० मध्ये हे प्रमाण ५६ टक्के होते.

१. सर्वेक्षणात ३९ टक्के नागरिकांचा असा विश्‍वास होता की, जोपर्यंत जस्टिन ट्रुडो कॅनडाचे पंतप्रधान आहेत, तोपर्यंत भारताशी संबंध सुधारणार नाहीत. ३४ टक्के लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी असाच विचार करतात.

२. ३९ टक्के नागरिकांचे असे मत आहे की, ट्रुडो सरकार भारतासमवेतचे संबंध चांगल्या प्रकारे हाताळू शकले नाही, तर ३२ टक्के लोकांचे मत उलट होते. २९ टक्के लोकांचे याविषयी स्पष्ट मत नव्हते.

३. तणावपूर्ण संबंध असूनही ६४ टक्के लोक मानतात की, कॅनडाने भारतासमवेत पुन्हा व्यावसायिक संवाद चालू करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. लोकांच्या या विचारामागील मुख्य कारण म्हणजे कॅनडाच्या निर्यातीवर २५ टक्के शुल्क लादण्याची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिलेली धमकी आहे.

४. कॅनडामध्ये भारताकडे अजूनही रशिया आणि चीन यांच्यापेक्षा अधिक सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिले जाते, असेही या सर्वेक्षणातून समोर आले आहे; मात्र भारतावर त्यांचा विश्‍वास केवळ २८ टक्के आहे.

५. कॅनडामध्ये वर्ष २०२५ मध्ये संसदीय निवडणुका होणार आहेत आणि विरोधी कंझर्व्हेटिव्ह पक्ष विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. लोकांच्या मते, जर कंझर्व्हेटिव्ह पक्ष विजयी झाला, तर पियरे पॉइलीव्हरे कॅनडाचे पंतप्रधान होतील, ज्यामुळे द्विपक्षीय संबंध पुन्हा सुधारण्याची संधी मिळेल.

संपादकीय भूमिका

यामुळेच कॅनडात भारतियांवर विशेषतः हिंदूंवर होणार्‍या आक्रमणांविषयी स्थानिक जनता आवाज उठवत नाही, हे लक्षात येते. असे असेल, तर भारताला अधिक विचार करावा लागेल !