‘एक दिवस शिवरायांच्या सान्निध्यात’ मोहिमेअंतर्गत युवकांना राष्ट्र-धर्माप्रती कृतीशील करण्याची मोहीम !
मुंबई – ‘एक दिवस शिवरायांच्या सान्निध्यात’ या मोहिमेअंतर्गत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २४ नोव्हेंबर या दिवशी वसई येथील अर्नाळा दुर्ग येथे मोहीम पार पडली. छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांचे दैदीप्यमान शौर्य, राष्ट्र अन् धर्म यांसाठी त्यांचे योगदान हिंदु युवक आणि युवतींच्या मनात बिंबवणे, तसेच वर्तमानकाळात हिंदूसंघटनाचे महत्त्व, राष्ट्र-धर्म यांप्रती असलेल्या दायित्वाची जाणीव करून देण्याच्या उद्देशाने समिती मोहीम राबवत आहे. या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत अर्नाळा येथे पुष्कळ जणांनी मोहिमेत सहभाग घेतला.
इतिहास अभ्यासक श्री. निनाद पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मोहीम निर्विघ्न पार पडण्यासाठी प्रार्थना करण्यात आली. गडाच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला समितीचे युवा संघटक श्री. महेश लाड यांनी पुष्पहार अर्पण करून केला. निनाद पाटील यांनी उपस्थितांना गडाची माहिती दिली. नरवीर चिमाजीअप्पा, पेशवे आणि मावळे यांनी गाजवलेले अभूतपूर्व शौर्य अन् राष्ट्र रक्षणासाठी केलेला संघर्ष कथन केला. ‘शौर्याचा आणि संघर्षाचा अभ्यास युवा पिढीला असणे आवश्यक आहे. सर्वत्र हिंदूंवर होणार्या आक्रमणांपासून हिंदु समाजाचे रक्षण करण्यासाठी शिवरायांसारखी स्वराज्याची शपथ घेऊन राष्ट्र-धर्माच्या कार्यात सहभागी व्हायला हवे’, असे ते म्हणाले. तेथे स्वच्छता करण्यात आली. मंदिर परिसरात बसून सामूहिक नामजप करण्यात आला. त्यानंतर स्वसंरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके दाखवून त्याचे प्रशिक्षण देण्यात आले. समितीचे युवा संघटक श्री. महेश लाड यांनी उपस्थितांना ‘धर्मकार्याची दिशा’ या विषयावर संबोधित केले. सामूहिकरित्या हिंदु राष्ट्राची शपथ घेऊन मोहिमेची सांगता झाली.
वैशिष्ट्यपूर्ण !
मोहिमेत लहान मुले आणि वयस्करही सहभागी झाले होते. एक श्वान मोहिमेच्या प्रारंभीपासून मोहिमेत चालत होता. श्री. सुयश सावंत यांनी पोवाडे आणि शौर्यगीते म्हणत मोहिमेतील उत्साह वाढवला. |
अभिप्राय
१. गर्दीच्या ठिकाणी जायला मला भीती वाटायची. स्वसंरक्षण प्रशिक्षण शिकल्याने भीती निघून गेली. – कु. आर्या वैती, नालासोपारा
२. समितीच्या उपक्रमातील नियोजन आणि शिस्त मला प्रेरित करते. – श्री. सचिन पवार, परळ
३. मी अनेक गडदुर्ग सुरक्षा मोहिमेत सहभागी असतो; पण समितीचे कार्य कृती आणि अध्यात्म यांच्या स्तरावरचे असते. – श्री. सुयश सावंत