आळंदीत इंद्रायणी नदीची स्वच्छता करण्याची भोसरी येथील ज्ञानाई भजनी मंडळाच्या महिलांची मागणी !

प्रतिकात्मक चित्र

आळंदी (जिल्हा पुणे) – येथील सिद्धबेट बंधारा ते स्मशानभूमीपर्यंतच्या भागात इंद्रायणी नदीची स्वच्छता करावी. त्याचप्रमाणे वारकर्‍यांचे आरोग्य जपण्यासाठी संपूर्ण इंद्रायणी घाट स्वच्छ करा, अशी मागणी भोसरी येथील ज्ञानाई भजनी मंडळाच्या महिलांनी आळंदी नगर परिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्याकडे केली आहे. ज्ञानाई महिला भजनी मंडळाच्या अलका काळे यांनी सांगितले की, कार्तिक यात्रेत प्रशासनाने इंद्रायणीची स्वच्छता नियमित करावी. जेणेकरून वारकर्‍यांना अस्वच्छ नदीपात्रात जावे लागणार नाही. याचसह इंद्रायणी घाटावर अनेक विक्रेचे पथारी मांडून बसतात. यामुळे भाविकांना स्नानासाठी वाट काढून जावे लागते, याचसह कचराही होतो. हे टाळण्यासाठी स्वच्छतेची मागणी महिला मंडळाने केली आहे.

संपादकीय भूमिका :

‘नदीची स्वच्छता करा’, इतकी प्राथमिक गोष्टही सांगावी लागणार्‍या प्रशासनाचा पांढरा हत्ती पोसायचाच कशाला ? अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाने स्वतःहून नदीची स्वच्छता करणे आवश्यक आहे !