रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील चैतन्याचा साधकावर झालेला परिणाम आणि त्याने अनुभवलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा !

श्री. सचिंद्र चंदूरकर

१. रामनाथी आश्रमात गेल्यानंतर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती 

‘वर्ष २०१९ मध्ये एका शिबिरात सहभागी होण्याच्या निमित्ताने मला रामनाथी (गोवा) येथे सनातनच्या आश्रमात जाण्याची संधी मिळाली. मी प्रथमच रामनाथी आश्रमात आलो होतो.

अ. शिबिराच्या अंतिम दिवशी माझी भावजागृती झाली. तेव्हा ‘गुरुदेवांचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) माझ्या जीवनात असण्याचे महत्त्व आणि माझ्या जीवनाचे ध्येय’, यांची मला जाणीव झाली. मला शिबिराच्या वेळी आध्यात्मिक शक्तीची अनुभूती आली.

आ. मी ध्यानमंदिरात बसून नामजप करण्यापूर्वी डोळे बंद केले. त्या वेळी मी ‘एका वेगळ्याच विश्वात आहे’, असे अनुभवले. माझ्या मनाला आनंद आणि चिरशांती अनुभवता आली.

२. रामनाथी आश्रमातून चैतन्य ग्रहण केल्यानंतर घरी गेल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

अ. मी शिबिर संपल्यानंतर घरी गेल्यावर प्रत्येक क्षणी मला आश्रमातील मंत्रमुग्ध करणारे दिवस आठवत होते.

आ. माझ्या अंतर्मनातून ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप अखंड होत होता. जणू काही सूक्ष्मातून ‘श्री गुरुदेव दत्त’ माझ्या समवेत आहेत’, असे मला जाणवत असे.

३. वाईट शक्तींच्या आक्रमणाचा आलेला अनुभव आणि अनुभवलेली गुरुकृपा

३ अ. काजूच्या बागेच्या भोवती असलेले कुंपण उद्ध्वस्त होणे; मात्र आश्रमात मिळालेल्या दैवी ऊर्जेमुळे निराश न होणे : मी आश्रमातून घरी आल्यावर मला वाईट शक्तींच्या आक्रमणाचा अनुभव आला. वाईट शक्तींनी आमच्या काजूच्या बागेच्या भोवती असलेले कुंपण संपूर्णपणे उद्ध्वस्त केले होते, तरीही मी निराश झालो नाही. माझ्या समवेत आश्रमात शिबिराच्या वेळी मिळालेली सकारात्मक दैवी ऊर्जा सतत होती.

३ आ. ‘एक दैवी शक्ती कुंपण कसे बांधावे ?’, हे सांगत आहे’, असे जाणवणे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे कुंपण बांधतांना चिडचिड न होता आनंद अनुभवणे : मी कुंपण पूर्ववत् बांधण्यासाठी प्रयत्न करत होतो. ‘ते कुंपण पुन्हा बांधणे’, हे एका व्यक्तीचे काम निश्चितच नव्हते, तरीही गुरुकृपेमुळे मी एकटाच ते कुंपण बांधत होतो. तेव्हा माझ्या मनात प्रश्न होता, ‘कुंपणाची दुरुस्ती मी कुठून आरंभ करू ?’ त्याच वेळी माझ्या अंतर्मनातून आवाज आला, ‘प्रथम तो पडलेला खांब उचलून उभा कर.’ ‘जणू काही ‘कुंपण कसे बांधावे ?’, ही गोष्ट मला एक दैवी शक्ती सांगत आहे’, असे मला जाणवले. नंतर मी संपूर्ण कुंपण त्या दैवी शक्तीच्या सांगण्यानुसार बांधले. मला ऐकू येणारा तो अदृश्य आवाज अत्यंत आनंददायी होता. जणू साक्षात् श्री गुरुदेव दत्त माझ्याशी बोलत होते.

बागेच्या भोवती कुंपण बांधतांना माझ्या चेहेर्‍यावर थोडीही उद्विग्नता नव्हती किंवा माझी चिडचिड होत नव्हती. उलट मी ते कार्य सेवाभावाने करतांना आनंद अनुभवत होतो. माझ्यासाठी आणि माझ्या पत्नीसाठी हा फारच वेगळा अनुभव होता. ही घटना आठवून मी आजही तो आनंद अनुभवतो. ही परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा आहे.

४. प्रार्थना आणि कृतज्ञता 

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा आमच्या कुटुंबावर अखंड राहू दे’, अशी मी त्यांच्या पावन चरणी प्रार्थना करतो. ‘परात्पर गुरु डॉक्टरांमुळेच मला साधनेचा मार्ग मिळाला’, त्याबद्दल मी त्यांच्या श्रीचरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. सचिंद्र स. चंदूरकर, वाटुळ, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी. (९.७.२०२४)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक