Nijjar Murder Case : भारत किंवा पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात कोणताही पुरावा नाही ! – ट्रुडो सरकार

कॅनडातील खलिस्तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येचे प्रकरण

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो, खलिस्तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्जर व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी

ओटावा (कॅनडा) – हरदीप सिंह निज्जर याच्या कॅनडामध्ये झालेल्या हत्येच्या प्रकरणी जस्टिन ट्रुडो यांच्या नेतृत्वाखालील कॅनडाचे सरकारचे पितळ पुन्हा एकदा उघडे पडले आहे. या हत्येच्या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या विरोधातील आरोपांच्या समर्थनार्थ कॅनडाकडे कोणताही पुरावा नसल्याचे ट्रुडो सरकारने मान्य केले आहे. ट्रुडो सरकारने सांगितले की, त्यांना अद्याप याविषयी कोणतीही माहिती मिळालेली नाही. खलिस्तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येसाठी ‘ग्लोब अँड मेल’ वृत्तपत्राने भारताला दोषी ठरवल्यानंतर कॅनडाच्या सरकारचे हे विधान आले आहे.

१. हरदीप सिंग निज्जर हा खलिस्तानी समर्थक होता आणि त्याच्यावर भारतातील आतंकवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याचा आरोप होता. जून २०२३ मध्ये कॅनडातील ब्रिटीश कोलंबिया येथे त्याची हत्या करण्यात आली होती.

२. तेव्हापासून कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी निज्जर याच्या हत्येत भारतीय संस्थांचा सहभाग असल्याचा आरोप सातत्याने करत आहेत.

३. कॅनडाचे आरोप भारताने वेळोवेळी फेटाळत कॅनडातील खलिस्तानी कारवायांना आळा घालण्यात कॅनडा सरकार अपयशी ठरल्याचे भारताने म्हटले होते.

४. ‘ग्लोब अँड मेल’च्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, कॅनडाकडे भारतीय अधिकार्‍यांचा गुन्हेगारी कारवायांशी संबंध असल्याचा पुरावा आहे. भारतीय पंतप्रधानांसह अनेक मोठ्या नेत्यांवर वृत्तपत्राने पुराव्यांखेरीज आरोप केले आहेत.

५. या अहवालानंतर कॅनडा सरकारने हे स्पष्ट केले आहे की, या प्रकरणात भारतीय अधिकार्‍यांना थेट दोषी ठरवणारा कोणताही पुरावा त्यांच्याकडे नाही.

संपादकीय भूमिका

  • भारताला खोट्या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न करून त्याची अपकीर्ती करणार्‍या कॅनडाला भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात खेचले पाहिजे !
  • ट्रुडो सरकारने वरील विधान केले असले, तरी त्यांच्याच सरकारमधील काही मंत्री प्रतिदिन भारतावर खोटे आरोप करतच आहेत. त्यामुळे ट्रुडो सरकारने अशा मंत्र्यांची हकालपट्टी करून त्यांना आजन्म कारागृहात टाकले पाहिजे आणि त्यांना तसे करण्यास भारताने भाग पाडले पाहिजे !