विद्यार्थ्यांना समजूतदारपणाचे बाळकडू द्या !

बाँब लावल्यामुळे फुटलेली खुर्ची ( छायाचित्र स्त्रोत: x.com)

‘मुले म्हणजे देवाघरची फुले’, अशी म्हण आहे; पण ही म्हण सध्याच्या काळात लागू पडण्यासाठी आजकालची मुले तेवढी निरागस, शांत आणि स्थिर राहिली आहेत का ? नुकत्याच एका बातमीमध्ये वाचनात आले की, हरियाणा येथे इयत्ता १२ वीमधील विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या खुर्चीखाली बाँब लावला आणि रिमोट यंत्राद्वारे त्याचा स्फोट केला. हा जरी फटाक्याचा बाँब असला, तरी मुलांचे इतके धाडस होतेच कसे ? या मुलांना निलंबित करण्यात आले आहे. सुदैवाने शिक्षिकेला काही झाले नाही; पण फटाक्याचा स्फोट इतका जोरदार होता की, शिक्षिकेची खुर्ची फुटून गेली. जर ती शिक्षिका खुर्चीत बसलेली असती, तर काय झाले असते, याची कल्पनाही करवत नाही ! एक काळ होता, जेव्हा शिक्षकांच्या धाकाने वर्गात बसलेले विद्यार्थी बाकावरून जागचे हालत नसत. विद्यार्थी उलट उत्तर देण्याचा विचारही करत नसत. नम्रता, ऐकण्याची वृत्ती अशा सर्व गुणांचे बाळकडूच त्या काळी दिले जात असावे. ‘छडी लागे छम छम’ हे गीत आजही आठवते, अशीच ती शिकवण होती. आज ते बाळकडू हरवून त्याची जागा भ्रमणभाषने घेतली आहे.

हरियाणा येथे घडलेल्या घटनेमागे अनेक कारणे आहेत – त्यापैकी एक कारण म्हणजे भ्रमणभाष हे आहे, ज्याद्वारे त्या मुलांनी बाँब बनवून रिमोटने तो कसा उडवायचा, हे शिकून घेतले. मुलांना ज्या वयात गुणसंवर्धन आणि नीतीमत्ता यांचे शिक्षण मिळायला हवे, त्या वयात हातात मिळालेल्या भ्रमणभाषचे आंदण या मुलांची मानसिकता नकळतपणे गुन्हेगारीकडे कशी वळवत आहे, हे याचे दुर्दैवी उदाहरण आहे. आजच्या चित्रपटांतूनही शिक्षक, म्हणजे एखादा विनोदी कलाकार, जो आपल्या विद्यार्थ्यांशी बेशिस्तपणे बोलतो, वागतो असे काहीसे दाखवले जाते. यामुळेही अनेकदा मुले चुकीचा आदर्श घेऊन शिक्षकांची थट्टा-मस्करी करायला धजावतात. मुलांना शिक्षकांचा त्रास होऊ नये; म्हणून शिक्षकांचा धाक बंद झाला खरा; पण त्याचे दुष्परिणाम अधिक झाले आहेत, हे वास्तव आहे.

 

भारताची पुढची पिढी ही निश्चितच देशाला उत्कृष्ट बनवणारी असायला हवी. अशी पिढी घडवायची असेल, तर वरील प्रकारच्या घटनांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षा करणे अत्यावश्यक ठरते. ‘टाकीचे घाव सोसल्याविना देवपण येत नाही’, असे म्हटल्याप्रमाणे शिक्षा दिल्यासच शिस्त, समाजऋण, दूरदृष्टी, नम्रता यांसारखे गुण मुलांच्या अंगी येतील हे खरे ! प्रेमाने आणि धाकाने घडवलेली अशी मुले ज्ञानदान करणार्‍या शिक्षकांच्या खुर्चीखाली बाँब लावण्याऐवजी राष्ट्रहितकारक गोष्टींसाठी पुढाकार घेतील. राष्ट्रव्यापी विचार करण्यास प्रवृत्त होतील. यासाठी विद्यार्थ्यांना समजूतदारपणाचे बाळकडू द्यायला हवे.

– श्री. केतन पाटील, पुणे