हिंगोली – कळमनुरी विधानसभेचे शिवसेनेचे उमेदवार आमदार संतोष बांगर यांच्यावर १३ नोव्हेंबर या दिवशी कळमनुरी पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंगाचा गुन्हा नोंद झाला. मतदारांना पैसे वाटप करणे, तसेच सावरखेडा शिवारात अनुमती न घेता मंडप उभारणी करणे, अशी तक्रार त्यांच्याविरुद्ध प्राप्त झाली होती.
कळमनुरी विधानसभा मतदारसंघात पैसे वाटपाच्या आरोपावरून तालुक्यातील वाकोडी शिवारात वाहनांची तोडफोड करण्यात आली, तसेच महिलांना एकत्र करून पैसे वाटप केले जात असल्याची तक्रार ठाकरे गटाने केली. या प्रकरणात प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करून ठाकरे गटाचे उमेदवार डॉ. संतोष टारफे, माजी खासदार अधिवक्ता शिवाजी माने, जिल्हाप्रमुख अजय पाटील सावंत यांच्यासह पदाधिकार्यांनी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केले होते. त्यानंतर माजी खासदार अधिवक्ता माने यांच्या तक्रारीवरून संतोष बांगर यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे.