अजमेर (राजस्थान) – राजस्थानच्या टोंक जिल्ह्यातील देवळी-उनियारा मतदारसंघात १३ नोव्हेंबरला पोटनिवडणूक पार पडली. या मतदारसंघातील अपक्ष उमेदवार नरेश मीना यांनी मतदानाच्या दिवशी उपविभागीय दंडाधिकारी अमित चौधरी यांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर मीना यांना पोलिसांनी कह्यात घेतले होते. त्यामुळे मतदारसंघात तणाव निर्माण झाला आहे. मीना यांच्या शेकडो समर्थकांनी हिंसक निदर्शने केली. या समर्थकांनी परिसरातील अनेक वाहने पेटवली, पोलिसांच्या वाहनांवर दगडफेकही केली.
देवळी उनियारा विधानसभा मतदारसंघातील समरावता गावातील मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे स्थानिक पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी यांचे एक पथक उपविभागीय दंडाधिकारी अमित चौधरी यांच्या नेतृत्वाखाली गावात आले होते. या वेळी नरेश मीना यांची अमित चौधरी यांच्याबरोबर बाचाबाची झाली. त्याचे रूपांतर मोठ्या भांडणात आणि हाणामारीत झाले. त्यामुळे समरावता गावात तणाव निर्माण झाला आहे. गावातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ‘विशेष कृती दला’ला गावात पाचारण करण्यात आले आहे.