Imran Khan Cricket Jihad : इम्रान खान भारताच्या विरोधात क्रिकेट खेळतांना ‘जिहाद’ करत असत ! – भारतीय सैन्याचे निवृत्त कॅप्टन गोपालस्वामी पार्थसारथी

भारतीय सैन्याचे निवृत्त कॅप्टन गोपालस्वामी पार्थसारथी यांचा दावा !

डावीकडून इम्रान खान आणि गोपालस्वामी पार्थसारथी

नवी देहली – भारतीय सैन्याचे निवृत्त कॅप्टन गोपालस्वामी पार्थसारथी (जी. पार्थसारथी) यांनी वर्ष २०२० मध्ये ‘ट्रिब्यून इंडिया’ नियतकालिकासाठी लिहिलेल्या लेखात पाकिस्तानच्या क्रिकेट संघाचे माजी कर्णधार इम्रान खान भारताच्या विरोधात क्रिकेट सामना खेळतांना जिहाद म्हणून त्याकडे पहात खेळायचे, असे म्हटले होते. इम्रान खान जिहादी विचारांनी पूर्णपणे कट्टर होते. त्यांनी ते कधीच कळू दिले नाही, ही वेगळी गोष्ट ! पाकिस्तानी गुप्तचर संस्था ‘इंटर-सर्व्हिस इंटेलिजेंस’ (आय.एस्.आय.) नेहमी इम्रान खान यांच्या पाठीशी कशी होती आणि त्यांना पंतप्रधानपदापर्यंत कसे नेण्यात आले, ही माहितीही या लेखात देण्यात आली होती. सध्या पाकिस्तानमध्ये चँपियन चषक क्रिकेट स्पर्धा होणार आहे. भारताचा संघ पाकमध्ये या स्पर्धेसाठी जाणार नाही. पाकने यासाठी भारताने यावे, अशी विनंती केली आहे; मात्र पाकिस्तान्यांची खरी मानसिकता काय आहे, हे पार्थसारखी यांनी यापूर्वी दाखवून दिल्याने त्यांचा हा लेख आता पुन्हा चर्चेत आला आहे.

पार्थसारथी यांनी त्यांच्या लेखात लिहिले होते की,

१. जेव्हा मी इम्रान खान यांच्या राजकारणाचा विचार करतो, तेव्हा मला त्यांची वर्ष १९८२ मध्ये कराचीमध्ये झालेली भेट आठवते. मी त्या वेळी कराचीमध्ये भारताचा उच्चायुक्त होतो. सुनील गावस्कर यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचे यजमानपद पाकिस्तान संघ करत होता. माझ्या रात्रीच्या मेजवानीला भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील खेळाडू उपस्थित होते. माझे निवासस्थान माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्या निवासस्थानाच्या विरुद्ध बाजूस होते.

२. मी एका मैत्रीपूर्ण समालोचकाला विचारले की, ‘भारताविरुद्ध कर्णधार इम्रान खान यांच्या ‘किलर बोलिंग’चे (मारक गोलंदाजीचे) रहस्य काय आहे ? त्यांना भारताविरोधात अशी गोलंदाजी करण्यासाठी कशामुळे प्रेरणा मिळते ?’ यावर मला (समालोचकाने) सांगितले की, स्थानिक माध्यमांनी त्याला (इम्रान खान यांना) एकदा याबद्दल विचारले होते, ज्यावर इम्रान म्हणाला होता, ‘मी याला खेळ म्हणून घेत नाही. मी काश्मीरचा विचार करतो आणि मग त्यांच्याविरुद्ध (भारताविरुद्ध) जिहाद करतो.’ एका सामन्यात भोजन आणि चहा यांच्यासाठीच्या विश्रांतीच्या वेळी चेंडू पाकिस्तानी पंचांच्या खिशात होता आणि ते त्यावर ओरखडा ओढत होते. याचा लाभ इम्रान खान यांना ‘रिव्हर्स स्विंग’च्या (गोलंदाजीतील एक प्रकार ज्याला खेळणे कठीण असते) रूपाने झाला आणि हेच यशाचे रहस्य ठरले. सुनील गावस्कर यांच्या संघाला याची माहिती मिळाली होती.

३. पाकिस्तानने वसीम अक्रम यांसारखे अनेक वेगवान गोलंदाज सिद्ध केले, जे भारताविरुद्ध आपले सर्वस्व द्यायचे; पण त्यांच्यात जिहादसारखी गोष्ट दिसली नाही.

४. इम्रान खान यांच्या तहरीक-ए-इन्साफ पक्षाच्या संस्थापक सदस्यांमध्ये लेफ्टनंट जनरल हमीद गुल यांचाही समावेश होता, जे कट्टर इस्लामवादी आणि आय.एस्.आय.चे माजी महासंचालक होते. गुल यांनीच अफगाणिस्तानात आतंकवाद शिगेला पोचवला होता. त्यांनी भारताच्या पंजाब आणि जम्मू-काश्मीर राज्यांमध्ये आतंकवाद्यांना आश्रय दिला अन् तेथील जनतेचे जनजीवन दयनीय केले. नवाझ शरीफ यांचा भारत आणि अफगाणिस्तान यांच्याशी मैत्रीकडे असलेला कल पाहून गुल यांनी इम्रान खान यांना सत्तेवर आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. अमेरिकेतील ९/११ च्या जिहादी आतंकवादी आक्रमणाचा सूत्रधार ओसामा बिन लादेन याला ‘शहीद’ म्हणणारे ते पहिले होते.

संपादकीय भूमिका

पाकिस्तानी क्रिकेटपटूंची मानसिकता पहाता यात काहीच चुकीचे असू शकत नाही, असेच कुणीही म्हणेल ! पाकचे क्रिकेटपटू इन्झमाम उल् हक, शोएब अख्तर आदीही अशा प्रकारे जिहाद करत. पाकचे क्रिकेटपटू दानिश कनेरिया हे हिंदु असल्याने त्यांच्यावरही अन्याय झाला होता, हे विसरून कसे चालेल ?