छत्रपती संभाजीनगर – औरंगाबाद शहराला ‘छत्रपती संभाजीनगर’ नाव देण्याची मागणी बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती; मात्र काँग्रेसच्या दबावामुळे कुणाचे धाडस झाले नाही. बाळासाहेबांची इच्छा महायुतीने पूर्ण केली; मात्र याचा काँग्रेसच्या नेत्यांना सर्वांत अधिक त्रास झाला. छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करणार्याला मानणारे काँग्रेसचे लोक आहेत, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी छत्रपती संभाजीगर येथे झालेल्या प्रचारसभेच्या वेळी केला.
काँग्रेस हिंदूंना जाती-जातींमध्ये लढवते !
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात देशातील सर्वांत मोठे औद्योगिक क्षेत्र विकसित करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी महायुती सरकारने १६ कोटी रुपये दिले होते; मात्र महाविकास आघाडीने ही योजना थांबवली. आता युतीच्या काळात पुन्हा योजना चालू झाली आहे; मात्र त्याचा खर्च ७०० कोटी रुपये एवढा वाढला आहे. ‘एक है तो सेफ है’ (एक रहाल, तर सुरक्षित रहाल), काँग्रेस पक्ष आपल्याला जाती-जातींमध्ये लढवत आहे. एकीकडे मराठवाड्यात देशभक्ती दिसून येते, तर दुसरीकडे काँग्रेस कलम ३७० पुन्हा लागू करण्याच्या गोष्टी करत आहे. काँग्रेस येथील माळी समाजाला गवंडी समाजाच्या विरोधात लढवत आहे. सोनार समाजाला सुतार समाजाच्या विरोधात लढवत आहे. ओबींसी जाती-जातींमध्ये विभागले जातील, त्याचा लाभ घेण्यासाठी काँग्रेसचा प्रयत्न आहे. काँग्रेस सत्तेत आली, तर ती आरक्षण संपवणार, असा दावा पंतप्रधान मोदी यांनी केला.